आईचा खून केल्यानंतर तिचं काळजी खाणाऱ्या मुलाला फाशीची शिक्षा झाली आहे...कोल्हापूरला हादरवून सोडणारी केस काय आहे?
दुर्मिळातील दुर्मिळ आणि अति निर्घृण अशा गुन्ह्यासाठीच भारतात फाशीची शिक्षा दिली जाते. ज्या गुन्ह्यामुळे समाज मनावर मोठा परिणाम घडवून आणला असेल असा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिली जाते. बरोबर चार वर्षापूर्वी अशीच एक क्रूर घटना महाराष्ट्रातील कोल्हापुरात घडली होती. या घटनेने लोकांना अक्षरश: हादरवून सोडले होते.
कोल्हापूरच्या माकडवाला वसाहतीत राहणाऱ्या सुनील कुचकोरवी याने दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या आईचा खून केला होता. दारूच्या आहारी गेलेल्या सुनीलने फक्त आईचाच नाही, तर मातृत्वासारख्या पवित्र कल्पनेचाही खून केला. आईचा खून केल्यानंतर त्याने आईच्या गुप्तांगावरही वार केले. तिला नग्न करून तिचे स्तन कापून टाकले. तिचे काळीज बाहेर काढले. ते काळीज तळून खायचा त्याचा विचार होता. त्यासाठी एका परातीत त्याने या काळजाचे तुकडे करून त्याला मीठ-तिखट लावून ठेवले होते. आईचे फुफ्फुस आणि यकृतही बाहेर काढले होते. यातील काही तुकडे त्याने फ्रीजमध्ये भरून ठेवले होते. घटनेचा वृत्तांत वाचूनच कुणाच्याही अंगावर काटा येईल अशी ही घटना. नेमकी त्याचवेळी सुनीलच्या याच दारूच्या व्यसनाला आणि त्याच्या जाचाला वैतागून त्याची बायको आपल्या दोन्ही मुलांसह माहेरी निघून गेली होती.
अतिशय क्रूरपणे आणि शांततेने त्याचे हे काम सुरु असतानाच शेजारचा एक आठ वर्षाचा मुलगा कूचकोरवीच्या घरात गेला आणि समोरचे ते दृश्य पाहून त्या मुलाला मोठा धक्काच बसला. तो रडत ओरडत घरी गेला तेव्हा नराधम सुनीलचे हे निर्घृण कृत्य सर्वांना कळले.
चार वर्षांनी या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने सुनील कुचकोरवीला आपली ६२ वर्षाची आई यल्लव्वा कुचकोरवीचा निर्घृण खून करून तिच्या देहाची विटंबना केली, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हा पहिलाच असा खटला आहे ज्यामध्ये गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
८ जुलै २०२१ रोजी न्यायाधीशांनी कुचकोरवीला शिक्षा सुनावली. कुचकोरवीचे वकील लांभोरे यांनी त्याचा बचाव करताना आरोपी हे कृत्य करताना शुद्धीत नव्हता, दारूच्या नशेत असल्याने आपण काय करतो आहोत काय नाही याचे त्याला भान नव्हते. असा युक्तिवाद केला. पण न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही. या संपूर्ण खटल्याचा पोलीस तपास करणारे पोलीस अधिकारी एस. एस. मोरे म्हणाले की, “माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी एवढा निर्घृण आणि क्रूर गुन्हा पहिला नव्हता.”
ही शिक्षा सुनावताना न्यायाधीश म्हणाले, “सुनीलने आपल्या आईचा ज्या पद्धतीने संपवले, ज्या कारणाने संपवले आणि नंतर तिच्या देहाची अतिशय थंडपणे विटंबना केली. ही सगळी घटना माणूसकीला तर काळिमा फासणारी आहेच, पण मातृत्वाचा अपमान करणारी आहे. समाजमनाला हादरे देणारी ही घटना अतिशय निंदनीय आहे. जन्मदात्या आईचा इतक्या क्रूरपणे आणि थंड डोक्याने खून करून तिचे काळीज भाजून खाणारा हा मुलगा म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे. या गुन्ह्यातील क्रौर्य पाहता त्याला फाशीची शिक्षाच योग्य ठरेल.”
फक्त पैशासाठी आपल्या आईला संपवून त्याचा पुरावाही नष्ट करण्यासाठी तिचे अवयव भाजून खाणारा हा मुलगा, मुलगा नव्हे तर राक्षसच म्हटला पाहिजे. अशा मुलाला फाशीची शिक्षाही कमीच ठरेल. सुनीलला दोन अपत्ये आहेत. वडिलांना शिक्षा झाल्याचे ऐकताच या मुलांनी कोर्टबाहेरच हंबरडा फोडला होता. आईचे काळीज चिरणारा त्यांचा बाप आणि त्याच्यासाठी रडणारी त्याची मुले, नियतीने लिहिलेली कथा एकाच वेळी किती विरोधाभासी असू शकते, याची कल्पनाही करवणार नाही.
सुनीलच्या बचावासाठी त्याचे कुटुंबीय उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी दिली. सुनीलच्या शिक्षेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी उच्च न्यायालयानेही या निर्णयावर कायम राहणे आवश्यक आहे.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे सुविचार शिकवणाऱ्या आपल्या संस्कृतीत आईचाच घास घेणारी सुनीलसारखी विकृती कशी काय जन्माला येऊ शकते? हा प्रश्न भंडावून सोडणारा आहे.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी