१० लाख लोक अमेरिकेच्या ‘एरिया ५१’ वर छापा का घालणार आहेत?? असं काय आहे एरिया ५१ मध्ये??
मंडळी, अमेरिकेतल्या नेवाडा येथील एरिया-५१ हे ठिकाण पृथ्वीवरील सर्वात गोपनीय ठिकाण समजलं जातं. तिथल्या गोपनीयतेमुळेच एरिया-५१ भोवती वेगवेगळ्या दंतकथा रचल्या गेल्या आहेत. एक प्रसिद्ध समजुतीनुसार एरिया-५१ मध्ये एलियन राहतात आणि अमेरिका या एलियन्सवर प्रयोग करते. एवढंच नाही, तर असाही एक समज आहे की या भागात उडत्या तबकड्या (UFO) आहेत. अमेरिकन सरकारने मात्र या अफवेला उडवून लावलंय. कागदोपत्री या भागात अमेरिकन वायुदलाचं प्रशिक्षण आणि वेगवेगळ्या हत्यारांची चाचणी होते.
पण मंडळी, काही लोकांचा अमेरिकन सरकारच्या म्हणण्यावर विश्वास नाहीय. त्यांचा अजूनही असं वाटतं की एरिया-१५ मध्ये एलियन्स राहतात. हे एलियन्स पाहण्यासाठी "Storm Area 51, They Can't Stop All of Us," नावाचा फेसबुक इव्हेंट तयार करण्यात आलाय. या फेसबुक इव्हेंटचा उद्देश चक्क एरिया-१५ वर धाड टाकण्याचा आहे. कळस म्हणजे तब्बल १० लाख लोकांनी तशी तयारी पण दाखवली आहे.
मंडळी, इव्हेंट बनवणाऱ्या महाभागांनी धाड कशी घालायची याची एक नवीन टेक्निक शोधून काढली आहे. ते जपानी ‘नारुतो रन’ स्टाईलने छापा घालणार आहेत. आता हे नारुतो रन काय प्रकरण आहे ते या फोटोत पाहा.
या लोकांचा असा विश्वास आहे की आपण जर नारुतो रन स्टाईलने पळत गेलो तर बंदुकीच्या गोळीपेक्षा जास्त वेगाने एरिया-५१ मध्ये पोहोचू. मंडळी, कोणत्याही ठिकाणी छापा घालताना कोणीही पूर्वसूचना देऊन छापा घालत नाही. या लोकांनी तर मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाची जाहिरात केली आहे. कदाचित अमेरिकन सैन्य या लोकांचा चांगलाच समाचार घेईल. नक्की काय होईल हे पाहण्यासाठी आपल्याला २० सप्टेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
आणखी वाचा :
वाचा जगाला चक्राऊन सोडणाऱ्या एलियन सांगाड्याची गोष्ट....हा सांगाडा खरंच एलियनचा होता का ?