दिल्लीचा तरूण घेणार उसेन बोल्टसोबत ट्रेनिंग! : वाचा झोपडपट्टीत राहणार्या निसार अहमदचा जिद्दी प्रवास
दिल्लीच्या आझादपुर भागात दहा बाय दहाची झोपडी, लोकांची धुणी-भांडी करणारी आई आणि रिक्षा चालवणारे वडील. या हलाखीच्या परिस्थितीतूनही निसार अहमद या १६ वर्षीय धावपटूनं मिळवलीये सुवर्णसंधी ; ती थेट किंगस्टनच्या 'रेसर्स ट्रॅक क्लब' मध्ये प्रशिक्षण घेण्याची! मंडळी, हा तोच क्लब आहे जिथं घडलाय भूतलावरील सर्वात वेगवान मानव, दि लाईटनींग बोल्ट : उसेन बोल्ट. आणि आज तिथं तो प्रशिक्षण देतोय.
देशातील अन्य १४ खेळांडूसोबत निसारची निवड जमैकाच्या या ट्रेनिंग कॅम्पसाठी झालीय. या कॅम्पमध्ये त्याला उसेन बोल्ट, योहान ब्लेकसारख्या दिग्गज धावपटूंना भेटण्याची, त्यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळेल. नुकताच निसारनं नॅशनल ज्युनियर अॅथलॅटीक्स चॅम्पियनशिप मध्ये १०.८२ सेकंदात १०० मीटर अंतर कापून राष्ट्रीय रेकॉर्ड रचलाय! गेल्या तीन वर्षांपासून तो सर्वोत्कृष्ट अॅथलीटचा पुरस्कार जिंकतोय. आतापर्यंत त्यानं आपल्या छोट्याशा घरात ३५ मेडल्स सजवली आहेत.
सरकारी शाळेत शिकलेला निसार शाळेतल्या प्रत्येक शर्यतीत पहिला येऊन लहानसहान बक्षिसं जिंकायचा. त्याचवेळी त्याच्या शाळेतल्या क्रिडाशिक्षकांना त्याच्यातल्या वेगाची कल्पना आली आणि त्यांनी निसारला प्रोत्साहन देऊन त्याची ट्रेनिंग सुरू केली. खुराक म्हणून दूध पिण्यासाठीही त्याचे क्रिडाशिक्षक त्याला लपवून पैसे द्यायचे! सुरूवातीच्या ट्रेनिंग नंतर निसारला छत्रसाल स्टेडियमवर ट्रेनींगसाठी पाठवण्यात आलं. आणि इथूनच त्याची खरी शर्यत सुरू झाली.
उत्तम सरावातून निसारचा वेग तर वाढत होता. पण कमतरता होती ती स्पोर्ट्स किट, येण्याजाण्याचा खर्च अशा अनेक मुलभूत सुविधांची. अशातही त्याच्या प्रशिक्षक आणि मित्रांनी त्याला प्रोत्साहन दिलं. आपल्या मुलाच्या डोळ्यातली स्वप्नं ओळखून त्याच्या गरिब आईवडिलांनी त्याच्यासाठी त्यांनी २८,००० रूपयांचं कर्ज घेतलंय. आणि ते हळूहळू फेडण्याचा ते प्रयत्न करताहेत. त्यांची इच्छा आहे ती फक्त आपल्या मुलाला चॅम्पियन बनलेलं पाहाण्याची.
मंडळी, प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत निसारने जे मिळवलंय ते नक्कीच कौतुकास्पद आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी आपण त्याला शुभेच्छा देऊन आपल्या कामगारीने भारताचं नाव तो जागतिक पटलावर झळकवेल, असा आशावाद व्यक्त करूया....