बाबूमोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए! आनंदमधला हा राजेश खन्नाचा डायलॉग किती तंतोतंत एखाद्या कलाकाराच्या आयुष्याला लागू पडतो नाही का? २०२० सरतच आलं. पण हे वर्ष नव्या हिट चित्रपटांमुळे कमी आणि लाडक्या कलाकारांच्या एक्झिटने जास्त गाजलं. बॉलिवूड म्हणजे झगमगती दुनिया, स्वप्नांचे शहर, रंगीत सोहळे, स्टारडम असलेले कलाकार, बिग बजेट सिनेमे. पण या वर्षी झगमगाट पूर्णत: झाकोळून गेला. इतक्या दशकांत पहिल्यांदा बॉलीवूडचे काम पूर्णतः थांबले गेले. कोरोनामुळे आर्थिक घडी बिघडली असताना अनेक दिग्गज कलाकारांचेही अकाली निधन झाले. हे कलाकार गेल्यावर झालेले बॉलिवूडचे नुकसान हे कधीच भरून न निघणारे आहे. आजच्या लेखात जाणून घेऊयात हे कलाकार.
बॉलिवूडचे निखळलेले तारे

इरफान खान -
कर्करोगासारख्या (न्युरो इंडोक्राईन ट्युमर) दुर्धर आजाराने इरफान खानचं वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी निधन झालं. हॉलीवूड आणि बॉलीवूड दोन्हीकडे त्याने त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. पद्मश्री, फिल्मफेअर व राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला. हिंदी मिडियम हा चित्रपट त्यांचा अलीकडचा गाजलेला चित्रपट आहे. लंचबॉक्स, पानसिंग तोमार हे त्याचे बहुचर्चित सिनेमे तुम्ही पाहिले असतीलच.

ऋषी कपूर -
इरफानच्या धक्यातून बॉलिवूड सावरत असतानाच अभिनेता ऋषी कपूर यांचे वयाच्या ६८व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाच्या आजाराने यांचा बळी घेतला. १९७४ मध्ये बॉबी फिल्मसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार तसेच २००८ मधील फिल्मफेअर लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड यासह इतर पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

सुशांतसिंग राजपूत-
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची अवघ्या ३४व्या वर्षी आत्महत्या ही सगळ्यांनाच चटका लावणारी ठरली. सुशांतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड हादरून गेले. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या सुशांतने २०१३ साली काय पो छे ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम पदार्पणासाठी स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. एम. एस. धोनी चित्रपटात केलेली त्याची भूमिका विशेष गाजली होती.

एस. पी. बालसुब्रह्मण्यम-
संगीत क्षेत्रात अत्यंत आदराने घेतले जाणारे एस.पी. यांचे पूर्ण नाव श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रह्मण्यम आहे. एस. पी. यांनी १६ भाषांमध्ये ४० हजारांपेक्षा जास्त गाणी गाण्याचा रेकॉर्ड केला आहे. २०११ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्थर के फूल, हम आप के है कौन, मैने प्यार किया, साजन, रोजा आदी शेकडो चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. ९० च्या दशकामध्ये अभिनेता सलमान खानचा आवाज म्हणून एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा आवाज ओळखला जात असे.

सरोज खान-
चार दशके हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे ७१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सरोज खान यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे २ हजारांहून अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले. या चार दशकांमधील ८० व ९० च्या काळात त्यांच्या नृत्यदिग्दर्शनातून श्रीदेवी व माधुरी दीक्षित यांच्यासारखे उत्तम अभिनयासोबत उत्तम नृत्य करणारे कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाले.

वाजीद खान-
बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिद यांच्यातील वाजिद खान यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. कोविडने त्यांचा बळी घेतला. सलमानच्या 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटाद्वारे साजिद-वाजिद यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. या सिनेमातील सगळी गाणी हिट ठरली. सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडगोळीने संगीत दिले.

