महाराष्ट्रातील या 7 सुंदर ठिकाणी पावसाळ्यात एकदातरी भेट द्या...
बर्याच प्रतीक्षेनंतर पावसाने आता जोमदार हजेरी लावलीय. सगळीकडेच आता उत्साहाचं वातावरण दिसतंय. तुमच्यापैकी काहींनी आता पिकनिकची तयारी सुरू केली असेल.. म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील काही मनमोहक डेस्टीनेशन्स जी तुम्ही पावसाळ्यात पाहायलाच हवीत...
१. लोणावळा / खंडाळा
पुणे - मुंबई महामार्गावर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावर हे थंड हवेचं ठिकाण आहे. इथे असलेली विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूपच मजा वाटते. लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपास पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.. राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे आहेत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे.
२. ताम्हिणी घाट
मुंबई - गोवा महामार्गावर मुंबईपासून 140 कि.मी वर असणारा हा घाट अनेकांचं पावसाळ्यातील आवडतं ठिकाण आहे. जर तुम्हाला निसर्ग आणि साहसी पर्यटन हे दोन्ही आवडतं.. तर इथे तुम्ही जायलाच हवं. येथील खोल हिरव्या दऱ्या, मुळशी धरण, कडेलोटावरुन पडणारे छोटेमोठे धबधबे तुम्हाला आकर्षित करतील. आणि सोबतीला जवळच 30 कि. मी वर सिंहगड किल्ला आहे. तेव्हा एकदा इथे नक्की भेट द्या.
३. भीमाशंकर
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असून हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण असून भिमा नदीचे उगमस्थान इथेच आहे. येथील अभयारण्यात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे उडणारी खार जी फक्त याच जंगलातच आढळते. येथील गुप्त भीमाशंकर, कोकणकडा, सितारामबाबा आश्रम, नागफणी इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
४. सापुतारा
हे ठिकाण महाराष्ट्र - गुजरात सीमेवर नाशिक या शहरापासून सुमारे ८० कि.मी. अंतरावर आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण असून सातपुडा पर्वतराजीत वसलेलं आहे. इथे पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे म्हणजे हथगढ किल्ला, कलाकारांचे खेडे (आर्टीस्टस् व्हिलेज), मध संकलन केंद्र, गीरा धबधबा, रोप-वे, बोटींग क्लब, म्युझियम (संग्रहालय), सनराइज पॉईंट, सनसेट पॉईंट, इको पॉईंट, अॅक्वारियम इ.
५. इगतपुरी
हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याचे गाव. येथे महिंद्रा आणि महिंद्राचा इंजिन बनवण्याचा कारखाना आहे. हे मुंबई आग्रा महामार्गावरील गाव आहे. इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले आहे. या परिसरातील धबधबे पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. इथे मुक्काम करून आजूबाजूला पाहण्यासारख्या जागा म्हणजे अप्पर वैतरणा धरण, भंडारदरा धरण, खोडाळा, सुंदरनारायण गणेश मंदीर याशिवाय कुलंग, अलंग, मदनगड, कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा तसेच सांदण दरी, रंधा धबधबा या ठिकाणपासून जवळच आहेत. कसारा घाटाजवळ भातसा रिव्ह्रर व्हैली, उंट दरी, पाच धबधबे, अशी सुंदर ठिकाणे आहेत. कसारा घाटातील धुके अनुभवणे तर एक रोमांचकारी अनुभव असतो. तसेच इगतपुरी गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी धम्मगिरी हे विप्पश्यना केंद्र आहे. साधना करण्यासाठी देशातील निरनिराळ्या भागातून, परदेशांतूनही अनेक लोक येथे येतात. तसेच घोटी या गावाजवळून कावनई, त्रिंगलवाडी हे एका दिवसात पाहण्यासारखे किल्लेही आहेत.
६. पाचगणी
पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि.मी अंतरावर आहे. महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्याजेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे. लोणावळा-खंडाळा ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार महाबळेश्वर-पाचगणी यांच्या बाबतीत आहे. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत.
७. माथेरान
माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील सदाहरीत जंगलात विविध प्रकारची वृक्षसंपदा आणि प्राणीजिवन आढळते. शार्लोट लेक, पॅनारोमा पॉईंट, लुईझा पॉईंट, सनसेट पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट अशी अनेक पॉईंट इथे मनाला भुरळ घालतात.
चला मग तयारीला लागा.. आणि काही सूचनाही लक्षात ठेवा.
१. जास्त उंच, दलदलीची किंवा घसरण असलेल्या ठिकाणी जाणे टाळा.
२. सुरक्षिततेच्या दृष्टीने जवळ छोटं हत्यार, टॉर्च, मेडिसिन किट अवश्य ठेवा.
३. सोबत एक्स्ट्रॉ कपडे घ्या. जेवणाच्या वेळा योग्य ठेवा.
४. सोबत लहान मुले असतील तर जास्त जागरुक राहा.
५. वाहनाचा वेग मर्यादीत ठेवा. सहसा रात्री प्रवास करणे टाळा.
टीम बोभाटाकदून सर्वांना हॅप्पी मान्सून !