लाखो अपंगांच्या आयुष्याला गती देणारा संशोधक-जॉर्ज क्लाईन
हजारो-लाखो माणसांना स्वतःच्या पायावर उभे राहता येत नसेल,तरी एखाद्या शोधामुळे स्वतःच्या इच्छेने जगात फिरण्याचे स्वातंत्र्य मिळते,तर त्या शोधाचे महत्त्व वेगळेच असते.जॉर्ज क्लाईन यांची मोटराइज्ड व्हीलचेअर ही अशीच एक क्रांतिकारी निर्मिती होती.
या शोधाची पार्श्वभूमी काय होती?
दुसऱ्या महायुद्धानंतर एक वेगळीच समस्या निर्माण झाली होती.युद्धात गंभीर जखमी झालेले अनेक सैनिक मृत्यूच्या दाढेतून वाचले.मात्र अनेक सैनिकांना मणक्याच्या दुखापतीमुळे कायमचा लकवाझाला होता अनेकांचे पूर्ण शरीर पक्षाघाताने ग्रासले होते.
या सैनिकांसाठी पारंपरिक व्हीलचेअर फारशी उपयोगाची नव्हती. स्वतःच्या हातांनी चाकं फिरवता येत नसल्यामुळे त्यांना दुसऱ्यांवरच अवलंबून राहावे लागत होते.
याच समस्येवर उपाय शोधण्याचे काम कॅनडाच्या National Research Council (NRC) ने जॉर्ज क्लाईन यांच्याकडे सोपवले.
क्लाईन यांनी केवळ जुन्या व्हीलचेअरला मोटर लावली नाही,तर खुर्चीची संपूर्ण कार्यपद्धतीच बदलून टाकली.
त्यांच्या डिझाइनमधील विशेष महत्त्वाच्या गोष्टी
१. स्वतंत्र मोटर्स : व्हीलचेअरच्या दोन्ही मुख्य चाकांसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ड्राइव्हची व्यवस्था केली.त्यामुळे खुर्चीला कमी जागेत वळवणे आणि दिशा बदलणे शक्य झाले.
२. जॉयस्टिक कंट्रोल : पुढे जाणे, मागे येणे आणि दिशा बदलणे यासाठी एक छोटे नियंत्रण उपकरण तयार केले.आजच्या इलेक्ट्रिक व्हीलचेअरमध्ये दिसणाऱ्या जॉयस्टिकचे हे महत्त्वाचे प्राथमिक स्वरुप होते.
क्लाईन यांच्या या संशोधनातील सर्वांत उदात्त बाब म्हणजे त्यांनी आपल्या या नव्या कल्पनेचे पेटंट स्वतःच्या नावावर घेण्याचा आग्रह धरला नाही.त्यांचा उद्देश या तंत्रज्ञानाचा व्यावसायिक फायदा मिळवणे नव्हता, तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हा होता.
जॉर्ज क्लाईन यांची कल्पकता केवळ व्हीलचेअरपुरती मर्यादित नव्हती.
STEM Antenna: त्यांनी विकसित केलेल्या दुर्बिणीसारख्या विस्तारता येणाऱ्या अँटेनाचा वापर Apollo अंतराळ मोहिमांपर्यंत झाला.
Microsurgical Stapling Device: रक्तवाहिन्या जोडण्यासाठी वापरता येणारे सूक्ष्म शस्त्रक्रिया उपकरण विकसित करण्यातही त्यांचा सहभाग होता.
कॅनडाच्या National Research Council मध्ये त्यांनी सुमारे ४० वर्षे काम केले. १९९२ मध्ये वयाच्या ८८व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
जॉर्ज क्लाईन यांच्या संशोधनाची एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.
त्यांनी व्हीलचेअर तयार करताना केवळ अभियंते आणि तंत्रज्ञांचे म्हणणे ऐकले नाही, तर प्रत्यक्ष व्हीलचेअर वापरणाऱ्या अपंग व्यक्तींनाही संशोधन प्रक्रियेत सहभागी करून घेतले. आज ज्याला User-Centred Design म्हणतात,त्या दृष्टिकोनाचे हे एक सुरुवातीचे उल्लेखनीय उदाहरण होते.त्यांच्या शोधामुळे व्हीलचेअरवर अवलंबून असलेल्या व्यक्तीला केवळ हालचालीचे साधन मिळाले नाही, तर स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याची संधी मिळाली.
काही शोध माणसाचे आयुष्य वाढवतात तर काही शोध माणसाच्या आयुष्याला नवी दिशा देतात. जॉर्ज क्लाईन यांची व्हीलचेअर दुसऱ्या प्रकारात मोडते.