बासू चाटर्जी-
‘बातों बातों मे’, छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’ यांसारख्या अविस्मरणीय चित्रपटांचे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. मध्यमवर्गीय कुटुंबाची खुसखुशीत, हलकीफुलकी कथा प्रेक्षकांसमोर मांडणे ही त्यांची खास शैली होती. 'चमेली की शादी’, ‘खट्टा मीठा’ असे लोकप्रिय चित्रपट याच पठडीत त्यांनी मांडले. त्यांना दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी लोकप्रिय ‘ब्योमकेश बक्षी’ आणि ‘रजनी’ यांसारख्या मालिकांचेही दिग्दर्शन केले. ज्या अजूनही सर्वांच्या लक्षात आहेत.

जगदीप-
सुप्रसिद्ध विनोदवीर आणि शोलेतील सुरमा भोपाली ही भुमिका गाजवणारे अभिनेते जगदीप यांचे वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले. सैयद इश्तियाक अहमद जाफरी असे त्यांचे पूर्ण नाव होते. जगदीप यांचा चेहरा पाहिला तरी चेहऱ्यावर हसू फुलेल अशी त्या विनोदवीर नटाची ताकद होती. आपल्या विनोदी भुमिकांच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले.

निशिकांत कामत-
दृश्यम फेम सुप्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं लिव्हर सिरोसिस या आजाराने निधन झालं. वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी गेल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीबरोबर बॉलिवूडही हळहळलं. डोंबिवली फास्ट, लय भारी हे मराठी सुपरहिट चित्रपटही निशिकांत कामत यांनीच दिग्दर्शित केले होते.

पंडित जसराज-
शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचं ९० व्या वर्षी निधन झालं. भारत सरकारने २००० साली संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) २००६ रोजी सापडलेल्या एका ग्रहाला "पंडित जसराज" हे नाव दिले. पंडित जसराज हे किती मोठे दिग्गज होते हे यावरून लक्षात येईलच.

भानू अथय्या -
भानू राजाध्यक्ष-अथय्या या ऑस्कर मिळवणाऱ्या पहिल्याच भारतीय वेशभूषाकार होत्या. ‘गांधी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझायनरचा ऑस्कर पुरस्कार जिंकणार्या भानु अथय्या यांचे ९१व्या वर्षी निधन झाले. भानु यांनी कॉश्च्युम डिझायनर म्हणून १०० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले होते. आम्रपाली, लगान, स्वदेस हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले.

अस्ताद डेबू-
नृत्य प्रवर्तक अस्ताद डेबू यांचे ७४व्या वर्षी निधन झाले. दिग्दर्शक मनिरत्नम आणि विशाल भारद्वाज यांच्यासाठी त्यांनी काम केले आहे. २००७ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

राहत इंदौरी -
प्रख्यात उर्दू कवी, लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांचे वयाच्या ७०व्या वर्षी निधन झाले. करोनाची लागण त्यांच्या मृत्यस कारणीभूत ठरली. गालिबपासून सुरू झालेल्या शायरीच्या परंपरेचा वारसदार म्हणून राहत इंदौरी यांच्याकडे पाहिले जाते.

सौमित्र चटर्जी
सौमित्र चटर्जी हे बंगाली सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीतील जेष्ठ कलाकार होते. अभिनेता, दिग्दर्शक, कवी आणि लेखक म्हणून त्यांनी काम केलं. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या सोबत केलेल्या कामासाठी ते जागतिक स्तरावर नावाजले गेले. त्यांच्या नावावर दोन राष्ट्रीय पुरस्कार आहेत. त्यांना पद्मभूषणने गौरवण्यात आलं होतं. फ्रान्सतर्फे कलाकारांना देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार 'Ordre des Arts et des Lettres' मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.
बोभाटातर्फे या सर्व कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली. लेख आवडल्यास नक्की शेयर करा.
लेखिका: शीतल अजय दरंदळे






