कर्फ्यूमुळे आपण माणूस झालो? आदिमानवांपासून ते आजच्या माणसापर्यंतचा इतिहास कर्फ्यूने घडवला?
कर्फ्यूमुळे आपण माणूस झालो! हे वाक्य वाचल्यावर बोभाटाच्या लेखकांच्या डोक्यावर कर्फ्यूमुळे परिणाम झाला आहे का काय? असं तुमच्या मनात आलाही असेल. पण सांगायचा मुद्दा असा आहे की एकेकाळी पृथ्वीवर माकडांसारखी वावरणारी माणसांची जमात या कर्फ्यूमुळेच 'माणसात' आली! आता ते कसं काय ते नेमकं समजून घेऊ या!
पुरातन काळी आदिमानव इतर जनावरांसारखंच आपलं आयुष्य जगत होता. जीवनशैली वानरांचीच होती म्हणा ना. फरक इतकाच होता आदिमानव शिकार करून प्राण्यांचे मांसही भक्षण करत असे. या जीवनशैलीत आधी अन्न शोधत फिरायचे, नंतर ते दिवसभर ते कच्चे अन्न चघळत रहायचे आणि उरलेल्या तासांमध्ये ते पचवायचे काम त्याची आतडी करायची. आता गंमत बघा, वनस्पतीजन्य अन्न हे वनस्पतींनी साठा केलेले असल्याने पचायला हलके जायचे. पण पुरेशी उर्जा मिळण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात खावे लागायचे. कच्च्या मांसाने पोट भरायचे, पण ते पचवण्यासाठी जास्त उर्जा लागायची. शरीराने मिळवलेली जास्तीतजास्त उर्जा अन्न पचवण्याच्या कामात वापरली जायची. म्हणून त्या काळात आतड्यांचा आकार आणि लांबी जास्त होती. परिणामी मेंदूची वाढ फारशी व्हायची नाही.
नंतरच्या काळात कधीतरी अपघाताने अन्न आगीत-फुफाट्यात फेकले गेले आणि अपल्या पूर्वजांनी ते चाखून बघितले. त्या अन्नाची चव कच्च्या अन्नापेक्षा चांगली होतीच आणि ते सहज पचते हे पण त्यांच्या लक्षात आले. अशा रितीने अन्न भाजून खायची कला म्हणजे जगातील पहिली 'रेसिपी' जन्माला आली. अन्न मिळाले की आगीत टाकून खाण्यासाठी आगीभोवती गराडा पडायला लागला. मग जबाबदार्या वाटल्या गेल्या. पिल्लांना सांभाळणार्या माद्या हे काम करायला लागल्या. नर अन्नाच्या शोधात फिरायला लागले. असे भाजलेले अन्न अर्थातच आपण ज्यांना आपले समजतो त्यांच्यासोबत वाटून खायची पध्दत जन्माला आली. जी मादी हे भाजण्याचं काम करायची ती 'बायको' झाली आणि अन्न शोधून आणणारा 'नवरा' झाला. थोडक्यात, आगीत अन्न भाजून खाण्याच्या एका रेसिपीमुळे कुटुंबपध्दती जन्माला आली. सगळ्यात मोठा फायदा झाला तो असा की पचनासाठी लागणार्या उर्जेची बचत झाली आणि येणार्या पिढ्यात मेंदूची झपाट्याने वाढ व्हायला सुरुवात झाली.
आता तुम्ही म्हणाल की लेखकराव, आतातरी मूळ मुद्द्याला येऊन त्याचा आणि कर्फ्यूचा काय सबंध ते सांगा!! सांगतो ना, सांगतो! या दरम्यानच्या काळात बरीच वर्षं गेली आणि भाषा तयार झाल्या. आगीभोवती जमा झालेले म्हणजे एकत्रित झालेले लोक यातून 'फोकस' हा शब्द जन्माला आला. फोकस म्हणजे फायरप्लेस, म्हणजेच आपल्या भाषेत चूल!
चला, चूल समजली. पण चुलीत असणारा अग्नी टिकवायाचा कसा ही मोठ्ठी समस्या होती. तेव्हा ना काडेपेटी ना लायटर! उपाय एकच होता. तो म्हणजे आज असलेला चुलीतला अग्नी उद्यापर्यंत टिकवून ठेवायचा. म्हणजे तो झाकून ठेवायला हवा. ही अग्नी झाकून ठेवायची पध्दत म्हणजे त्यावर एक झाकण ठेवणे. म्हणून जर लॅटिन भाषेतला शब्द बघितला तर पुढचा संदर्भ सहज लागतो.
अग्नी -निखारे झाकून ठेवणार्या झाकणाला लॅटिन भाषेत ‘कॉव्हेअर फ्यु’ (couvre feu) असे म्हणतात. त्यामुळे आग पसरायची पण नाही आणि उजाडत्या दिवसासाठी टिकून पण रहायची.
अशा रितीने एका ठिकाणी बंदिस्त करून एका ठिकाणावरची परिस्थिती दुसरीकडे पसरू नये यासाठी घातलेली बंधने म्हणजे कॉव्हेअर फ्यु म्हणजेच कर्फ्यू!!
आता आम्ही सुरुवातीला जे म्हटले- पृथ्वीवर माकडांसारखी वावरणारी माणसांची जमात या कर्फ्यूमुळेच 'माणसात' आली -त्या वाक्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेलच!
आणि हो, हे सगळं काही व्यवस्थित समजेल आणि वाचायला मिळेल Catching Fire: How Cooking Made Us Human या पुस्तकात! हे पुस्तक अॅमेझॉनवर या लिंकवर उपलब्ध आहे. : https://amzn.to/2PYxvq7
हा झाला शब्दाचा उगम. परंतु नंतरच्या काळात त्याची अर्थवाहकता बदलत गेली. पण मूळ भाव तसाच राहिला. उदाहरणार्थ : मुलांनी संध्याकाळी घरी परत येण्याच्या नियमांना कर्फ्यू हाच शब्द होता. १४ व्या शतकात ज्या वस्तीत घराला लागून घर असायचे, त्यामुळे जर एखाद्या घरात आग लागली की की बाजूची बरीचशी घरे जळायची. म्हणून अमुक वाजल्यानंतर चुलीतली आग -निखारे झाकून ठेवण्याची वेळ ठरवलेली असायची. त्यावेळेस जो अलार्म -घंटानाद केला जायचा त्यालाही कर्फ्यू म्हटले जायचे .
"Curfew. A bell which ringing about bedtime, giveth folkes warning, to go to rest and cover their fire.
— John Bullokar, An English Expositor, 1616"
वाचकहो, आतापावेतो तुम्हाला कर्फ्यू या शब्दाचा अर्थ समजला असेलच. तर अशाच अर्थपूर्ण लेखांसाठी 'बोभाटा' वाचत रहा, मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघत आहोत हे लक्षात असू द्या!!