कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर बोरोसिलने किती आणि काय सढळ मदत जाहिर केलीय ते वाचलंत का?
कोरोनामुळे एक जीव जाताना दिसतो, पण खरं तर त्याच्या मागे त्याच्या कुटुंबाची फरपट ठरलेली असते. घरातला कमावता माणूस गेल्याने त्याच्या कुटुंबावर काय संकट येत असावं हे तुम्ही सगळे जाणताच. नुकतीच अशीच एक बातमी आली.
Borosil Ltd आणि Borosil Renewables Ltd या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ४ कर्मचाऱ्यांचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला. तसं पाहता मृत्यूची बातमी काही नवीन नाही, पण या बातमीमध्ये एक वेगळेपण आहे.
कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीवार खेरुका यांनी लिंकडीनवर पोस्ट करून सांगितलं की मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या घरच्यांना पुढची २ वर्षे नियमितपणे पगार मिळत राहील. एवढंच नाही तर या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनी घेणार आहे. श्रीवार खेरुका यांनी दिलेली माहिती खालील पोस्टमध्ये पाहा.
श्रीवार खेरुका आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, त्यांच्या जाण्याने जे नुकसान झालं आहे त्याच्या तुलनेने आम्ही जी मदत करत आहोत ते काहीच नाही. पुढे त्यांनी हेही सुचवलं की, कंपनीची खरी संपत्ती त्यांचे कर्मचारी आहेत.
Borosil Ltd आणि Borosil Renewables Ltd ने कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबासाठी ज्या पद्धतीने मदतीचा हात केला ते बघून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. काहींनी म्हटलं की, झालेलं नुकसान भरून काढता येणार नाही, पण त्यांच्या कुटुंबाला सावरायला वेळ मिळेल.
तुम्हाला ही बातमी कशी वाटली ? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा !!