computer

हरियाणामधल्या डेअरीत आता चक्क गाढवीचं दूध का मिळणार आहे? जाणून घ्या किंमत आणि फायदे!!

गायीचं, म्हशीचं दूध डेअरीमध्ये सहज मिळतं. पण आता इतिहासात पहिल्यांदाच गाढविणीचं दूध डेअरीमध्ये मिळणार आहे. कुठे, कधी आणि गाढविणीच्या दुधाला एवढं महत्त्व का? चला तर जाणून घेऊया.

असं म्हणतात की इजिप्तची राणी क्लिओपात्रा आपल्या त्वचेच्या सौंदर्यासाठी रोज गाढवीच्या दुधात आंघोळ करत असे. तिच्या या शाही स्नानासाठी खास ७००० गाढव्या त्यांनी पाळल्या होत्या असंही म्हटलं जातं. पण हे सगळं झालं २०००हून अधिक वर्षांपूर्वी. आताचं काय?

घोड्यांवर संशोधन करणाऱ्या National Research Centre on Equines (NRCE) द्वारे हरियाणाच्या हिसार येथे गाढवीणीच्या दुधाची डेअरी उभारण्यात येणार आहे. यामागे औषधी गुणधर्म असलेलं गाढवीणीचं दूध लोकांपर्यंत पोहोचावं हा उद्देश आहे. यासाठी गुजरातच्या खास हलारी जातीच्या गाढवांची निवड झाली आहे.

फार पूर्वीपासून हलारी गाढवीणीचं दूध औषधी गुणधर्मांमुळे प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की या दुधातल्या औषधी गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, लठ्ठपणा जातो, तसेच कॅन्सर सारख्या रोगांशी लढण्यासाठी फायदा होतो. गाढवीणीच्या दुधामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो अशी एक भीती बाळगली जाते, पण NRCE ने दिलेल्या माहितीनुसार हलारी गाढवीणीचं दुध मुलांच्या आरोग्यासाठी अपायकारक नाही.

(हलारी प्रजातीतील गाढवं)

NRCE चे संचालक डॉक्टर एनआर त्रिपाठी यांनी हलारी गाढवांवर संशोधन सुरु केलं होतं. सध्या हिसार येथे १० गाढव्या आणण्यात आल्या आहेत. प्रत्येक लिटरमागे ग्राहकांना ७००० रुपये मोजावे लागणार आहेत. दुधाखेरीज गाढवाच्या दुधापासून तयार केलेल्या इतर वस्तू म्हणजे साबण, बॉडी लोशनदेखील विकत घेता येतील.

वाचकहो, काही वर्षांपूर्वी अमूलने गुजरातमधून उंटीणीचं दूध विकायला सुरुवात केली होती. आताही हे दूध बाजारात सहज मिळतं. ५०० मिलीलीटरसाठी अवघे ५० रुपये मोजावे लागतात. या पुढे गाढवीणीचं दूधही प्रत्येक डेअरीवर मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. आपल्याकडे अशी एखादी डेअरी सुरु झाली तर तुम्ही गाढवीणीचं दूध प्याल का?

सबस्क्राईब करा

* indicates required