मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

‘जॉली!’: शाळेच्या दिवसांमधली फाउंटन पेनची शाई आणि निरागस मैत्री

3 मिनिट वाचन

शाळेच्या काळात फाउंटन पेनच्या शाईने खेळला जाणारा 'जॉली' हा खेळ आणि त्याभोवती गुंफलेल्या शालेय मैत्रीच्या हळव्या आठवणी.

शेअर करा:
‘जॉली!’: शाळेच्या दिवसांमधली फाउंटन पेनची शाई आणि निरागस मैत्री

आजच्या मुलांना ‘जॉली’ म्हटलं की कदाचित एखाद्या मोबाइल गेमचं नाव वाटेल.पण आमच्या शाळेच्या काळात ‘जॉली!’ हा शब्द ऐकला की मोबाइल नाही,तर आपले दोन्ही हात तपासायचे असायचे!

शाळेतला हा खेळ तसा अगदी साधा.कोणत्याही क्षणी एखादा मित्र अचानक तुमच्यासमोर येऊन ओरडायचा— “जॉली!”

बस्स! आता तुमची परीक्षा.तुम्ही लगेच हात पुढे करायचे.

हातावर शाईचा गोल ठिपका असेल तर तुम्ही सेफ!

आणि हात स्वच्छ, चकचकीत असतील तर समजा तुमची विकेट गेली!

फाउंटन पेनच्या त्या काळात शाई हाताला लागणे ही काही फार मोठी गोष्ट नव्हती.उलट, ‘जॉली’च्या नियमांनुसार तो डाग म्हणजे तुमचं संरक्षक कवच होतं.त्यामुळे काही मुलं तर सकाळी शाळेत आल्यावरच हाताच्या तळव्यावर किंवा बोटांवर शाईचा अगदी छोटासा डाग लावून ठेवायची. म्हणजे दिवसभर कधीही ‘जॉली!’चा हल्ला झाला तरी आपण सुरक्षित!

जॉली नसलेला हात मात्र संकटात.हरलात तर शिक्षा वेगवेगळी. कुठे मित्राला चॉकलेट द्यायचं, कुठे एखादी छोटी ट्रीट द्यायची, तर काही ठिकाणी पाठीवर एक हलकासा ‘धपाटा’ मिळायचा.

आजच्या भाषेत सांगायचं तर हा खेळ म्हणजे सोशल मीडिया, स्टेटस, नोटिफिकेशन आणि ऑनलाइन गेमिंग येण्याच्या कित्येक दशकांपूर्वीचा ‘ऑफलाइन सोशल गेम’ होता.यात कुठलीही महागडी साधनं नव्हती. ना बॅटरी, ना इंटरनेट, ना स्क्रीन.

फक्त मित्र, शाळेचा परिसर आणि फाउंटन पेनची शाई!

आणि गंमत म्हणजे या खेळामुळे शाईचा डागही प्रतिष्ठेचा विषय व्हायचा.

वर्गात एखाद्याच्या हातावर जॉली दिसली की तो निष्काळजी विद्यार्थी आहे असं न वाटता, उलट—“हा तर जॉलीपासून सुरक्षित आहे!” असं वाटायचं.

‘जॉली!’ म्हणत मित्राला गाठणे, त्याने घाईघाईने हात मागे लपवणे, मग “अरे दाखव ना!” म्हणून त्याचा हात ओढणे आणि शेवटी हातावरचा तो छोटासा निळा डाग सापडला की दोघांचं हसणं…या सगळ्यात जिंकणं-हरणं फार महत्त्वाचं नव्हतंच. महत्त्वाची होती ती मैत्री.

आज मुलांच्या हातावर शाईचे डाग कमी झाले आहेत. फाउंटन पेनची जागा जेल पेनने, जेल पेनची जागा डिजिटल स्क्रीनने घेतली आहे. मित्राला अचानक पकडून “जॉली!” म्हणण्याऐवजी आज notification येतं—“You have been tagged.”

पण त्या काळात मैत्रीला notification लागत नव्हतं.

मित्र शेजारीच असायचा. आणि म्हणूनच ‘जॉली!’ हा फक्त एक खेळ नव्हता. तो शाळेच्या बाकांमध्ये, कॉरिडॉरमध्ये आणि मैदानाच्या कडेला तयार झालेल्या मैत्रीचा एक छोटासा कोड होता.

हातावरचा तो निळा-काळा शाईचा डाग कदाचित काही तासांत धुऊन जायचा.

पण त्या डागाभोवतीच्या आठवणी?

त्या आजही तशाच आहेत.

कधी काळी हातावरची शाई ‘डाग’ नव्हती—ती मैत्रीची ‘सेफ्टी’ होती!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२
लाइफस्टाइल

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२

ज्या जमिनीवर तुमची टोलेजंग इमारत उभी आहे, तिचा ५० वर्षांचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? जमिनीच्या प्रदूषणाचा वेध घेणारा लेख.

१३ ऑक्टोबर, २०२६

महेश्वरी साडी — अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीने विणलेला वारसा!
लाइफस्टाइल

महेश्वरी साडी — अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीने विणलेला वारसा!

नवरात्रीनिमित्त भारताच्या वस्त्रवैभवाचा वेध: नर्मदा काठच्या महेश्वरमधील ऐतिहासिक महेश्वरी साडी आणि राणी अहिल्याबाईंचे योगदान.

११ ऑक्टोबर, २०२६