भारतात आहेत अशी १० जगावेगळी गावं ! कारणं तर जाणून घ्या !!
भारतातल्या ६ लाख ५० हजार गावांपैकी १० गावे अशी आहेत जी आज जगात त्यांच्या वेगळेपणाबद्दल ओळखली जातात. या गावांमध्ये काही खास गोष्टी आहेत ज्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आता उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातील शनिशिंगणापूरचं घ्या राव. या गावात घरांना दारवाजे नाहीत. घरातील महत्वाच्या गोष्टी चोरीला जाणार नाहीत हा विश्वास जगात आणखी कुठे पाहायला मिळेल ?
राव हे झालं एक उदाहरण चला अशी आणखी उदाहरणे...
१. शेटफळ, महाराष्ट्र
साप आणि माणूस एका घरात राहू शकत नाही. कारण साप चावल्याने माणूस देवा घरी जातो. पण हे आपल्यासाठी राव, सोलापुरातील मोहोळ तालुक्यात असलेलं शेतपळ गाव याला अपवाद आहे. या गावात साप हे जणू घरातीलच एक सदस्य मानले जातात. या गावात तुम्ही सापांना सहजपणे वावरताना पाहू शकता. काही वर्षांपूर्वी या गावातील एक फोटो व्हायरल झाला होता ज्यात लहान मुले ‘किंग कोब्रा’ सोबत खेळत आहेत. आश्चर्य म्हणजे या गावातील एकालाही साप चावल्याचं आजवर दिसून आलेलं नाही. आहे की नाही अजब ?
२. बरवान काला, बिहार
हे आहे सिंगल लोकांच गाव. सध्या लग्नाचा मौसम सुरु आहे. गावागावात नवीन जोडपी तयार होत आहेत. पण या गावात गेल्या ५० वर्षांमध्ये एकही लग्न झालेलं नाही. या गावात पोहोचण्यासाठी दळणवळणाची सोय नसल्याने या गावात कोणीही आपली मुलगी देत नाही. या गावात १६ ते ८० वर्षांपर्यंतचे ‘सिंगल’ लोक राहतात.
या गावात राहू शकेल असा तुमची कोणता मित्र आहे का ?
३. मट्टूर, कर्नाटक
हे आहे संस्कृत बोलणारं गाव. संस्कृत ही भारतातील प्राचीन भाषा, पण काळाच्या ओघात या भाषेने इतर अनेक भाषांना जन्म दिला आणि स्वतः मात्र लोप पावली. आज भारतात मट्टूर हे एकमेव गाव आहे जिथे ९० टक्के लोक संस्कृत भाषेत बोलतात. या गावाने संस्कृतला आजही मुख्य भाषा म्हणून जपून ठेवलं आहे.
४. मावल्यान्नॉंग, मेघालय
मेघालय मधल्या मावल्यान्नॉंग गाव हे आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखलं जातं. स्वच्छ भारत अभियान सुरु होण्याआधीच हे गाव स्वच्छतेच्या दिशेने अग्रेसर झाले होते. स्वच्छतेबरोबर या गावात साक्षरतेचं प्रमाण १००% आहे.
५. पुन्सारी, गुजरात
भारतातील सर्वात हायटेक गाव म्हणजे पुन्सारी. या गावात १० वर्षांपूर्वी पर्यंत मुलभूत सोई नव्हत्या पण आज या गावात वायफाय, सीसीटीव्ही, उत्तम दळणवळण, सौरउर्जेवर चालणारी साधने इत्यादी आधुनिक गोष्टी पाहायला मिळतात.
६. हिवरे बाजार, महाराष्ट्र
या गावाला श्रीमंतांचं गाव म्हणतात. ‘हिवरे बाजार’ हे भारतातील सर्व गावांसाठी एक आदर्श आहे. १९७२ च्या दुष्काळानंतर हे गाव चोरीमारी, दरोडे, स्थलांतर, मारामाऱ्या अशा समस्यांनी ग्रासले होते. गावाची सुधारणा १९८९ सालापासून सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रयत्नांमुळे होऊ लागली. आणि आज या गावातील एकही शेतकरी गरीब नाही. गावातील २३५ कुटुंबांपैकी ६० कुटुंब कोठ्याधीश आहेत.
७. कोदिन्ही, केरला
या गावाला म्हणतात ‘शेम-टू-शेम’ लोकांचं गाव. या गावातील २५०० लोकांपैकी तब्बल ४१४ लोक जुळे आहेत. या अजब प्रकाराने तर जगभरातल्या शास्त्रज्ञांना सुद्धा बुचकळ्यात पाडलंय राव. जुळे जन्माला येणे म्हणजे आपल्यासाठी अगदी दुर्मिळ गोष्ट म्हणता येईल. पण या गावात जुळे जन्माला येण्याचा दर हा इतर गावांपेक्षा सर्वात जास्त आहे.
८. जम्बुर, गुजरात
मंडळी, या गावात राहणारे लोक हे आफ्रिकेतील सिद्दी जमातीचे आहेत. हे लोक गुजरात कर्नाटक भागात स्थाईक झाले होते. गुजरात मधील जम्बुर गाव संपूर्णपणे सिद्दी जमातीचं म्हणून ओळखलं जातं. मूळ आफ्रिकेतील असले तरी या गावातील लोक अस्खलित गुजराती बोलतात. याच सिद्दी जमातीतील एक म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘सिद्दी जौहर’ होय.
९. मायोंग, आसाम
या गावाची ओळख ‘जादूटोणा करणाऱ्यांचं गाव’ अशी आहे. आजच्या आधुनिक जगात जादूटोणा मानला जात नसला तरी या गावातील लोक जादूटोणा आणि तंत्रविद्येवर भालेतच विश्वास ठेवून आहेत. गावकऱ्यांना वाटतं की तंत्रमंत्राने कोणतीही इच्छा पूर्ण करता येते. या गावात काळ्या जादूचे प्रयोग केले जातात. भारतातील हे एक सर्वात मोठं जादूटोणा करणाऱ्यांचं व शिकणाऱ्यांचं गाव आहे.
१०. शनिशिंगणापूर, महाराष्ट्र
बाहेर जाताना आपण दार नीट लावलंय की नाही हे तपासतो पण शनिशिंगणापूर मध्ये घरांना दारचं नाहीत राव. शनिशिंगणापूर मध्ये लोक आपल्या मौल्यवान गोष्टी घरात किंवा घराबाहेर ठेवून बिंदास्त राहतात. याशिवाय या गावात देशातील पहिली अशी बँक तयार झाली जिथे चक्क कुलूप नाही. या गावात कधी चोरी होत नाही अशी समजूत आहे.
मंडळी, या १० गावांनी सिद्ध केलंय आपला देश जगात वेगळा का आहे ते !!
आणखी वाचा :
अजब गजब गाव : या गावात गुगल, ओबामा, सोनिया गांधी, शाहरुख खान हे सगळे एकत्र राहतात !!