इस्राएल आणि पॅलेस्टाईन दोन देश अस्तित्वात आले :एक रक्तरंजित इतिहास- भाग -२
या काळात इथे ज्यू,अरब मुस्लिम व ख्रिश्चन तिन्ही लोकांची वस्ती होती.सुमारे एक तृतीयांचं ज्यू, दोन तृतीयांश मुस्लिम व अगदी थोडे ख्रिश्चन अशी लोकसंख्येची साधारण विभागणी होती.हे लोक आपापल्या एकमेकांपासून दूर,वेगळ्या वस्त्या करून राहत. पहिल्या विश्वयुध्दा नंतर ज्यु लोकांमध्ये आपल्या स्वतःच्या अशा एका मातृभूमी ची मागणी जोर धरू लागलेली होती.
अनेक शतकांपासून मुस्लिम व ख्रिश्चन यांच्या सशस्त्र चकमकींमध्ये आपल्या लोकांवर दोन्हीही बाजूंकडून सतत हिंसा लादली जाते आहे ही भावना ज्यू लोकांमध्ये सखोल रुजली होती. आणि तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्ते ह्या भावनेशी सहमत होते.शतकानुशतकांपासूनच्या हिंसाचारावर फाळणी करणे ( टू स्टेट सोल्यूशन ) हाच एक उपाय शिल्लक आहे हेच राज्यकर्त्यांचे मत होते .
या भागाला स्वातंत्र्य देण्याचे निश्चित झाल्या नंतर ब्रिटिशांच्या वतीने संयुक्त राष्ट्रामध्ये फाळणीचा ठराव मांडण्यात आला.या भूभागाचा अरब लोकांचे पॅलेस्टाईन व ज्युईश लोकांचे इस्राएल अशा दोन राज्यांत विभाजन करण्याचा ब्रिटिशांचा मानस होता.या ठरावामध्ये हे दोन्ही देश स्वतंत्र असून जेरुसलेम हे दोघांची संयुक्त राजधानी असेल,असे ठरवले होते.
या प्रस्तावाला अरब मुस्लिमांचा विरोध होता कारण यात मोठा भूभाग ज्युईश लोकांना दिला गेला होता, व जास्त लोकसंख्या असलेल्या मुस्लिम जनतेला त्यामानाने बराच कमी भाग दिला गेला होता.अशा विभाजना मुळे प्रस्तावित ज्युईश भागात राहणारी अनेक मुस्लिम कुटुंबे निर्वासित होत होती.जो भाग पॅलेस्टाईन ला दिला होता तो दुर्गम, वाळवंटी, आणि शेती व उद्योगासाठी कमी प्रतीचा होता. मुळात मुस्लिम बहुल असलेल्या जगाच्या ह्या कोपऱ्यात एक सधन ज्युईश बहुल राष्ट्र प्रस्थापित होणे आजूबाजूच्या अरब राष्ट्रांच्या दृष्टीनेही गैरसोयीचे होते.त्यामुळे हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राकडून मंजूर झाला असला तरी तो बहुसंख्य जनतेला मान्य नव्हता.
पहिले पॅलेस्टाईन युद्ध
ब्रिटिशांनी सत्ताधीन पॅलेस्टाईन स्वतंत्र करण्याचे ठरवताच युद्धाला तोंड फुटणे अटळ होते. पॅलेस्टाईनला हि विभागणी मंजूर नसल्याने त्यांनी ताबडतोब ज्यू बहुल भागांवर हल्ले सुरु केले. ज्यूंनी प्रत्युत्तर दाखल मुस्लिम बहुल भागांवर हल्ले केले.१९४८ च्या मार्च महिन्यात ज्यू सशस्त्र सेनांनी मोठा विजय मिळवत ब्रिटिश प्रस्तावित सीमारेषांवर स्वतःचा ताबा मिळवला. १४ मे १९४८ च्या मध्यरात्री ब्रिटिशांनी हा सर्व भूभाग स्वतंत्र घोषित करून आपल्या सर्व सेनेसह तिथून काढता पाय घेतला.
