computer

स्टॅनली का डब्बा हा चित्रपट आठवतोय का ?

नेहमीसारखीच एक सकाळ. शाळेत सोडायला आलेली कुणाची आई प्रेमाने मुलाला झापतेय. आणि चौथीच्या वर्गात ढॅण्टॅढॅण म्हणत पोरासोरांनी सॉल्लीड धिंगाणा घातलाय. एकदम जिवंत, निरागस आणि तितकंच लोभसवाणं चित्र. सुखवस्तू घरातला अमन. हा खेळायला थांबला तर त्याच्या घरून त्याच्यासह सर्व मित्रांसाठी खाणं येतं आणि त्याच मुलांतला एक मुलगा स्टॅनली!

स्टॅनली वर्गातल्या मुलांहून थोडासा वेगळा आहे. नाचताना वर्गाचा हिरो आहे. आवडत्या टीचरसाठी तो कविता स्वत:हून पाठ करून म्हणतो, वर्गातल्या प्रोजेक्टसाठी दीपस्तंभाची छोटीशी प्रतिकृतीच उभारतो. तसा गोंडस आहे पण कधीमधी चेहरा मारामारी केल्यासारखा काळानिळा करून घेऊन, कधी सुजवून घेऊन येतो. म्हणे बाजारात कुण्या मुलीला वाचवताना त्याला हे इतकं लागलेलं असतं. तशी त्याला पुस्तकांची पानं फाडणारी लहान बहीण आहे, पटकन उडी मारून बस पकडणारी, धावत ट्रेन पकडणारी सुपरवुमन आई आहे, आणि बाबा आहेत. हे सगळं कधी दिसत नाही, पण त्याच्या निबंधांत, मित्रांबरोबरच्या गप्पांतून जाणवत राहातं. तसंही वर्गातल्या कुणाचंच घर किंवा घरचे सिनेमात नाहीत, त्यामुळे याच्या आईबाबांचं न दिसणं खटकत नाही.

शाळा बहुतेक सकाळची असावी. त्यामुळं छोट्या सुटीतला नाष्टाच सगळे डब्यातून आणतात. अमनचा डबा विशेष असावा. त्याची आई त्याला छान छान पदार्थ करून देते. तसे सगळेच डबे आणतात पण दोन लोक मात्र कधीच आणत नाहीत. सिनेमाच्या नावावरूनच कळतं, की यातला एक आहे स्टॅनली आणि दुसरे आहेत हिंदीचे टीचर बाबुभाई वर्मा. स्टॅनली डबा का आणत नाही कळत नाही. त्याला इतरांचा डबा खाणंही मनाला डाचतं. म्हणून तो कधी कधी नसलेल्या दोन रूपयांचा वडापाव खातो असं खोटंच सांगून थंडा फराळ करून येतो. पण त्याचे मित्र चांगले आहेत. विशेषत: अमन.त्याच्या घरचे पराठे तेही आईने बनवले म्हटल्यावर स्टॅनली एकदम असोशीने ते खायला जातो, पण....

बाबुभाई म्हणजे एक पात्र आहे.त्याला सगळेजण खडूस म्हणतात. वर्ग अर्ध्यावर सोडून तो सहकार्‍यांनी आणलेले डबे चोरून खातो, पुन्हा सगळे जेवताना मधी मागून तर कधी कधी मला नको आहे, पण आता तुम्ही देतच आहात तर खातो बापडा म्हणून सतत खात असतो. त्यातही हे नको ते नको असे त्याचे नखरे आहेत. आताशा सगळ्यांना त्याच्या या वागण्याची सवय झालीय आणि मनात ’घे मेल्या गिळ’ असंच म्हणत त्याला खाणं ऑफर करतात. तो स्वत: फुकटचं खातो पण स्टॅनली डबा आणत नाही म्हणून त्याचा सतत पाणउतारा करतो.

स्वाईन फ्ल्यूमुळं शाळांना दिलेली सुटी महागात पडते आणि शाळेला रोजचे तास वाढवणं भाग पडतं. आपसूक छोट्या सुटीसोबत आता एक मोठी सुटीही येते आणि स्टॅनलीचा डब्याचा प्रश्न आणखीच आ वासतो. अमनला तर आता चार कप्प्यांचा मोठा डबा येतो. साहजिकच वर्गातला सगळ्यात मोठा डबा आहे तो. खडूसचा त्या डब्यावर डोळा आहे. स्टॅनली एकदोनवेळा घरून जेऊन येतो म्हणून गेला पण त्याला फाटकापाशीच घुटमळताना अभिषेकनं पाह्यलंय. म्हणून स्टॅनलीची आई गावाहून येईपर्यंत अमनला स्टॅनली्सोबतच डबा शेअर करायचाय. यावरचा एकच उपाय आहे की वर्गात डबा खायचाच नाही. या उंदीर-मांजराच्या खेळात मुलं डबा खाण्याचं रोज एक वेगळं ठिकाण सांगतात आणि खडूस त्यांना वेड्यासारखा शोधत राहतो. मुलं जाऊन जाऊन जाणार कुठं? एक दिवस ही मंडळी त्याच्या तावडीत सापडतात आणि डबा घेऊन आल्याशिवाय शाळेत यायचं नाही अशी स्टॅनलीला तंबी मिळते.

