मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

गोंधळ : महाराष्ट्राच्या मातीतील नाद ऑस्करच्या दिशेने

4 मिनिट वाचन

दिग्दर्शक संतोष डावखर यांचा 'गोंधळ' चित्रपट २०२७ च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडला गेला आहे.

शेअर करा:
गोंधळ : महाराष्ट्राच्या मातीतील नाद ऑस्करच्या दिशेने

रात्र गडद होत चालली आहे...गावातल्या एखाद्या जुन्या वाड्याच्या अंगणात दिव्यांची रोषणाई. आजूबाजूला जमलेली माणसं. कुठेतरी दूरवरून ढोलाचा आवाज कानावर येतो. मग टाळांचा नाद. मंत्रोच्चार. गाणं. नृत्य. आणि हळूहळू वाढत जाणारी त्या विधीची लय...
ही केवळ पूजा नाही. ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीने शतकानुशतकं जपलेली एक जिवंत परंपरा आहे—गोंधळ!

आता याच गोंधळाचा नाद महाराष्ट्राच्या एखाद्या गावातून थेट जगाच्या सर्वांत प्रतिष्ठेच्या चित्रपट सोहळ्याकडे निघाला आहे.
मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची २०२७च्या ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी ही घोषणा केली. तब्बल ३३ चित्रपटांच्या यादीतून ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष पी. शेषाद्री यांनी ही माहिती दिली.

एका मराठी चित्रपटासाठी ही नक्कीच महत्त्वाची घटना आहे. पण ‘गोंधळ’ची कथा ऐकताना त्याहूनही एक वेगळी गोष्ट जाणवते—महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचा एक ठेका आता जागतिक पडद्यावर ऐकू येण्याची शक्यता आहे.
चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांचे आहे. कथा ग्रामीण महाराष्ट्रात घडते. ‘गोंधळ’ची कथा एका रात्रीची आहे.
नवविवाहित सुमन आणि आनंद यांच्या आयुष्यातील एका प्रसंगापासून घटनांची गुंतागुंत सुरू होते.सुमनची भूमिका इशिता देशमुख यांनी साकारली आहे. लग्न झालं आहे; पण लग्नाबरोबर आयुष्यातला आनंद होत नाही. उलट काही जुने हिशेब पुन्हा समोर येतात. कुटुंबातील दडलेले ताणतणाव आणि एक धोकादायक कट... या सगळ्यामुळे वातावरणात हळूहळू अस्वस्थता निर्माण होते.
आणि या सगळ्याच्या मध्यभागी आहे—गोंधळ. इथेच चित्रपटाची कल्पना वेगळी ठरते.

गोंधळाचा विधी केवळ पार्श्वभूमीवर चालू असलेला कार्यक्रम नाही. दिग्दर्शकाने त्याला कथानकाचा एक सक्रिय भाग बनवलं आहे. गाणं सुरू होतं, ढोल वाजतो, नृत्याची लय वाढते आणि त्याच वेळी पडद्यावरची कथा एका वेगळ्याच दिशेने सरकत जाते. जणू ढोलाचा प्रत्येक ठोका कथेतल्या एखाद्या गुपितावर पडतोय.
गोंधळाची रात्र पुढे सरकते आणि त्याचबरोबर व्यक्तिरेखांच्या मनातला ताणही वाढत जातो. बाहेर विधीचा गोंधळ आहे; आत प्रत्येकाच्या मनात वेगळाच गोंधळ!यामुळे ‘गोंधळ’ हा शब्द चित्रपटाच्या नावापुरता राहत नाही. तो कथेतल्या मानसिक आणि सामाजिक गुंतागुंतीचं रूपकही बनतो.

मराठी चित्रपटाला ऑस्करच्या प्रवासाची ही पहिलीच वेळ नाही. श्वास’ (२००५), ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२००९) आणि ‘कोर्ट’ (२०१५) या तीन मराठी चित्रपटांची यापूर्वी भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवड झाली होती. ‘श्वास’ने मानवी भावविश्वाची हळवी बाजू दाखवली. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ने भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या दिवसांकडे मिश्कील आणि कल्पक नजरेने पाहिलं. ‘कोर्ट’ने न्यायव्यवस्था, समाज आणि सामान्य माणसाच्या आयुष्याचा गंभीर पट उलगडला.

आता या मालिकेत ‘गोंधळ’ची भर पडते आहे. यावेळी कथा ग्रामीण महाराष्ट्राची आहे. पण तिच्या केंद्रस्थानी असलेला प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. लग्न, कुटुंब, जुने संबंध, संशय, सत्तासंबंध, भीती आणि माणसांच्या मनात दडलेली रहस्यं—ही भाषा जगभरातील प्रेक्षकांना समजू शकते. आणि म्हणूनच कदाचित स्थानिक कथा जागतिक होण्याचा मार्ग इथे दिसतो.

‘गोंधळ’मध्ये किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू आणि सुरेश विश्वकर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती डावखर फिल्म्सची आहे.
आता पुढचा टप्पा अमेरिकेत आहे. १४ मार्च २०२७. रविवार. ९९वा ऑस्कर सोहळा.

हॉलिवूडमध्ये त्या रात्री जगभरातील चित्रपटांची नावं पुकारली जातील. कॅमेरे चमकतील. रेड कार्पेटवर जगभरातील कलाकार दिसतील.
आणि कुठेतरी त्या प्रचंड झगमगाटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या एखाद्या गावातील रात्रीचा आवाज आठवेल ढोलाचा ठेका...टाळांचा नाद...गाण्याची लय... आणि एका विधीतून उलगडणारी माणसांची कथा.
गोंधळ गावात सुरू झाला असेल; पण आता त्याचा प्रवास ऑस्करपर्यंत पोहोचला आहे.
कधी कधी... एका छोट्याशा गावातला ढोलाचा ठोका हॉलिवूडच्या झगमगाटापेक्षाही दूरवर ऐकू जातो.

पुढची गोष्ट
मनोरंजनआचार्य अत्रे: ज्यांच्या लेखणीने आणि वाणीने महाराष्ट्र घडवलापत्रकार, नाटककार, वक्ता आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे खंदे नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या कार्याचा आढावा.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!
मनोरंजन

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!

बँडमध्ये वाजवताना खाल्लेला मार ते मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार; दादा कोंडके यांच्या सुरुवातीच्या संघर्षाचा एक रंजक किस्सा.

८ ऑगस्ट, २०२६

वेड्यांच्या जगातला तो एक बंडखोर शहाणा: 'वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट'चा थरार
मनोरंजन

वेड्यांच्या जगातला तो एक बंडखोर शहाणा: 'वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट'चा थरार

हुकूमशाही व्यवस्था आणि मानवी स्वातंत्र्याची किंमत दाखवून देणाऱ्या 'वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट' या क्लासिक सिनेमाची गोष्ट.

८ जुलै, २०२६

'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी' - टाटांच्या टायटन ब्रँडची रोमहर्षक गाथा
मनोरंजन

'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी' - टाटांच्या टायटन ब्रँडची रोमहर्षक गाथा

जेआरडी टाटांच्या मार्गदर्शनाखाली झेरक्स देसाई यांनी शून्यातून उभा केलेला टायटन ब्रँड वेब सीरिजच्या माध्यमातून पडद्यावर कसा जिवंत झाला?

२९ जुलै, २०२६

ट्रक ड्रायव्हरला आवडणारा 'ढिंच्याक' आवाज आणि गुलशन कुमार: झंकार युगाची गोष्ट!
मनोरंजन

ट्रक ड्रायव्हरला आवडणारा 'ढिंच्याक' आवाज आणि गुलशन कुमार: झंकार युगाची गोष्ट!

९० च्या दशकात गाजलेल्या 'झंकार बीट्स'चा जन्म कसा झाला आणि गुलशन कुमार यांनी संगीताचे लोकशाहीकरण कसे केले, याची ही रंजक सफर.

५ मे, २०२६