साउथ इंडियन लोकांविषयी असलेले ८ गैरसमज!!!
सिनेमा हे समाजाचं चित्रण करण्याचं एक प्रभावी मध्यम आहे. काही लोक पडद्यावर दिसणारं सर्वच खरं असल्याचं आजही मान्य करतात. पूर्वीच्या काळी सिनेमात एखादा व्हिलन असेल तर त्याला पडद्यामागे देखील क्रूर म्हणूनच बघितलं जायचं. अभिनेते प्राण, निळू फुले हे याचं एक उत्तम उदाहरण.
सिनेमाच्या या छाप पडण्याचे काही नुकसान देखील आहे मंडळी... जसं गेल्या काही दशकांपासून पंजाबी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर बल्ले बल्ले करत नाचणारा सरदारजी येतो, साउथ इंडियन म्हटलं की ‘अय्यो’ म्हणणारा लुंगीतला माणूस प्रगट होतो, बंगाली म्हटलं की त्याला रसगुल्ला आवडणारच आणि गुजराती म्हटलं की ढोकळा. मराठी माणूस दाखवताना तर बॅकग्राऊंडला चक्क ढोलकीचा आवाज येतो. पण खरंच हे असं असतं का भौ? या लोकांना दुसरे काही काम धंदे नाहीत का?
राव, याचविषयी आम्ही आज थोडी अॅडव्हान्स माहिती सांगणार आहोत. साऊथ इंडियन सिनेमा आणि इडली डोसामुळे आपल्याला ज्ञात असलेले मद्रासी लोक. यांच्याबद्दल साऊथ इंडियन लोकांविषयी असलेले १० गैरसमज!!!
१. साऊथ इंडिअन सगळे मद्रासी असतात !!
पहिली गोष्ट साऊथ इंडिया या नावाचं कोणतंही राज्य नाही. पण आपण कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांची मिळून एकच मोट बांधून टाकलीय.
२. सर्व साऊथ इंडिअन लोकांना मद्रासी भाषा येते.
भाऊ साऊथ इंडियामध्ये अजूनही काही भाषा आहेत.. जसं की कन्नड, तेलगु, मल्ल्याळम इत्यादी. या भाषा वेगवेगळ्या राज्यात बोलल्या जातात. काहींना तर मद्रासी ही कोणत्या ग्रहावरची भाषा आहे हे देखील माहित नसतं.
३. अम्मा, अप्पा, आय्यो, मुरुगना हे शब्द साउथ इंडियन सतत बोलत असतात.
सिनेमात साऊथ इंडियन माणूस दाखवताना त्याच्या तोंडी या पैकी एक तरी वाक्य हमखास असतंच. पण जर कधी साऊथ इंडियात गेलात तर वेगळंच चित्र पाहायला मिळेल राव. तारक मेहता का उलटा चष्मामध्ये जसं अय्यर हे पात्र दाखवलंय तसं तर बिलकुल नसतं.
४. सर्व साउथ इंडिअन लुंगी घालतात !
निव्वळ गैरसमज, लुंगी शिवायही कपडे असतात दक्षिणी लोकांकडे. महाराष्ट्राच्या सरहद्दीवर असणाऱ्या कर्नाटकच्या गावात धोतर आणि गांधी टोपीची अजूनही परंपरा आहे राव.
५. सर्व साउथ इंडिअन लोक इडली डोसा खातात !!
नाही ना राव. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र भागात चवीने खाल्ल्या जाणाऱ्या रसम, नयप्पम, पोरियल, कोट्टू, पायसम अश्या अनेक लज्जतदार रेसिपीज आहेत...
६. साउथ इंडिअन लोग 'हिंदी नही बोलते' !!
काही दक्षिण भारतीय लोक असतात ज्यांना हिंदी नाही येत. पण जे तमिळ, कन्नड, तेलगु लोक उत्तर भारतात प्रवास करतात किंवा कामानिमित्त जातात ते हिंदी बोलतात. आणि हो त्यांचं हिंदी ‘अय्यो’ टाईप नसतं. काही जण तर अस्खलित मराठी बोलतात!!
७. रजनीकांत हा साउथ इंडियन लोकांचा देव आहे.
ज्यांना सिनेमा आवडतो त्यांना रजनीकांत नक्कीच आवडतो. पण तो एकमेव नाही ज्याचे साउथ इंडियन लोक्स फॅन आहेत. कमल हसन, मोहनलाल, अल्लू अर्जुन, सध्याच्या नवीन फळीतला प्रभास हे देखील लोकांचे तेवढेच आवडते आहेत.
८. साउथ इंडियन सर्व लोक काळे असतात.
सावळा रंग हा जरी साउथ इंडियन लोकांचा गुणधर्म असला तरी सर्वच काही काळे नसतात हो. त्यांच्यातही गोरे गोमटे अनेक चेहरे आपल्याला पाहायला मिळतील. एक माहितीसाठी सांगतो दीपिका कर्नाटकची आहे. आता बोला!!!
पडद्यावर जे दिसतं ते सगळं खरं असतंच असं नाही राव !!!