computer

जगातला सर्वात उंच रेल्वे पूल भारतात तयार होतोय...या महत्त्वाच्या गोष्टी माहित असायलाच हव्यात !!

जगातला सर्वात उंच रेल्वे पूल कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्व भारतीयांची मान नक्कीच उंचावेल. होय, कारण हा पूल आपल्या भारतात तयार होत आहे. काश्मिर भागात कटडा-बनिहालदरम्यान रियासी इथं चिनाब नदीवर हा रेल्वे पूल उभारला जात आहे आणि लवकरच तो सगळ्यांसाठी खुला होणार आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नुकताच त्याचा फोटो शेयर केला आहे.

हा पूल नदीपासून ३५९ मीटर उंचीवर आहे. या उंचीचा विचार केला तर तो आयफेल टॉवरपेक्षाही उंच ठरतो. पुलाची लांबी १.३१५ किमी इतकी आहे आहे. या पुलाला इंद्रधनुष्यासारखी ४७६ मीटर कमान देखील बसवलेली आहे. काश्मीरच्या अत्यंत दुर्गम भागात अनेक अशक्य बांधकामे करण्यात येत आहेत. त्यातच या नव्या अतिविशाल रेल्वे पुलाची भर पडणार आहे.

काश्मीर खोऱ्याला देशाशी रेल्वेने जोडणारा हा मार्ग आहे. स्थानिकांसाठी अनेक संधी यामुळे खुल्या होणार आहेत. शेकडो किलोमीटरचा वळसा या पुलामुळे वाचणार आहे. तिकडचे सगळे लोक हा पूल कधी सुरू होतोय याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या कमानीचे काम सुरू आहे. ते या महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

भूकंप आणि मोठे स्फोट सहन करण्याची क्षमता या पुलात आहे. हा पूल खूप उंच असल्यामुळे वेगाने वाहणारा वारा हे मोठे आव्हान असणार आहे. नेमकं सांगायचं तर तशी २६६ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याशी या पुलाला सामना करावा लागणार आहे. त्यासाठी चाचणीही होत आहे. या पुलाचे आयुर्मान कमीतकमी १२० वर्ष असेल. स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुनाच या पुलाला म्हणावे लागेल.

यासाठी अनेक हात दिवसरात्र काम करत आहेत. भारतीय इंजिनियर्सची अजोड बुद्धिमत्ता यातून दिसून येते. हा पूल सुरू झाल्यावर डोळ्याचे पारणे फेडणारा यात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं?

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required