कथेत नायक असतो आणि खलनायकही असतो. नायक चांगला आणि खलनायक वाईट,असे साधे सोपे समीकरण आपण लहानपणापासून डोक्यात अप्रत्यक्षरित्या भरवले जाते.पण जरा विचार केला तर लक्षात येते की, खलनायक नसता तर नायकाच्या नायकपणाला किंमतच उरली नसती!
कृष्णाच्या चातुर्याला धार येण्यासाठी कंस आणि कौरव लागतात.सुपरमॅनला सुपरमॅन बनवण्यासाठी लेक्स लूथर लागतो. शेरलॉक होम्सची बुद्धिमत्ता चमकण्यासाठी मोरियार्टी लागतो.म्हणजे खलनायक हा नायकाचा शत्रू असला, तरी तो नायकाच्या प्रसिद्धीचा अनधिकृत ब्रँड ॲम्बेसेडर असतो!
खलनायकाचेही अनेक प्रकार आहेत. काहींच्या चेहऱ्यावरूनच ‘हा माणूस काहीतरी गडबड करणार’ असे स्पष्ट दिसते. जुन्या मूक चित्रपटांच्या काळात तर खलनायकाने काळा कोट, मिशा आणि कपटी नजर ठेवणे जवळजवळ बंधनकारकच होते. नायकाला संकटात टाकताना त्याने भुवया उंचावल्या की प्रेक्षकांना पुढची दहा मिनिटे काय होणार आहे हे समजायचे!
पण नंतर खलनायकही हुशार झाला.त्यातला एक भन्नाट प्रकार म्हणजे ‘Mad Scientist’.
हा साधा खलनायक नसतो. त्याच्याकडे प्रयोगशाळा असते. विचित्र यंत्रे असतात. केस अस्ताव्यस्त असतात. डोळ्यांवर जाड चष्मा असतो. आजूबाजूला बाटल्या, तारा, नळ्या आणि कुणालाच न समजणारी उपकरणे असतात. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—त्याच्याकडे वेळ असतो!
आपण सामान्य माणसे सकाळी उठून ऑफिसला जाण्याची, ट्रॅफिकमध्ये अडकण्याची आणि संध्याकाळी भाजी आणण्याची धडपड करत असतो. हा गृहस्थ मात्र प्रयोगशाळेत बसून विचार करतो—
‘पृथ्वीवर राज्य कसे करायचे?’
Mad Scientist ची गंमत अशी की तो पूर्ण मूर्ख नसतो. उलट, तो अनेकदा कथेतल्या सर्वांत बुद्धिमान व्यक्तींपैकी एक असतो. त्याची समस्या बुद्धी कमी असणे नसते; बुद्धीचा वापर कशासाठी करायचा, हा प्रश्न असतो. त्याच्याकडे विज्ञान असते, तंत्रज्ञान असते, कल्पकता असते. पण त्याला नैतिकतेचा अपडेट मिळालेला नसतो!
दोघांकडेही क्षमता असते. फरक एवढाच—एक ती क्षमता निर्माण करण्यासाठी वापरतो आणि दुसरा नाश करण्यासाठी.
कदाचित म्हणूनच प्रत्येक चांगल्या कथेला खलनायकाची गरज असते. कारण अडथळा नसला तर विजयाला अर्थ नसतो. विरोधक नसला तर संघर्ष नसतो. संघर्ष नसला तर कथा नसते.
आणि म्हणूनच कथेच्या पडद्यामागे एक गंमतीदार सत्य दडलेले असते -नायकाला मोठं होण्याची संधी खलनायकच देत असतो.
आता तुमचा आवडता खलनायक कोणता ते आम्हाला नक्की सांगा !







