वय वर्ष ९६ असलेली हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध अशी अभिनेत्री म्हणजे कामिनी कौशल.
आजच्या काळात वय वर्ष ९६ असलेली हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध अशी अभिनेत्री म्हणजे कामिनी कौशल.
कामिनी कौशल यांचे मूळ नाव 'उमा कश्यप'! त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी१९२७ मधे लाहोर येथे झाला.सामान्य जीवन जगणाऱ्या या मुलीला अभिनेत्री नाही तर एक उत्तम शिक्षिका बनावे असे वाटत होते पण म्हणतात ना 'आखिर वही होता है जो तकदीर मे लिखा होता है'अश्याच काही घटना कामिनी कौशल यांच्या आयुष्यात घडल्या आणि त्यांचे आयुष्य बदलले.
बालपणापासून घोडेस्वारी, स्केटिंग, नाटक, आकाशवाणी, रेडिओ या गोष्टींची आवड होती. एकदा निर्माता चेतन आनंद यांनी रेडिओ वर एका कार्यक्रमात कामिनी चा आवाज ऐकला आणि १९४६ साली त्यांच्या 'नीचा नगर' या चित्रपटात 'रूपा' नावाची मुख्य भूमिका करण्याची संधी दिली. चित्रपटात चेतन आनंद यांची पत्नीसुद्धा काम करणार होती. तिचे नाव उमा. दोघींचे नाव उमा नको म्हणून चेतन यांच्या सल्यानेउमा कश्यप चे जागी कामिनी कौशल असे नाव आले आणि अशा प्रकारे या क्षेत्रात काम करायचे हे ध्यानीमनी नसताना उमा कश्यपची झाली कामिनी कौशल आणि सुरु झाला सिनेजगतातला प्रवास !
नीचा नगर, बिराज बहू या चित्रपटामुळे त्या लोकप्रिय झाल्या नंतर नदिया के पार, जिद्दी,बडे सरकार,जेलर,नाईट क्लब,गोदान अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले. त्या काळातली मुख्य भूमिका करणारी ही एकमेव अभिनेत्री होती त्यांनी देव आनंद, राज कपूर, अशोक कुमार अशा प्रसिद्ध अभिननेत्यां सोबत काम केले आहे.मनोज कुमार सोबत उपकार,संतोष,पुरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान, संन्यासी तर राजेश खन्ना सोबत दो रास्ते, प्रेम नगर, महाचोर असे चित्रपट दिले. त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्यापैकी एक असलेले दिलीप कुमार यांच्या सोबत त्यांनी १९४८मधे 'शहीद' चित्रपटात काम केले. दोघांची सोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ होती. या दोघांची जोडी खूप गाजली आणि चित्रपटा दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे सुद्धा दोघांनी एकत्र काम केले, दिलीप कुमार यांचे कामिनीवर जीवापाड प्रेम होते. दोघे लग्न करणार होते परंतु त्याच दरम्यान कामिनी यांच्या मोठ्या बहिणीचे निधन झाले आणि बहिणीच्या मुलींवर जीवापाड प्रेम असल्यामुळे जिजाजींनी दुसरे लग्न करून मुलींना सावत्र आई आणायला नको म्हणून त्यांनी स्वतःच त्यांच्या जिजाजीं सोबत लग्न केले आणि बहिणीच्या मुलींना आईच्या मायेने सांभाळले. त्यांच्या या निर्णयामुळे दिलीपकुमार नाराज होते.असे म्हणतात की दोघे सोबत काम करताना त्यांच्या अफेअरच्या चर्च्यांमुळे कामिनी चे भाऊ हैराण झाले आणि त्यांनी स्वतःला गोळी मारून संपवले त्यामुळे पुढे कामिनी यांनी दिलीप कुमार सोबत काम न करण्याचा निर्णय घेतला म्हणून त्यांचे पुढे एकत्र चित्रपट होऊ शकले नाही
त्यांचा किस्सा इथेच थांबला आणि दोघांची खरीखुरी कहाणी अधुरी राहिली नाहीतर आज दिलीप कुमार आणि कामिनी कौशल या जोडीला आपण वेगळ्या रूपात भेटलो असतो.म्हणजे बघा मंडळी त्या काळात प्रेम त्याग करणाऱ्या अभिनेत्री होत्या तर...!
कामिनी यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत तसेच गुडिया घर या प्रॉडक्शन कंपनीच्या मालकीण आहेत. त्यांनी 'चालीस बाबा और चोर' 'मेरी परी' ( अॅनिमेटेड मूवी) याचे निर्माता म्हणून काम पाहिले आहे.७ मार्च १९५२ मधे फिल्मफेअर या मासिकाच्या कव्हर वर प्रदर्शित होणारी कामिनी कौशल ही पाहिली महिला अभिनेत्री आहे. तसेच ही पहिली मुख्य अभिनेत्री आहे जिच्यासाठी लता मंगेशकर यांनी जिद्दी चित्रपटात पार्श्वगायन केले आहे.कामिनी स्वतः सुद्धा गात, त्यांनी १९७७ साली 'ज्ञानीजी' या हिंदी चित्रपटात पार्श्वगायन केलेले दिसते.१९८९ साली टीव्हीवर त्यांनी 'चांद सितारे' हा कठपुटली कार्यक्रम केला होता. त्यांनतर त्यांनी लक्स,सर्फ एक्सेल या काही ब्रँड साठी सुद्धा काम केले आहे.
अभिनया बरोबरच त्यांनी शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले.७७ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
बिराज बहू साठी फिल्मफेअर, शहीद साठी बीफजए अवॉर्ड,त्यांनतर लाईफ टाईम अर्चिव्हमेंट अवॉर्ड, कल्पना चावला अवॉर्ड,बीबीसी 100 महिला पुरस्कार, तर कबीर सिंग साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री स्क्रीन अवॉर्ड. आज ९६ वय असताना सुद्धा त्या काही चित्रपटात केवळ खास आग्रहामुळे काम करतात, त्यापैकीच काही चित्रपट म्हणेज कबीर सिंग,लाल सिंग चड्डा,लागा चुनारी मे दाग हे होय.
अशा या बहुगुणी अभिनेत्रीला राहुल,विदूर,श्रवण ही तीन मुले आणि बहिणीच्या दोन मुली आहेत. कधीच दारू आणि सिगारेट व्यसन नसलेल्या कामिनीला मात्र केसात फुलं लावायला आवडत. त्यावेळी ती त्यांची ट्रेडमार्क स्टाईल म्हणून ओळखली जात असे तसेच त्या ऍनिमल लव्हर असल्यामुळे अनेक प्राणी त्यांनी पाळले होते
लहानपणी ७ वर्षाची असताना उमा कश्यपने त्यांच्या भावानी काढलेल्या 'The tragedy' मधे बालकलाकार म्हणून काम केले होते. पण बाल कलाकार न राहता पुढे कामिनी कौशल म्हणून नावाजलेल्या आणि त्यांचा काळ गाजवलेल्या या लिविंग लेजेण्ड असलेल्या या अभिनेत्रीला त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी मानाचा मुजरा...!
- वैष्णवी घोटकर सहस्रबुद्धे