अब्जाधीश असूनही श्रीमंतीपेक्षा लाफिंग मीम म्हणून प्रसिद्ध असलेला बास्केटबॉलपटू- याओ मिंग!! नक्की काय प्रकरण आहे हे?
सध्या असे झाले आहे की कुणाची कोणती गोष्ट कधी वायरल होईल सांगता येत नाही. यामुळे एकतर माणूस प्रसिद्ध होतो किंवा गोत्यात सापडतो. मीम मटेरियल होणे ही अजून वेगळी गोष्ट. एकदा का गोष्ट व्हायरल झाली, की लगेच त्या गोष्टीचा मीम झाला म्हणून समजा. मग तो फोटो असेल तर आणखीच सगळीकडे पसरतो.
तुम्ही हसण्याच्यासंदर्भात बहुतांश वेळा हा फोटो दिसला असेल. तो फक्त हसणारा फोटो नाही, तर खरोखर तसा माणूस अस्तित्वात आहे. ते जाऊ दे, तो हसणारा माणूस फक्त खराच नाही, तर पठ्ठ्या अब्जाधीश आहे!!!
याओ मिंग हे त्या प्रसिद्ध लाफिंग मीम ठरलेल्या व्यक्तीचे नाव. याओ हा शांघायचा प्रसिद्ध बास्केटबॉलपटू आहे. बास्केटबॉल खेळून पैसे कमवून झाल्यावर त्याने हा पैसा विविध उद्योग व्यवसायांमध्ये गुंतवला. आज तो अब्जावधी रुपयांचा मालक आहे. रेस्टॉरंटपासून तर कंपन्यांपर्यंत अनेक ठिकाणी त्याने पैसा गुंतवला आहे. गेल्या काही वर्षांत त्याचा पैसा प्रचंड गतीने वाढत आहे. त्याने १.५ मिलियन डॉलर हे रेस्टॉरंट व्यवसायात गुंतवले आहेत. हॉस्टन येथे याओ नावाचे रेस्टॉरंट आहे तर शांघायला यीहा नावाचे रेस्टॉरंट आहे.
२००६ साली टॉप १०० नावाच्या म्युझिक वेबसाईटसाठी त्याने तब्बल ३ मिलियन डॉलर गुंतवणूक केली होती. पण त्याचा हा प्रयोग मात्र फसला होता. त्याना हा व्यवसाय बंद करावा लागला होता. पुढे २००९ साली हा भाऊ वाईन उद्योगात पडला.त्याने कॅलिफोर्निया येथे आपला हा उद्योग लाँच केला. अमेरिका चीनमध्ये वाईन निर्मिती करणाऱ्या महत्वाच्या जागा त्याने विकत घेऊन ठेवल्या आहेत.
त्यांनी अब्ल्यूस डिजाईन या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीने आयपीएओसाठी या जुलैमध्ये ॲप्लीकेशन केले होते. या कंपनीत याओ हे सातवे सर्वात मोठे शेयरहोल्डर आहेत. भाऊ फक्त श्रीमंत आहे अशातला भाग नाही. तर तो दानधर्म आणि राजकारणात पण सहभागी असतो. त्याने सार्स रोगासाठी ३ लाख डॉलर्स उभे केले होते. राजकारणात पण तो हात मारत असतो.
पण एवढे सगळे असूनही हा पठ्ठ्या जगात तो त्याच्या श्रीमंती किंवा इतर गोष्टींसाठी नाही, तर मीम मटेरियल म्हणून माहीत आहे. आता नेमका त्याला या गोष्टीचा अभिमान आहे की काय हे त्यालाच माहीत.
उदय पाटील