या ९ देशांनी बदलले व्हिसाचे नियम, चला पटापट सहलीचे बेत आखा...

भारतीय पासपोर्टच्या आधारे आपण २५ देशांमध्ये व्हिसा शिवाय प्रवास करू शकतो. ४१ असे देश आहेत जिथे आगमनानंतर भारतीयांना व्हिसा दिला जातो, तर उरलेल्या १३२ देशांमध्ये जाण्यासाठी आधीच व्हिसा मिळवावा लागतो. या आधारावर भारतीय पासपोर्ट ‘ग्लोबल पासपोर्ट निर्देशांक’च्या यादीत ६६ व्या क्रमांकावर आहे. मागील काही वर्षात भारतीय पासपोर्टचा भाव चांगलाच वधारलाय भाऊ....
वरती ज्या १३२ देशांचा उल्लेख केला आहे त्या देशांमध्ये अमेरिका युरोपियन देशांचा समावेश होतो. हे देश बघायचे असतील तर अनेक दिव्यातून पार पडावं लागतं. कागदपत्र जमवणं, विसासाठी मोजावे लागणारे पैसे, इंटरव्ह्यूसाठी लागणारा वेळ इत्यादी गोष्टी असतात. पण नुकतंच नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. हे नियम भारतीयांचा परदेशप्रवास सुखकर करणार आहेत. चला तर पाहूया काय आहेत ते नवीन नियम....
१. UAE
UAE ने भारतीयांसाठी एक मस्त ऑफर आणली आहे. १८ वर्षापर्यंतच्या मुलांना दरवर्षी १५ जुलै ते १५ सप्टेंबर पर्यंत कोणत्याही व्हिसा शिवाय प्रवास करता येणार आहे. वैज्ञानिक, संशोधक, व्यावसायिक तसेच वैद्यकीय कारणासाठी UAE ला जाण्याऱ्या लोकांना आता १० वर्षापर्यंतचा दीर्घकालीन व्हिसामिळणार आहे.
२. म्यानमार आणि उझबेकिस्तान
म्यानमार आणि उझबेकिस्तान या दोन देशांनी आता ई-व्हिसा सुविधा सुरु केली आहे. तुम्हाला अगदी महिन्याच्या आत व्हिसा मिळू शकतो. म्यानमार तर अगदी २ दिवसात व्हिसा देत आहे राव.
३. फ्रान्स

फ्रान्स मध्ये अत्यंत अल्पावधीसाठी उतरल्यानंतरही (खास करून) भारतीयांना ट्रान्झिट व्हिसा घेणं बंधनकारक असायचं, पण आता फ्रान्सच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय झोन मधल्या विमानतळावर अल्पावधीसाठी उतरल्यास ट्रान्झिट विसाची गरज लागणार नाही.
४. कझाकस्तान
कझाक एअरलाईन्सने प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी कझाकस्तान देशाने ७२ तासांचा फ्री व्हिसा जाहीर केला आहे.
५. जपान
जपान भारतीयांना वीसा देण्याच्या बाबतीत भलताच कडक नियम असलेला देश आहे. हे काल पर्यंत होतं, पण आता हे नियम थोडे शिथिल करण्यात आलेत. ज्यांना काही दिवसांच्या भेटीसाठी जपानला जायचं आहे त्यांना प्रवासाचं ‘स्पष्टीकरण पत्र’ (explanation letter) देण्याची गरज नाही.
६. सौदी अरेबिया

काल परवा पर्यंत सौदी अरेबिया मध्ये एकट्या स्त्रीला प्रवास करू दिलं जातं नव्हतं. नवीन नियमांनुसार २५ वर्षापेक्षा पुढील वयाच्या स्त्रियांना पर्यटन व्हिसा मिळू शकतो.
७. झिम्बाब्वे
झिम्बाब्वे देशाने आता २८ देशांच्या नागरिकांना आगमनानंतर व्हिसा देण्याची सुविधा जाहीर केली आहे. या २८ मध्ये भारत पण आहे राव.
८. इस्राईल

८. इस्राईलने त्यांच्या ‘व्हिसा फी’ मध्ये आता मोठी कपात केली आहे. पूवी पर्यटक आणि व्यवसायाच्या निमित्ताने इस्राईलला जाणाऱ्यांसाठी १७०० रुपये फी आकारली जायची, यापुढे १,१०० रुपये आकारले जातील.
९. ओमान

९. समजा तुम्ही अमेरिका, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलियाचे रहिवासी आहात किंवा या देशांचा व्हिसातुमच्याकडे आहे तर तुम्हाला ओमानचा प्रवासी व्हिसा तत्काळ मिळू शकतो. यासाठी आवश्यक तेवढे पैसे दिल्यास आगमनानंतर देण्यात येणारा व्हिसा ओमान देऊ करतं.
आणखी एक खुशखबर आहे राव. दुबई आणि अबुधाबी लवकरच भारतीयांना २ दिवसांचा फ्री ट्रान्झिट व्हिसा देऊ करणार. म्हणजे हे दोन्ही देश २ दिवस व्हिसा शिवाय मस्त फिरता येतील.
मंडळी, परदेशी जाणं आता पूर्वी सारखं कठीण राहिलेलं नाही. मग कोणत्या देशात जाण्याचा प्लॅन करताय ??