पुढच्याच दिवशी तिथे मोठ्या युद्धाला तोंड फुटले. या युद्धात पॅलेस्टाईन च्या बाजूने इजिप्त, सीरिया, इराक, लेबनॉन , सौदी अरेबिया आणि येमेन या मुस्लिमबहुल राष्ट्रांची पूर्ण सेना उतरली. या हल्ल्याला इस्रायली सेनेने पूर्णपणे रोखून धरले. इजिप्ती सेनेने समुद्राजवळ छोटा भाग जिंकून एक छोटा विजय मिळाला, ती आजची गाझा पट्टी होय. इराकी सेनेला देखील एक छोटा भाग जिंकता आला, जो बहुतांश डोंगराळ होता.तो आजचा वेस्टर्न बँक, अर्थात ग्रेटर पॅलेस्टाईन आहे. त्या व्यतिरिक्त पूर्ण भाग इस्रायली सेनेने काबीज केला,जो आज पर्यंत त्यांच्या ताब्यात आहे,या युद्धामुळे जेवढा भाग ब्रिटिशांनी पॅलेस्टाईन ला दिला होता , त्यापेक्षाही कमी भाग पॅलेस्टिनी लोकांच्या ताब्यात राहिला. काही पॅलेस्टिनी भाग इजिप्त, जॉर्डन आणि इतर अरब राष्ट्रांनी देखील स्वतः च्या ताब्यात ठेवला.या युद्धाच्या काळात जवळ जवळ ७ लाख निर्वासित मुस्लिम पॅलेस्टिनी लोकांना आपली घरे दारे सोडून पलायन करावे लागले. त्यापैकी अनेकांचे वंशज अजूनही आजूबाजूच्या अरब राष्ट्रांच्या निर्वासित छावण्यांमध्ये राहतात. युद्ध संपल्या नंतर इस्राएल सरकार ने ७ ते १० लाख ज्यू लोकांना आजूबाजूच्या अरब आणि युरोपिअन देशांमधून आणून जमिनी देऊन स्थायिक करवले.
१९६७ सहा दिवसांचे युद्ध:
इस्राएलने आजूबाजूच्या अरब देशांवर सैन्य वापरून विजय मिळवलेला असला तरीही शेजारी राष्ट्रांचे संबंध इस्राएलशी कधीही सुधारले नाहीत. १९६७ मध्ये इजिप्तने सुवेझ कालव्यातून इस्रायली जहाजांना पाठवण्याची परवानगी नाकारली तेव्हा युद्धाचे वारे पुन्हा वाहू लागले. इस्राएल भोवती शेजारी राष्ट्रांच्या सैन्याची हालचाल वाढू लागताच इस्राएल ने तातडीने इजिप्त वर हल्ला केला. या हल्ल्यात लवकरच इजिप्त बरोबर जॉर्डन, सीरिया, इराक, सौदी, कुवेत, लेबनॉन हे देशही सामील झाले. या सर्वांनी आपापल्या देशाला लागून असलेला इस्राएलचा भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. या प्रयत्नात जवळ जवळ वीस हजार अरब सैनिकांचा मृत्यू झाला.अवघ्या सहा दिवसात या देशांनी आपापले सैन्य मागे घेऊन शांतता प्रस्तावाला मान्यता दिली. इस्राएलने गाझा पट्टी आणि वेस्टर्न बँक पुन्हा स्वतः च्या ताब्यात घेतला. या युद्धामध्ये आणि नंतर २ ते ३ लाख पॅलेस्टिनी लोकांना गाझा पट्टी आणि वेस्टर्न बँक सोडून पलायन करावे लागले. त्यांचे वंशज आजही लेबनॉन आणि इजिप्त मध्ये निर्वासित छावण्या मध्ये राहतात.
या निर्वासित छावण्यां मधून राहणाऱ्यांकडून इस्राएल वर पुन्हा पुन्हा हल्ले होत असतात. आमच्या मातृभूमीतून आम्हाला हाकलून लावले आहे, अशी या निर्वासितांची भावना आहे, आणि त्यांतीळ काहींना इस्राएल वर सूड घेण्याची इच्छा आहे. त्यांना शस्त्रास्त्र वगैरे पुरवण्यास आजूबाजूच्या अतिरेकी संघटना तयार असतात.
- डॉ अवनी पाध्ये बारबिंड