स्टॅनली शाळेत यायचा बंद होतो. त्याच्यावर प्रेम करणार्‍यांना, त्याला रागवणार्‍यांना, इतकंच काय पण खडूसलाही त्याची अनुपस्थिती खटकते. मध्यंतरी एका आंतरशालेय समारंभासाठी मुलांची निवड होण्याची वेळ येते पण नेमका स्टॅनली तेव्हा या डबा प्रकरणात शाळेत येत नसतो. स्टॅनलीच्या आवडत्या रोझी टीचरला हा प्रकार कळतो आणि आधीच पश्चात्ताप होत असलेल्या खडूसला ती खडे बोल सुनावते आणि अभिषेककडून त्या समारंभाची माहिती मिळून स्टॅनली थेट मुख्य ठिकाणीच जातो आणि तिथे त्याची निवड होते हे सांगायला नकोच. त्यानंतर एक दिवस स्टॅनली खडूससाठी मोठ्ठा डबा घेऊन जातो आणि त्याच्याकडे वर्गात बसण्याची परवानगी मागतो. यावेळी मात्र खडूस सरळ राजीनामा देऊन शाळाच सोडून जातो.

त्या आंतरशालेय समारंभाच्या कार्यक्रमानंतरही आंतरशालेय समारंभाच्या आईबाबांना त्याला आणायला उशीर होतो आणि शाळेचे फादर त्याला घराजवळ सोडून जातात. तो घरी पोचल्यावर कळतं, आई, बाबा, बहीण हे सगळं खोटं आहे आणि तो अनाथ आहे. तो एका दूरच्या काकाच्या हॉटेलमध्ये काम करतो आणि हा काका त्याचा अतिशय छळ करतो. घरी पोचल्यापोचल्या तो हसतमुखाने कामाला लागतो आणि स्टॅनलीच्या नवीन डब्याचं गुपित कळतं. रात्रीचे राहिलेले पदार्थ दोघे मिळून डब्यात भरतात आणि दुसर्‍या दिवशी काकाच्या नकळत हा डबा स्टॅनलीसोबत शाळेत जातो. त्यानंतरही रोज तो डबा घेऊन तर जातोच आणि फक्त मित्रांनांच नाही, तर टीचर्स, शाळेतला शिपाई या सगळ्यांना आईने किती लवकर उठून आणि मेहनतीने बनवलाय याचे किस्से सांगत खिलवत राहतो.

स्टॅनली लहान आहे, त्या वयाची निरागसता त्याच्या चेहर्‍यावरून ओसांडून जाताना दिसते. तो खोटं बोलतो पण त्यात बनेलपणा नाही. जेव्हा त्याच्या खोटं बोलण्याचं कारण कळतं तेव्हाही त्याच्या चेहर्‍यावरचं हसू लोपत नाही. परिस्थितीची नीट जाणीव असलेला तरी तिच्यासमोर त्यानं आपलं बाल्य हरवलं नाहीय. स्टॅनलीची भूमिका केलीय अमोल गुप्तेच्या मुलाने-पार्थो गुप्तेने. त्याचे मित्र अमन आणि अभिषेक- हे ही दोघे नवीनच चेहरे आहेत. अभिनयाच्या बाबतीत लहानांनी मोठ्यांवर बाजी मारलेय. खडूसमुळे आपला मित्र शाळेत यायचा बंद झालाय पण मास्तरवर राग कसा दाखवायचा अशा स्थितीत घुश्शात असलेला वर्ग एकदम गोडुला दिसतो. साधारणपणे लहान मुलांच्या सिनेमात मुलं मोठ्यांसारखे लेक्चर झोडत असतात. असाही इथं आव नाही ही एक जमेची बाजू. गाणी बरी आहेत पण अगदी आठवणीत राहावीत अशीही नाहीत.

पिक्चरभर स्टॅनली डबा का आणत नसावा हा प्रश्न सतावत राहातो. मनाशी अंदाजही बांधले जातात. तसं ओळखणं अगदी अवघडही नाही. चित्रपट बालकामगारांच्या आकडेवारीच्या स्लाईड्सनी संपतो. चित्रपट एका बालकामगारावर असला तरी ही अनिष्ट प्रथा थांबवण्यासाठी काही संदेश देत नाही

आवर्जून सांगावंसं असं काही;-

१. तसं पाहायला गेलं तर सिनेमात काम करणं ही पण एक मजूरीच. बरेच बालकलाकार त्यासाठी शाळा बुडवतात आणि स्वत:चे खास टीचर्स ठेवतात. इथं अमोल गुप्तेने या चित्रपटाचं शूटिंग मुलांची शाळा बुडू न देता सुटीत आणि तेही मधल्या दोन मध्यतरांसह दररोज पाच तास याप्रमाणे पूर्ण केलंय.इतर चित्रपटनिर्माते आणि विशेषत: मालिकावाल्यांनी अमोलकडून काही शिकावं आणि त्या मुलांचं बालपण हिरावून घेणं थांबवावं.

२. एका फ्रेममधे घराबाहेर पडताना कोलॅप्सिबल दरवाज्याच्याआड स्टॅनली असतो आणि बाहेर रस्त्यावर उभा असतो ’कमवा आणि शिका’ चे प्रवर्तक आणि पुरस्कर्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचा धीरगंभीर आश्वासक पुतळा!!!

सबस्क्राईब करा

* indicates required