अक्षय कुमारच्याही आधी या ११ अभिनेत्यांनी मोठ्या पडद्यावर तृतीयपंथी पात्रं साकारली आहेत !!
मला एक अमुक अमुक हिरो आवडतो. तुला माहितेय का? त्याचे सिनेमे लै खतरनाक असतात राव...म्हणजे कसं ना तो असा बाईक वरून येतो काय आणि दहा दहा गुंडांना मरेपर्यंत एकटाच मारतो काय, ते म्हणजे बघा....विषयच कट, एकदम नादखुळाच....
लहान मुलं, मोठ्या माणसांना देखील अश्या गप्पा मारताना आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. ते दिवस आता नक्कीच सरलेत जेव्हा लोक फक्त नटाची हिरोगिरी आणि नटीचं देखण रूप पाहायला सिनेमे बघायला जायचे. पण जेव्हा फक्त नट आणि नटीसाठी म्हणून लोक सिनेमा पाहायला जायचे तेव्हाही बऱ्याच कलाकारांनी एका चौकटीच्या बाहेर जाऊन धाडसाने भिन्न आणि दमदार भूमिका निभावल्या होत्या. अशा वेगळ्या भूमिकांमध्ये तृतीयपंथी पात्रं साकारण्याचंही धाडस अनेक अभिनेत्यांनी केलं आहे.
२०२० मधे अक्षय कुमारचा 'लक्ष्मी' प्रदर्शित झाला. या सिनेमात अक्षय कुमार आणि आपला मराठमोळा शरद केळकर याने तृतीयपंथी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. खासकरून शरद केळकर याचं सगळे कौतुक करतायत. ह्या व्यक्तिरेखा नक्कीच वेगळ्या होत्या. पण या प्रकारची पात्रं साकारणारे हे पहिलेच नाहीत. त्यांच्या आधी ११ अभिनेत्यांनी तृतीयपंथीयाची भूमिका अत्यंत कौशल्याने साकारल्या आहेत. आज आपण या ११ भूमिका आणि त्यांना साकारणाऱ्या अभिनेत्यांबद्दल जाणून घेणार होत.
चला तर सुरुवात करू या!!
१. आशुतोष राणा
१९९९ मध्ये संघर्ष सिनेमा प्रदर्शित झाला. तोवर बॉलिवूडमध्ये एक नट असायचा आणि एक नटी. त्यांच्या लग्नाला/प्रेमाला विरोध करणारे त्यांचे आई वडील सोडले तर सिनेमातील कोणतेही पात्र म्हणावे तसे लक्षात राहण्यासारखे नसायचे. एव्हाना लेखकाला तितकी स्पेसही दिली जायची नाही, पण संघर्षमध्ये आशुतोष राणाने साकारलेल्या भूमिकेमुळे बॉलिवूडला एक नवा व्हिलन म्हणा किवा एका नव्या पात्राची ओळख झाली. संघर्ष सिनेमातील साकारलेल्या तृतीयपंथी व्यक्तिरेखेसाठी त्यांना फिल्मफेअर अवार्ड मिळाला होता.
२. परेश रावल
“ये बाबुराव का स्टाईल है” म्हणणारे परेश रावल ह्यांनी देखील एकेकाळी तृतीयपंथी पात्र साकारलं होतं. तम्मना ह्या सिनेमात त्यांनी साकारलेल्या तृतीयपंथीयाच्या भुमिकेसाठी सर्व स्तरातील लोकांनी त्यांचे कौतुक केले होते. समीक्षकांनी तर प्रामुख्याने ह्या भूमिकेचे कौतुक केले होते.
३. महेश मांजरेकर
मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत महेश मांजरेकर हे एक आदराने घेतलं जाणारं नाव आहे. Wanted सिनेमातला खराब पोलीस असो किंवा दबंग सिनेमातला मजेशीर दारुडा बाप असो. महेश मांजरेकर यांनी प्रत्येक भूमिका अगदी ताकदीने निभावली आहे. रज्जो सिनेमामध्ये त्यांनी बेगम ही तृतीयपंथीयाची भूमिका साकारली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला पण महेश मांजरेकर ह्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. ह्या सिनेमामध्ये कंगना राणावत देखील होती.
