इंदिरा गांधींनी जिचं कौतुक केलं, ती आज कुठे हरवली?कधी कधी एखाद्या भारतीय व्यक्तीला जग ओळखतं… पण काही वर्षांनी भारतच तिला विसरतो.पर्सिस खंबाटा हे त्यापैकीच एक नाव.आज तिचा जन्मदिवस.
१९७९ मध्ये जगभरातील Star Trekच्या चाहत्यांना एका विलक्षण भारतीय चेहऱ्याची ओळख झाली. डोक्यावर एकही केस नाही, चेहऱ्यावर विलक्षण आत्मविश्वास आणि भविष्यातून आलेल्या स्त्रीसारखं व्यक्तिमत्त्व.
ती होती लेफ्टनंट इलिया—Star Trek: The Motion Pictureमधील डेल्टन नेव्हिगेटर.
पण त्या टक्कल डोक्यामागे असलेली स्त्री केवळ हॉलीवूड अभिनेत्री नव्हती. ती भारताची मॉडेल, मिस इंडिया आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली अभिनेत्री होती.
आणि गंमत म्हणजे स्वत:च्या आयुष्याची पहिली स्क्रिप्ट तिने स्वतः लिहिलेलीच नव्हती.
तेराव्या वर्षी कॅमेऱ्याची नजर
१९४८ मध्ये मुंबईत जन्मलेली पर्सिस एका दिवशी कुटुंबासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवत होती.
वय—फक्त तेरा.एका छायाचित्रकाराची नजर तिच्यावर पडली.त्याने काही टेस्ट फोटो काढले.ते फोटो Rexona साबणाच्या जाहिरात मोहिमेसाठी वापरले गेले आणि पर्सिसच्या मॉडेलिंग कारकिर्दीला सुरुवात झाली.
तेराव्या वर्षी तिला कदाचित याची कल्पनाही नसेल की एका रेस्टॉरंटमधील त्या साध्या जेवणामुळे तिचं आयुष्य वेगळ्या दिशेने जाणार आहे.
१९६५ मध्ये तिने Miss Indiaचा किताब जिंकला.पुढच्या वर्षांत मॉडेलिंग, चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ—तिच्यासमोर अनेक दरवाजे उघडत गेले.
पण तिला पारंपरिक बॉलीवूडमध्ये रमायचं नव्हतं.तिने मुंबई सोडली.न्यूयॉर्क गाठलं.
आंतरराष्ट्रीय मॉडेल म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला.
नशीब कधी कधी चोरीला गेलेल्या बॅगेतून उगवतं! पर्सिसच्या आयुष्यातील सर्वात विचित्र प्रसंगांपैकी एक विमानात घडला.भारताला आईला भेटण्यासाठी येऊन ती परतत होती. विमानात तिची भेट दोन भारतीय अभिनेत्यांशी झाली.तिने त्यांना आपलं portfolio दाखवला.नंतर ती झोपली.
विमान लंडनमध्ये थांबलं.विमान पुन्हा उड्डाण घेईपर्यंत तिला कळलंच नाही की तिचचा portfolio चोरीला गेला आहे.आणि त्या portfolioमध्ये तिच्या आतापर्यंतच्या संपूर्ण मॉडेलिंग कारकिर्दीचा पुरावा होता.क्षणभर तिच्यासमोर अंधार उभा राहिला.
सगळं पुन्हा नव्याने सुरू करावं लागणार होतं.पण याच धक्क्याने तिच्या आयुष्याला नवा वळसा मिळाला.
तिने ठरवलं—आता अभिनय गंभीरपणे करायचा.ती लॉस एंजेलिसला गेली.
आणि तिथेच तिची भेट तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या भूमिकेशी झाली.
आणि मग केस गेले!Star Trek: The Motion Pictureसाठी ऑडिशन सुरू झालं.
भूमिका होती—Lieutenant Ilia.डेल्टन असल्यामुळे या व्यक्तिरेखेचे केस नव्हते. ऑडिशनला पर्सिसने टक्कल असल्याचा भास निर्माण करण्यासाठी bald cap घातली.
पण भूमिका मिळाली तर?तिला खरंच डोकं पूर्ण मुंडावं लागणार होतं.
शेकडो अभिनेत्रींपैकी पर्सिसची निवड झाली.आणि मग त्या काळात एका भारतीय अभिनेत्रीने केलेली गोष्ट आजही लक्षात राहते—तिने स्वतःचे लांबसडक केस कापून टाकले.केस जमिनीवर पडत गेले.पर्सिसच्या डोळ्यांत अश्रू आले. पण त्या अश्रूंसोबत एका नव्या पर्सिसचा जन्म झाला.
तिच्या या लुकसाठी तिने प्राचीन इजिप्तची राणी नेफरतिती हिच्या प्रतिमेपासून प्रेरणा घेतली होती.
आणि मग १९७९ मध्ये Star Trek पडद्यावर आलं.
जगभरातील प्रेक्षकांनी एका भारतीय अभिनेत्रीला भविष्यकाळातील एका विलक्षण व्यक्तिरेखेत पाहिलं.
भारतीय मुलगी—हॉलीवूडच्या अंतराळात!
पर्सिसची आंतरराष्ट्रीय ओळख वाढत असताना भारतातही तिचं कौतुक झालं.
पंतप्रधान इंदिरा गांधींनी तिचा उल्लेख ‘Pride of India’ असा केला होता, अशी नोंद तिच्या जीवनाविषयीच्या अनेक कथनांमध्ये आढळते.त्या काळात भारतीय अभिनेत्रीने हॉलीवूडमध्ये जाऊन Star Trekसारख्या मोठ्या चित्रपटात भूमिका मिळवणं ही साधी गोष्ट नव्हती.
पर्सिसने भारतीय सौंदर्याची केवळ पारंपरिक प्रतिमा जगासमोर नेली नाही.तिने भारतीय स्त्रीची आधुनिक, आत्मविश्वासी आणि प्रयोगशील प्रतिमाही मांडली.दुर्दैवाने हॉलीवूडने तिच्यासाठी तेवढे दरवाजे उघडले नाहीत.
कधी कधी इतिहासात नाव राहतं… चेहरा हरवतो
१९८३ मध्ये पर्सिसवर कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया झाली.आणि १९९८ मध्ये मुंबईतच तिचं निधन झालं.वय होतं फक्त ४९ वर्षं.एकेकाळी आंतरराष्ट्रीय पडद्यावर झळकलेली, भारताचा अभिमान म्हणून गौरवली गेलेली आणि Star Trekच्या इतिहासात स्वतःची वेगळी खूण उमटवलेली ही अभिनेत्री इतक्या लवकर निघून गेली.
आज Star Trek म्हटलं की जगभरात अनेकांना कॅप्टन कर्क आठवतो, स्पॉक आठवतो.पण त्या अंतराळयानात एक भारतीय चेहराही होता, हे किती जणांना आठवतं?
पर्सिस खंबाटा.






