कथा त्या माणसाची जो स्वतःच्याच जोकवर हसून हसून मेला !!
इसवीसन पूर्व २७९ मध्ये जन्मलेले ग्रीक तत्वज्ञानी ख्रिसिफस हे त्यांच्या जगावेगळ्या मृत्यूमुळे ओळखले जातात. ते मोठे तत्वचिंतक होते, तसेच ‘स्टोइक स्कूल ऑफ फिलॉसफी’ चे प्रमुखही होते. पण त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या मृत्यूचीच चर्चा जास्त होते.
“हसून हसून मेलो राव” हे आपण अनेकदा म्हणतो. पण खरोखर थोडीच आपण मरतो? पण ख्रिसिफस यांनी ही म्हण अनेक वर्षाआधी खरी ठरवली होती. ख्रिसिफस यांचा मृत्यू हा हसून हसून झाला होता. आता दुसऱ्याच्या जोकवर हसून मेलं, तर एकवेळ समजू शकतो हो. पण हे महाशय तर स्वतःच्याच जोकवर हसून मेले होते.
हा असला जगावेगळा जोक होता तरी काय ?
ख्रिसिफस यांना दारू फार आवडायची. ते दारू पिऊन दिलखुलास हसायचे. ते एकदा असच एका पार्टीत गेले होते आणि तिथे त्यांनी बरीच दारू रिचवली. पार्टीतून परत येताना त्यांनी रस्त्यात गाढवांना अंजीर खाताना बघितलं. हे दृश्य पाहून त्यांनी त्यांच्या बरोबर असणाऱ्या एका वृद्ध महिलेला सांगितलं की “जा जाऊन त्या गाढवांना थोडी वाईन पण दे”.
हाच होता तो जोक. आपल्याला हसू आलं नसलं, तरी त्यावेळी त्यांना असं वाटलं की आपण फार मोठा जोक मारला आहे. आणि ते स्वतःच जोक वर जोरजोरात हसत सुटले. त्यांचं हसणं हे पराकोटीला गेल्यावर त्यांचा श्वास बंद पडला. अशाप्रकारे स्वतःच्याच विनोदावर हसता हसता ते स्वर्गवासी झाले.
त्यांच्या मृत्यूबद्दलची ही कथा स्टोइक स्कूल ऑफ फिलॉसफीच्या एका विद्यार्थ्याने नमूद करून ठेवली आहे.
त्यांच्या मृत्यूबद्दल हीच कथा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जाते. कधी म्हटलं जातं की त्यांच्या बरोबर त्यांचा एक गुलाम होता ज्याला त्यांनी वाईन द्यायला सांगितलं होतं, तर कधी म्हटलं जातं की गाढवांना अंजीर खताना बघून ते स्वतःशीच ओरडले आणि म्हणाले की ‘कोणी तरी गाढवांना वाईन द्या रे’.
काही असो, स्वतःच्याच जोकवर हसून हसून जीव गेलेला हा बहुदा पहिला मनुष्य प्राणी असावा...नाही का?