१९५० च्या दशकात एका फिल्म असिस्टंटला क्लॅप मारण्यापासून ते एडिटिंग नोट्स लिहिण्यापर्यंत तब्बल ५ वेगवेगळी कामं एकट्यालाच सांभाळावी लागायची, आणि मोबदल्यात मिळायचा तो फक्त वरिष्ठांचा 'मार'.
आजकाल लग्नात डीजेने चुकून दुसरं गाणं लावलं तर लोक फक्त सोशल मीडियावर ट्रोल करतात. पण पूर्वी तसं नव्हतं, सीन एकदम डायरेक्ट होता. आपला हा गडी लग्नात ‘जा मुली जा’ एकदम भारी वाजवायचा, म्हणून त्याला प्रत्येक लग्नात एक रुपया बक्षीस मिळायचं. त्या काळात एक रुपया म्हणजे मोठी व्हॅल्यू होती, बॉस! पण एकदा काय झालं, एका पोलीस ऑफिसरच्या मुलीचं लग्न होतं. कल्ला करायचा म्हणून बँड बोलावला. लग्नात सगळं स्मूथ चाललं होतं, लोकांनी गाणी एन्जॉय केली, पण वरात निघताना याच्या डोक्यात काय 'चहाटाळपणा' शिरला कुणास ठाऊक!
वरात म्हणजे आनंदाचा सीन, बरोबर? पण या पठ्ठ्याने ट्रम्पेटवर धून छेडली- ‘आज हम अपनी मौत का सामान ले चलें’. आता लग्नात मरणाचं गाणं वाजवल्यावर आणि समोर मुलीचा पोलीस बाप असेल तर काय होणार? , त्या ऑफिसरने जवळ येऊन खाडकन एक थोबाडीत ठेवून दिली. विषय हार्ड झाला ना?
हा उनाडपणा कमी व्हावा म्हणून घरच्यांनी याला राजाराम गोलटकर नावाच्या मित्राकडे कामाला लावलं. राजाराम मास्टर म्हणजे भगवान दादांचे असिस्टंट. तिथे ‘धूमधाम’ सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. बाबुराव पैलवान, मास्टर भगवान, लीला मिश्रा अशी तगडी स्टारकास्ट होती. आता इथे तर लेव्हलच वेगळी होती. क्लॅप द्यायचा, कंटीन्यूटी लिहायची, एडिटिंग नोट्स... सगळं एकट्यानेच करायचं.
राजाराम मास्टर म्हणजे एकदम तापट माणूस, ओल्ड स्कूल डेंजर! त्यांनी नुसतं ‘दाss’ म्हटलं की पुढचा ‘दा’ ऐकायच्या आत त्यांच्यासमोर हजर व्हावं लागायचं. थोडा जरी उशीर झाला की लगेच कानाखाली! म्हणजे बँड असो किंवा फिल्म सेट, याच्या नशिबात ‘मार’ फिक्स होता. पण याच स्ट्रगल आणि मारामुळे पुढे जाऊन फिल्म इंडस्ट्रीला एक मेहनती कलाकार मिळाला ज्याचं नाव दादा कोंडके !
आज ८ ऑगस्ट म्हणजे दादांचा जन्मदिन आहे.काही वर्षांपूर्वी हा किस्सा आम्ही अनिता पाध्ये यांच्या "एकटा जीव" पुस्तकात वाचला होता.
"एकटा जीव" वाचून हा किस्सा आम्ही आमच्या भाषेत लिहिला आहे . तुम्हाला जर दादांची जन्मकहाणी वाचायची असेल तर "एकटा जीव" नक्की वाचा !



