मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

दोनशे रुपये... आणि आयुष्यभराचं ऋण!

3 मिनिट वाचन

साहिर लुधियानवी यांनी जावेद अख्तर यांना उशाशी ठेवलेले २०० रुपये आणि अखेर टॅक्सी भाड्यात नेमका झालेला तोच हिशेब; एक भावुक आठवण.

शेअर करा:
दोनशे रुपये... आणि आयुष्यभराचं ऋण!

जावेद अख्तर यांच्या संघर्षाच्या काळात त्यांना आधार दिला होता साहिर लुधियानवी यांनी. जावेद अख्तर यांच्यासाठी साहिर केवळ एक ज्येष्ठ कवी नव्हते; ते मार्गदर्शक होते, गुरू होते आणि वडिलांच्या जागी असलेली एक प्रेमळ व्यक्ती होते.
एकदा जावेद अख्तर सकाळी झोपलेले असताना साहिरसाहेब कामावर निघण्यापूर्वी त्यांच्या उशाशी दोनशे रुपये ठेवून गेले.जावेदसाहेब उठले, तेव्हा त्यांना समजलं की हे पैसे कुणी ठेवले असतील. त्यांनी ते पैसे वापरले.
काळ बदलला. संघर्ष करणारा जावेद पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज गीतकार आणि पटकथालेखक झाला.नाव, पैसा, प्रतिष्ठा सगळं मिळालं.
पण साहिरसाहेब त्या दोनशे रुपयांचा हिशेब विसरले नव्हते!
कधी मैफलीत भेट झाली की साहिरसाहेब मिश्किलपणे विचारायचे, “मेरे दो सौ रुपये कब देगा?”
जावेदसाहेबही तितक्याच मिश्किलपणे उत्तर द्यायचे, “नहीं दूंगा!”
“लेकर तो रहूंगा,” साहिरसाहेब ठामपणे सांगायचे.
दोनशे रुपये! त्या दोघांमध्ये ती पैशांची देवाणघेवाण नव्हती; ती प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि मैत्रीची एक गोड आठवण होती.
पण आयुष्याने या दोनशे रुपयांचा हिशेब एका विलक्षण पद्धतीने पूर्ण केला.
१९८० मध्ये साहिर लुधियानवी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच जावेद अख्तर तातडीने टॅक्सी पकडून आले. साहिरसाहेबांच्या पार्थिवाची व्यवस्था करण्यापासून ते अंत्यसंस्कारांपर्यंतच्या जबाबदाऱ्यांत त्यांनी सहभाग घेतला. अखेर साहिरसाहेबांना जुहूच्या स्मशानभूमीत नव्हे, तर तिथल्या मुस्लिम कब्रस्तानात दफन करण्यात आलं.
सगळे विधी पार पडले. जावेदसाहेब घरी परतण्यासाठी निघाले.
तेव्हा टॅक्सीवाल्याने भाडं मागितलं.
“साहब, मेरा किराया ?

"कितना हुआ?”

“दो सौ रुपये!”

नेमके दोनशे रुपये!

एकशे नव्याण्णव नाहीत,दोनशे एकही नाहीत. तेच दोनशे रुपये!

जणू काळाने जावेदसाहेबांच्या उशाशी ठेवलेले दोनशे रुपये इतकी वर्षं जपून ठेवले होते. आणि आता तेच दोनशे रुपये जावेदसाहेबांच्या हातून खर्च झाले.
पण या कहाणीचा खरा अर्थ दोनशे रुपयांत नाही.
काही ऋणं पैशांनी फेडली जात नाहीत. ती माणसांच्या रूपाने आयुष्यात येतात, प्रेमाच्या रूपाने मनात राहतात आणि आठवणींच्या रूपाने आयुष्यभर आपल्याबरोबर चालतात.
आणि म्हणूनच हा किस्सा संपताना मनात एकच विचार येतो—
माणसं निघून जातात; पण त्यांचं प्रेम कधी कधी दोनशे रुपयांचं रूप घेऊन आयुष्यभर आपला पिच्छा पुरवत राहतं!
(साहिर लुधियानवी आणि जावेद अख्तर यांची ही कथा डोळ्यात पाणी आणेल. ही कथा अनेकवेळा वेगवेगळ्या माध्यमातून ऐकायला मिळते. या कहाणीची सत्यासत्यता शोधणं फारच कठीण आहे. पण मग असं वाटतं की का शोधायचे ते दुवे ? अशीच कहाणी आपल्या आयुष्यातही घडली असेल आणि आपण त्याची नोंद ठेवली नसेल.)

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!
लाइफस्टाइल

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!

कच्छचे अज्रख आणि आंध्र प्रदेशचे कलमकारी या दोन्ही पारंपरिक वस्त्रकलांमागे कोणतं प्राचीन रसायनशास्त्र दडलं आहे? वाचा सविस्तर.

१५ ऑक्टोबर, २०२६

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर
विज्ञान

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर

दक्षिण ध्रुवावरील २.५ किमी खोल बर्फात न्यूट्रिनो पकडणारी महाकाय दुर्बीण उभारणारे शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन आणि त्यांचा नोबेल सन्मान.

७ ऑक्टोबर, २०२६

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!
विज्ञान

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!

प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूतील पेशींचे नियंत्रण करणाऱ्या 'ऑप्टोजेनेटिक्स' तंत्रज्ञानाचा शोध आणि २०२६ च्या नोबेल पुरस्काराची रंजक गोष्ट.

६ ऑक्टोबर, २०२६

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!
लाइफस्टाइल

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!

एनव्हिडीया आणि झोमॅटोच्या मूल्यांकनावरून आज कंपन्यांची खरी ताकद जमिनीवर नसून डेटा, नेटवर्क आणि बौद्धिक संपदेत कशी आहे, याचे विश्लेषण.

५ ऑक्टोबर, २०२६