राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी आलेला हा नवीन खेळाडू कोण आहे? वाचा त्याचा आजवरचा प्रवास !!
आयपीएलचा नवा हंगाम सुरू होणार आहे. यावर्षी अनेक संघांनी आपल्या संघात मोठे फेरबदल केले आहेत. बरेच नवे खेळाडू यावर्षी कर्णधारपद सांभाळणार आहेत. यात राजस्थानचा संजू सॅमसन हा खेळाडू लक्ष वेधून घेत आहे. आयपीएलच्या १०व्या हंगामात ६३ चेंडूंमध्ये १०२ धावा केल्यावर संजू सॅमसनने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी भाऊ थेट राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे.
संजू सॅमसनचा प्रवास बघितला तर इथवरचा प्रवास त्याने प्रचंड मेहनत केल्याचे दिसून येते. त्याचा जन्म झाला तो तिरुवनंतपुरम येथे, ११ नोव्हेंबर १९९४ रोजी जन्मलेल्या संजूचे वडील दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल होते. त्याला क्रिकेटची आवड लहानपणापासूनच होती. दिल्लीतच याची सुरुवात झाली. त्याच्या क्रिकेट प्रेमामुळे पूर्ण कुटुंबही त्याला प्रोत्साहन देत असे.
प्रचंड मेहनत करून देखील संजूची दिल्लीच्या अंडर १४ संघात जेव्हा निवड झाली नाही, तेव्हा त्याच्या वडिलांनी दिल्ली पोलिसातील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. पूर्ण कुटुंब घेऊन ते तिरुवनंतपुरम येथे परतले. आता वडिलांच्या देखरेखीखाली संजुचे क्रिकेट सुरू झाले होते.
संजूचे वडील विश्वनाथ सॅमसन हे पूर्णवेळ मुलाच्या क्रिकेटवर लक्ष देऊ लागले होते. त्यांच्या तालमीत त्याचे क्रिकेट बहरत गेले. लवकरच त्याने वडिलांची अपेक्षा पूर्ण केली. संजूची निवड भारताच्या अंडर १९ संघात झाली. या संघात तो उपकर्णधार झाला. पण त्याचा खरा खेळ दिसला तो आयपीएलमध्ये, आयपीएलमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण खेळामुळे त्याला भारताच्या टी ट्वेन्टी संघात जागा मिळाली.
भारताकडून त्याने आजवर ७ टी ट्वेन्टी सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये त्याने केलेली मुसळधार १०२ धावांची खेळी मात्र अविस्मरणीय ठरली होती. आता संजू हा मोठमोठे सिक्स मारण्यासाठी ओळकखला जातो. गेल्या हंगामात ३२ चेंडूंमध्ये ७४ धावा लुटल्यावर त्याने या खेळीत तब्बल ९ सिक्स मारले होते.
संजू सॅमसनने आपल्या कॉलेजमधील मैत्रीण चारुलता हिच्यासोबत २०१८ साली प्रेमविवाह केला आहे. संजूच्या नावावर अनेक विक्रम आहेत. रणजी ट्रॉफीत सर्वात तरुण कर्णधार म्हणून त्याची ओळख आहे. विजय हजारे ट्रॉफीत शतक करणारा तो एकमेव विकेटकीपर फलंदाज आहे.
असा हा धडाकेबाज खेळाडू आयपीएलमध्ये काय कमाल दाखवतो हे पाहण्यासारखं असेल.