४. प्रशांत नारायण
देवीची मूर्ती बनवणारा, स्वखुशीने समलिंगीपणाचा स्वीकार करणारा आणि नंतर एकामागोमाग एक असे खून करणारा धीरज पांडे. मर्डर २ मधला हा सिरीयल किलर आजही आठवला तरी अंगावर काटा येतो. ह्या सिनेमात लोकांना मारण्याची त्याची सनक इतकी जास्त दाखवली आहे की शेवटी तो त्यांच्याच नेत्याचा खून करतो. प्रशांत नारायणने साकारलेल्या ह्या भूमिकेमुळे तो कायमचा लक्षात राहिला. आजही मर्डर २ म्हटल्यावर प्रशांत नारायण आठवल्याखेरीज राहत नाही.
५. सदाशिव अमरापूरकर
नुकताच दणकून आपटलेल्या सडक २ सिनेमाचा पहिला भाग सडक मध्ये सदाशिव अमरापूरकर यांनी महाराणी ही तृतीयपंथीयाची भूमिका साकारली होती. अस म्हणतात ह्या भूमिकेमुळेच १९९२ सालापासून फिल्मफेअर पुरस्कारात बेस्ट व्हिलनसाठी वेगळा पुरस्कार देण्यात येऊ लागला. हा पहिला पुरस्कार अर्थातच सदाशिव अमरापूरकर यांना देण्यात आला होता.
६. प्रकाश राज
२००० मध्ये आलेल्या अप्पू सिनेमात प्रकाश राज ह्यांनी तृतीयपंथीयाची भूमिका साकारली होती. बॉंलिवूड मधील नटाने दक्षिणेकडील सिनेमामध्ये तृतीयपंथीयाची भूमिका साकारणारे प्रकाश राज हे पहिले अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या हुशारीने आणि दमदार आवाजाने ह्या भुमिकेमध्येही जिवंतपणा आणला होता.
७. जॉनी लिव्हर
त्यांच्या प्रत्येक सिनेमामधून आपल्याला हसवणारे अभिनेते जॉनी लिव्हर हे असे एकटे नट आहेत ज्यांनी एक ना अनेक सिनेमात तृतीयपंथीयाचं पात्र निभावले आहे.
८. निर्मल पांडे
१९९६ साली प्रदर्शित झालेल्या दायरा सिनेमात निर्मल पांडे ह्यांनी तृतीयपंथीयाची भूमिका साकारली होती. त्यांनी ह्या भूमिकेसाठी फ्रान्सच्या Valenciennes फिल्म फेस्टिवलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिकही जिंकले होते.
९. राघव लॉरेन्स
अक्षय कुमारचा लक्ष्मी सिनेमा कांचना ह्या तमिळ सिनेमाचा रिमेक आहे. कांचना सिनेमात राघव ह्यांनी तृतीयपंथीयाची भूमिका साकारली होती. ह्या सिनेमातील त्यांचे काम खूपच दमदार झाले आहे. राघव लॉरेन्स यांनीच लक्ष्मी सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
१०. आरिफ झकारिया
आरिफ झकारिया यांनी आजवर अनेक भूमिका निभावल्या आहेत. मात्र त्यांना हवं तसं नाव आणि प्रसिद्धी मिळाली नाही. फार कमी लोकांना त्यांचा दरमियां सिनामातला तृतीयपंथीयांची भूमिका ठाऊक आहे. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी नॉमिनेशनही मिळालं होतं.
११. विजय सेतुपती
विजय सेतुपती या गुणी अभिनेत्याचं नाव घेतल्याशिवाय ही यादी पूर्ण होऊच शकणार नाही. 'सुपर डिलक्स' सिनेमात त्याने साकारलेली शिल्पा नावाची भूमिका लोकांच्या कायमच लक्षात राहील अशी आहे. सुपर डिलक्सच्या कथानकासोबतच सर्वात जास्त कोणाची चर्चा झाली असेल तर ती विजय सेतुपती याची. लवकरच विजय सेतुपती गोलंदाज मुरलीधरन याच्या रूपाने आपल्या भेटीला येत आहे.
वाचकहो, यातील कोणत्या अभिनेत्याचा अभिनय तुम्हाला सर्वात जास्त आवडला? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा !!
लेखिका: स्नेहल बंडगर