मुलाकडे बापाचे अंत्यसंस्कार करण्यास वेळच नाही !!
हल्ली अनेकजण बाहेरगावी कामानिमित्त जाऊन तिथेच वास्तव्य करतात. नंतर फक्त सुट्ट्यांमध्ये किंवा काही निमित्ताने मायदेशी येणं होतं. तरुण मंडळी परदेशी जाऊन संसार थाटतात पण इथे सोडून जातात आपल्या वृद्ध आई वडिलांना. ज्या वयात त्यांना साथ हवी असते नेमकं त्याचवेळी आपलं माणूस आपल्या जवळ नसतं. मग अश्यावेळी एकाकीपण एकटेपण खाऊ लागतं. अश्यातच अनेकांचा जीव जातो.
यासंदर्भात एक घटना नुकतीच घडली आहे. फोर्ट, मुंबई मध्ये राहणाऱ्या ‘फ्रान्सिस कुटिन्हो’ यांचा राहत्या घरी मृत्यू झाला. फोर्ट मधील मुघल अपार्टमेंट मध्ये ते एकटेच राहायचे. त्यांच्या घरातून वास येऊ लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना कळवलं. फ्लॅटचं दार उघडल्यानंतर त्याचं शरीर सडलेल्या अवस्थेत सापडलं.
४ ते ५ दिवस झाले तरी फ्रान्सिस यांचा कोणी नातेवाईक त्यांच्या जवळ नसल्याने त्यांचा अंत्यसंस्कार झाला नाही. पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर फ्रान्सिस यांची भाची सांचा डिकास्टा हिचा पत्ता लागला. सांचाने फ्रान्सिस यांच्या मुलगा ‘केल्विन’ याला संपर्क केला पण त्याचा फोन लागत नसल्याने त्याला ईमेल द्वारे वडिलांच्या मृत्यूची बातमी दिली. त्यांनतर केल्विनने त्यावर जे उत्तर पाठवलं ते बघून सगळेच सुन्न झाले.
तो म्हणाला की ‘मला वेळ नसल्याने तुम्ही वडिलांचे अंत्यसंस्कार करा आणि हो, मला त्यांची संपत्ती नकोय.’ त्याने आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार करणेही नाकारले होते. त्याच्या या उत्तराने शेवटी सांचा डिकास्टा हिच्याकडे फ्रान्सिस यांचा मृतदेह सोपवण्यात आला.
अशीच एक घटना लोखंडवाला मध्ये घडली होती. ‘आशा सहानी’ यांचा सापळा त्यांच्या फ्लॅट मध्ये आढळला होता. वर्षभर त्यांचा त्यांच्या मुलाशी संपर्क नसल्याने त्या नैराश्यात होत्या.
या घटनेने माणसा माणसांतील नाते संबंध किती पराकोटीचे लांबले गेलेत हे पुन्हा एकदा दिसून आलं.