रेल्वे रूळ ओलांडणे थांबवण्यासाठी रेल्वे विभागाने आणलीये भन्नाट आयडिया...तुम्हाला पटते का बघा !!

मुंबईच्या लोकलने प्रवास करणे म्हणजे कोणत्याही स्टंटपेक्षा कमी नसतं राव. मुंबई लोकलने प्रवास करणारे अनेक मार्गाने मृत्यूला सामोरं जातात. एक गोष्ट इथे मान्य करावीच लागेल की काहीवेळा प्रवासी स्वतःच स्वतःचा मृत्यू ओढवतात. रेल्वे रूळ ओलांडणे हा पण मृत्यू ओढवण्याचा थेट मार्ग आहे.
मंडळी, मुंबईच्या प्रत्येक स्टेशनवर रोज सांगितलं जातं की रेल्वे रूळ ओलांडू नका, काही वर्षापूर्वी तर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांवर दंड पण लावला जात होता. पण आपले मुंबईकर काही सुधरत नाही राव.
यावेळी रेल्वे विभागाने एक अभिनव कल्पना आणली आहे. त्यांचा दावा आहे की या भन्नाट कल्पनेने रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. चला तर जाणून घेऊया ही अभिनव कल्पना आहे तरी काय !!
मंडळी, रेल्वे विभागाने दोन रेल्वेरुळांना विभागणाऱ्या कुंपणाला ग्रीस लावलं आहे. अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशुतोष गुप्ता यांनी ही कल्पना शोधून काढली आहे. रेल्वे रूळ ओलांडण्यापासून लोकांना परावृत्त करायला काय करता येईल याचा विचार करत असताना त्यांनी बघितलं, की बरेच लोक हे रेल्वे रुळाचं कुंपण ओलांडून जातात. त्यावेळी त्यांना ग्रीसची कल्पना सुचली.
दुसऱ्याच दिवशी त्यांनी कर्मचाऱ्यांना बोलावून कुंपणाला ग्रीस लावलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुंबईचे लोक कपडे खराब होऊ नये म्हणून खूप काळजी घेतात. ग्रीस लावलेलं असल्याने कोणी तिकडे फिरकणार पण नाही. याखेरीज हा मार्ग स्वस्त पण आहे.
हा प्रयोग कुठे करण्यात आलाय असा प्रश्न पडला ना ?
राव, अशा प्रयोगासाठी मुंबईच्या दादर स्टेशनपेक्षा योग्य स्टेशन कोणतं असेल. दादरची गर्दी बघता सर्वात जास्त जीवघेणे प्रकार याच स्टेशनवर घडतात. म्हणूनच दादरच्या २ आणि ३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर हा प्रयोग करण्यात आलाय. रेल्वे विभागाचा दावा आहे की फेब्रुवारीपासून दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकही मृत्यू झालेला नाही.
तर मंडळी, दादर स्टेशनवर मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता इतर स्टेशन्स पण ग्रीसने रंगवण्यात येणार आहेत. तुम्हाला कशी वाटली ही अभिनव आयडिया ?? तुमचं मत नक्की सांगा !