आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे ५ मोठे खेळाडू !!
जगातील सर्वात मोठी टी ट्वेन्टी सामन्यांची स्पर्धा असलेल्या आयपीएलमध्ये इतर टी ट्वेन्टी स्पर्धांप्रमाणे फलंदाजांचा बोलबाला असतो. कमी चेंडूंमध्ये जास्तीतजास्त द्यावा करण्याकडे त्यांचा कल असतो. पण या नादात शून्यावर आऊट होण्याची शक्यता देखील अधिक असते. हिटमॅन रोहित शर्मा देखील याला अपवाद नाही. इतर अनेक विक्रमांच्या बरोबरीने सर्वाधीक वेळा शून्यावर आऊट होण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावावर आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक १३ वेळा शून्यावर आऊट झाला आहे. रोहित शर्माच्या बरोबरीने अजून कोण या यादीत आहे, जाणून घेऊया.
१. हरभजन सिंग
स्पिन बॉलर म्हणून प्रसिद्ध असलेला हरभजन सिंग फलंदाजी देखील तितकीच भन्नाट करतो. पण याच भन्नाट फलंदाजीच्या नादात भज्जीच्या दांड्या अनेक वेळा उडाल्या आहेत. मुंबई आणि चेन्नई कडून खेळत असताना आजवर रोहित शर्माच्या बरोबरीने भज्जी देखील १३ वेळा शून्यावर आऊट झाला आहे.
२. पार्थिव पटेल
पार्थिव पटेलने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जरी विशेष चमक दाखवली नसली, तरी त्याने स्थानिक स्पर्धांमध्ये मोठे नाव कमावले आहे. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक संघांकडून खेळण्याचा विक्रम आहे. शून्यावर आऊट होणाऱ्या लोकांच्या यादीत पार्थिव पटेल हा रोहित शर्मा आणि हरभजन सिंग यांच्या बरोबरीने उभा आहे. तो देखील आजवर १३ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
३. गौतम गंभीर
गौतम गंभीर हा वेळेनुसार फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. जेव्हा विकेट राखण्याची गरज असेल तेव्हा शांत तर जेव्हा धावांची गरज असेल तेव्हा जोरदार फलंदाजी करणारा गंभीर, मात्र आयपीएलमध्ये भोपळा देखील न फोडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत देखील तो सुरुवातीच्या स्थानी आहे. आपल्या १५४ सामन्यांमध्ये गंभीर हा १२ वेळा शून्यावर आऊट झाला आहे.
४. मनीष पांडे
मनीष पांडेची ओळख आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू अशी आहे. भाऊ मैदानावर आला म्हणजे एकतर धावांचा पाऊस पडतो नाहीतर शून्यावर पवेलीयनमध्ये परततो असे म्हणावे लागेल. कारण त्याने खेळलेल्या १३० आयपीएल सामन्यांमध्ये त्याने अनेक चांगल्या खेळया खेळल्या आहेत, पण त्याच सोबत तब्बल १२ वेळा तो शून्यावर आऊट झाला आहे.
तर, हे होते पहिले ५ खेळाडू जे सर्वात जास्त वेळा शून्यावर आऊट झाले आहेत. तुम्हाला देखील अशा खेळाडूंची नावे माहीत असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.