मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

डेमी मूरचा तो 'बोल्ड' फोटो आणि बदललेलं जग: मॅटर्निटी शूटची रंजक कहाणी

2 मिनिट वाचन

१९९१ मध्ये अभिनेत्री डेमी मूरच्या त्या एका फोटोने मॅटर्निटी फोटोशूटचा नवा ट्रेंड सुरू करून जगभरात क्रांती कशी घडवली, त्याची गोष्ट.

शेअर करा:
डेमी मूरचा तो 'बोल्ड' फोटो आणि बदललेलं जग: मॅटर्निटी शूटची रंजक कहाणी

डेमी मूरचा तो एक 'बोल्ड' फोटो आणि बदललेलं जग: मॅटर्निटी शूटची रंजक कहाणी

१९९१ साली 'व्हॅनिटी फेअर' मासिकाच्या त्या एका अंकाने जगभरातील तब्बल कोट्यावधी लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सात महिन्यांच्या गरोदर डेमी मूरने पूर्णपणे नग्न अवस्थेत दिलेली ती एक 'पोज' जागतिक फॅशन आणि संस्कृतीच्या इतिहासातील सर्वात मोठा 'टर्निंग पॉईंट' ठरली.

सध्या लग्नाचा सिझन आता संपला आहे. सोशल मीडियावर सध्या हनिमूनचे रोमँटिक फोटो आणि रिल्सचा पाऊस पडतोय. यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे 'प्री-मॅटर्निटी' किंवा 'बेबी बंप' शूट. आज हे सगळं सामान्य वाटत असलं, तरी ३५ वर्षांपूर्वी हे कल्पनेपलीकडचं होतं.

पूर्वी गरोदरपण म्हणजे सैल कपड्यांमागे लपवण्याची गोष्ट मानली जायची. डेमी मूरच्या त्या एका फोटोने ही सामाजिक भिंत एका फटक्यात पाडली. प्रसिद्ध फोटोग्राफर ॲनी लिबोविट्झने टिपलेलं ते रूप केवळ ग्लॅमर नव्हतं, तर स्त्रीत्वाचा एक नवा हुंकार होता. या एका फोटोने प्री-मॅटर्निटी फोटोग्राफीची दारे जगासाठी उघडली.

त्या एका फोटोने गरोदरपणाला 'सेलिब्रेशन' बनवलं. अमेरिकेत सुरू झालेली ही लाट आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली आहे. एकेकाळी फक्त 'डोहाळे जेवण' आणि हिरवी साडी इतपत मर्यादित असलेलं हे विश्व आता प्रोफेशनल स्टुडिओ आणि सिनेमॅटिक लेव्हलला गेलं आहे.

आजच्या काळात रिहानापासून ते दीपिका पदुकोणपर्यंत प्रत्येक सेलिब्रिटीने 'बेबी बंप' फ्लॉन्ट करणं -मिरवणं हे एक 'पॉवर स्टेटमेंट' बनलं आहे. यामुळे सामान्य महिलांमध्येही स्वतःच्या बदलणाऱ्या शरीराबद्दलचा आत्मविश्वास वाढला आहे. गरोदरपणातलं ते नैसर्गिक सौंदर्य कॅमेऱ्यात टिपणं ही आता केवळ हौस उरली नसून एक सांस्कृतिक गरज बनली आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की, डेमी मूरने जे धाडस १९९१ मध्ये केलं, तो नंतर एक सर्वसामान्य ट्रेंद झाला.त्याचा फायदा आजच्या सोशल मीडिया जनरेशनला मिळत आहे.

गरोदरपण ही आता लपवण्याची गोष्ट उरली नसून, अभिमानाने मिरवण्याचं एक देखणं पर्व झालं आहे.स्त्रीच्या शरीरातील बदलांचा स्वीकार आणि त्याचं जाहीर कौतुक करण्याची ही क्रांती एका ऐतिहासिक फोटोने यशस्वी केली होती.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख