एका रात्रीत मुंबईच्या हवेत हे धुळीचे लोट आले कुठून ?
मुंबईकरांना आजपर्यंत अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले आहे. पाऊस, पूर, कडक घामट्ट ऊन याचा सामना तर दरवर्षी करावा लागतोच. पण याबरोबरच या वर्षी हुडहुडी भरवणारी थंडीही अनुभवयाला मिळते आहे. इतकी थंडी की मुंबईकर गेले काही दिवस घरातील स्वेटर आणि शाली शोधत आहेत. यातच गेल्या काही दिवसांपासून पावसाची बरसात सुरु आहे. त्यातच गेले दोन दिवस धुळीच्या वादळाने यात भर घातली आहे. या धुळीच्या वादळाने मुंबईसह पुणे आणि महाराष्ट्रात वातावरण बदलून टाकले आहे.
हे धुळीचे वादळ आखाती प्रदेशातूनमधून कराची पाकिस्तानकडून मार्गे गुजरात, अरबी समुद्र पार करून महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणात पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे. फोटो पाहून तुम्हाला याची कल्पना येईलच. रविवारी तर ४०० मीटर अंतरावरही काही दिसत नव्हते.
या धुळीच्या वादळाचा परिणाम म्हणजे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खूप खालावली आहे.मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक(एक्यूआय) १८० वर आहे. पण रविवारी तो ३३३ इतका झाला. मालाड आणि माझगावमध्ये सर्वात खराब हवा होती. दोन्ही ठिकाणी हवेची गुणवत्ता मालाडमध्ये एक्यूआय ४३६तर माझगावमध्ये ३७२एक्यूआय आहे. इतर ठिकाणी एक्यूआय चे असे आकडे होते चेंबूर येथे ३४७, अंधेरी - ३४०, भांडुप - ३३६, वरळी- ३१९, BKC - ३०७, कोलाबा २२१, बोरिवली -१६२, नवी मुंबई -१०१
SAFAR नुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक असा असतो.
०-५० - चांगला
५१-१०० - समाधानकारक
१०१-२०० - सामान्य
२०१-३००- खराब
३०१-४०० - अतिखराब
४०० वर म्हणजे गंभीर
धुलीकणांचे प्रमाण वाढल्याने वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. हे धुळीचे वादळ पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. शिवाय ढगाळ वातवरणामुळे सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणावर जमिनीवर पडत नाही. यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे.
सोमवारी सायंकाळपर्यंत धुळीचे वादळ निवळून जाईल असा अंदाज आहे.
शीतल दरंदळे