मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

कपाळ मोठं होतं म्हणून केसांवर कात्री चालवली अन् इतिहास घडला; 'साधना कट'ची रंजक गोष्ट

3 मिनिट वाचन

अभिनेत्री साधना यांची आयकॉनिक 'साधना कट' हेअरस्टाईल कशी जन्माला आली? 'लव्ह इन सिमला' सिनेमा दरम्यान घडलेला हा रंजक किस्सा.

शेअर करा:
कपाळ मोठं होतं म्हणून केसांवर कात्री चालवली अन् इतिहास घडला; 'साधना कट'ची रंजक गोष्ट

कपाळ मोठं होतं म्हणून केसांवर कात्री चालवली अन् इतिहास घडला; 'साधना कट'मागची ही रंजक गोष्ट तुम्हाला माहित आहे का?

आपल्याला नेहमी वाटतं की हिरॉइन्सच्या हेअरस्टाईल म्हणजे फक्त एक ग्लॅमरस चॉईस असतो.पण परवाच जेव्हा मी साधनाजींच्या जुन्या फोटोंवरून नजर फिरवत होते, तेव्हा मला समजलं की ज्या स्टाईलने संपूर्ण भारताला वेड लावलं,ती स्टाईल म्हणजे खरं तर एका 'समस्येवर' शोधून काढलेला जालीम उपाय होता.

आज २ सप्टेंबर, म्हणजे साधना शिवदासानी यांचा जन्मदिन. याच निमित्ताने सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. पण या आठवणींमध्ये सर्वात वर नाव येतं ते म्हणजे 'साधना कट'चं. ही केवळ एक हेअरस्टाईल नव्हती, तर तो एक काळ होता.

गोष्ट अशी आहे की, १९६० सालच्या 'लव्ह इन सिमला' या सिनेमातून साधना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होत्या. दिग्दर्शक आर. के. नय्यर यांच्यासमोर एक मोठी अडचण उभी होती. साधना दिसायला अतिशय सुंदर होत्या, पण नय्यर यांना वाटत होतं की तिचं कपाळ थोडं जास्तच मोठं आणि रुंद आहे.

त्यांना सिनेमातली 'सोनिया' एकदम ग्लॅमरस आणि खोडकर हवी होती. सुरुवातीला मेकअप आर्टिस्टनी साधनाच्या केसांच्या लाईनपाशी एक छोटी पट्टी चिकटवून कपाळाचा आकार बदलण्याचा प्रयत्न केला. पण ते इतकं कृत्रिम आणि विचित्र दिसत होतं की कॅमेऱ्यासमोर ते टिकणं अशक्य होतं.

नय्यर साहेब हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांच्या डोक्यात अचानक हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ऑड्री हेपबर्नचा चेहरा चमकला. त्यांनी ऑड्रीचा एक फोटो सेटवर आणला आणि हेअर ड्रेसरला दाखवला. "मला साधनाच्या कपाळावर अगदी असेच केस हवे आहेत," त्यांनी ठामपणे सांगितलं.

कल्पना करा, त्या काळी भारतीय नायिका म्हणजे लांबसडक केस आणि मधून पाडलेला भांग हेच समीकरण होतं.साधना स्वतः या निर्णयाने थोडी हादरली होती. "भारतीय प्रेक्षक मला अशा रूपात स्वीकारतील का?" असा प्रश्न तिला सतावत होता. पण दिग्दर्शकाच्या आग्रहाखातर कात्री चालली आणि कपाळावर त्या रुळणाऱ्या बटा आल्या. .

जेव्हा 'लव्ह इन सिमला' मोठ्या पडद्यावर आला, तेव्हा तर चमत्कारच झाला. साधनाच्या त्या हेअरस्टाईलने तिच्या चेहऱ्याचं पूर्ण रूपच बदलून टाकलं होतं. ती दिसायला अधिक नाजूक आणि स्टायलिश वाटू लागली. प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं आणि रातोरात ती 'स्टाईल आयकॉन' बनली.

यानंतर जे झालं तो एका फॅशनचा इतिहास आहे. कॉलेजला जाणाऱ्या मुलींपासून ते अगदी नवीन लग्न झालेल्या सुनांपर्यंत, प्रत्येक जण पार्लरमध्ये जाऊन "मला साधना कट हवाय" असं सांगू लागली.भारतात पहिल्यांदाच एखाद्या अभिनेत्रीच्या नावाने हेअरस्टाईल ओळखली जाऊ लागली.

आजच्या काळात आपण रोज नवनवीन फॅशन ट्रेंड्स पाहतो, पण एका साध्या हेअरकटने सलग दोन-तीन दशकं राज्य करणं ही साधी गोष्ट नाही. साधनाजींनी दाखवून दिलं की तुमची एखादी 'उणीव' किंवा 'त्रुटी' हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकते, जर तुम्ही उणीवेला आत्मविश्वासाने मिरवलं तर!

तुम्ही कधी तुमच्या एखाद्या 'कमी' वाटणाऱ्या गोष्टीला तुमची स्वतःची वेगळी ओळख बनवण्याचा प्रयत्न केला आहे का?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर
विज्ञान

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर

दक्षिण ध्रुवावरील २.५ किमी खोल बर्फात न्यूट्रिनो पकडणारी महाकाय दुर्बीण उभारणारे शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन आणि त्यांचा नोबेल सन्मान.

७ ऑक्टोबर, २०२६

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका
लाइफस्टाइल

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका

मध्ययुगीन काळात हात धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'अ‍ॅक्वामॅनिल' झारीची आणि त्यावर कोरलेल्या ॲरिस्टॉटल-फिलीसच्या कथेची गोष्ट.

१६ ऑक्टोबर, २०२६