ऊसाला गोडवा देणारी शास्त्रज्ञ!! तोपर्यंत आपल्याला परदेशातून आयात केलेल्या गोड ऊसाच्या जातींवर अवलंबून राहावं लागत होतं!!
१९७० सालची गोष्ट. केरळमध्ये सायलेंट व्हॅली नावाचं सदाहरित जंगल होतं. गर्द पर्णसंभार वागवणारी झाडं, त्यातून डोकावणारे प्रकाशाचे कवडसे, बिकट वाटा, हिरवळीने आच्छादलेले डोंगर, त्याला धुक्याची झिलई असं लुभावणारं रूप असलेलं. ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता म्हणतो ती तर इथे पावलोपावली. शेकडो जातीच्या वनस्पती आणि पशुपक्षी इथे नांदत होते. पण कुठेतरी माशी शिंकली! सरकारने ठरवलं, त्या जंगलाच्या परिसरात एक जलविद्युत प्रकल्प उभारायचा, जेणेकरून आजूबाजूच्या परिसराला वीजपुरवठा करता येईल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल. मात्र यामुळे हे जंगल आणि तिथली संपन्न जैवविविधता धोक्यात येणार होती.
नेमकी हीच गोष्ट त्या ऐंशी वर्षाच्या महिलेला डाचत होती. वनस्पतीशास्त्रात अनमोल योगदान असूनही तिने आजवर प्रसिद्धीपासून दूर राहणं पसंत केलं होतं. मात्र आता मागे राहून चालणार नव्हतं. विकासाच्या नावाखाली शेकडो सजीवांच्या हक्काचा निवारा असलेल्या इतक्या सुंदर जंगलाला नष्ट होताना पाहणं शक्य नव्हतं. या भावनेतूनच प्रा. ई. के. जानकी अम्मल यांनी सायलेंट व्हॅली परिसर आणि तेथील जैवविविधता यांच्या रक्षणासाठी संघर्ष करण्याच्या मोहिमेत सहभागी व्हायचं ठरवलं. सुदैवाने त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. आज सायलेंट व्हॅलीला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा आहे. इतरत्र सर्वत्र पर्यावरणाचा विनाश होत असताना या हिरव्या तुकड्याने मात्र अनेक दुर्मिळ प्रजातींच्या वनस्पती आणि जीवसृष्टीसह आपलं अस्तित्व अबाधित राखलं आहे. कोण होत्या या जानकी अम्मल?
जानकी अम्मल यांचं संपूर्ण नाव एडावलेथ कक्कट जानकी अम्मल. त्यांचा जन्म १८९७ मध्ये केरळमधील तेलिचेरी येथे झाला. त्यांचे वडील दिवाण बहादूर एडावलेथ कक्कट कृष्णन हे मद्रास प्रेसिडेन्सीचे उपन्यायाधीश होते. त्यांनी आपल्या घरातच बाग तयार केली होती. शिवाय केरळमधल्या उत्तरेकडच्या भागात आढळणार्या पक्ष्यांवर दोन पुस्तकंही लिहिली होती. छोटी जानकी याच वातावरणात वाढली. त्यामुळे लहानपणीच तिच्यामध्ये झाडं, फुलं, प्राणी, पक्षी अशा समस्त जीवसृष्टीबद्दल कुतूहल आणि रस निर्माण झाला. वास्तविक त्या काळात मुलींना शिवणकाम, विणकाम, स्वयंपाक यांसारख्या गोष्टींसाठी प्रोत्साहन दिलं जायचं. परंतु जानकीने वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्याचं ठरवलं. तेलिचेरीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ती मद्रासला गेली. तेथे तिने क्वीन मेरी महाविद्यालयामधून वनस्पतिशास्त्रातली बॅचलर्स डिग्री आणि पुढे प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून ऑनर्स डिग्री प्राप्त केली. त्या काळात ही फारच दुर्मिळ गोष्ट मानली जायची. स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण त्या काळात म्हणजे १९१३ च्या सुमारास १ टक्क्यापेक्षाही कमी होतं.
पदवी मिळाल्यावर जानकी अम्मल यांनी मद्रासच्या विमेन्स ख्रिश्चन कॉलेजमध्ये ३ वर्षं प्राध्यापक म्हणून काम केलं. त्याचवेळी त्यांच्या आयुष्यातला सुवर्णक्षण आला. परदेशात संपूर्णपणे मोफत शिक्षण घेण्याची संधी देणारी बार्बोर शिष्यवृत्ती. खास आशियाई महिलांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने ही स्कॉलरशिप दिली जायची.
१९२४ मध्ये जानकी अम्मल अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठात रुजू झाल्या. मिशिगनमध्ये त्यांचा प्लान्ट सायटोलॉजी या विषयाचा अभ्यास सुरू झाला. या शाखेत मुख्यत: वनस्पतींमधल्या जीन्सची रचना आणि त्यांच्यातील माहितीचं विश्लेषण करून प्रथिनांच्या साखळ्यांना कसे आदेश दिले जातात यांचा अभ्यास समाविष्ट होता. जानकी यांनी वेगवेगळ्या जातींच्या वनस्पतींचा संकर आणि एकाच कुळातल्या पण वेगळ्या पोटजातीच्या वनस्पतींचा संकर यावर प्रभुत्व मिळवलं. १९३१ मध्ये त्यांना डॉक्टरेट मिळाली. अमेरिकेत शिकून वनस्पतिशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणून डॉ. जानकी अम्मल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
वनस्पतिशास्त्रात संशोधन करण्यासाठी त्यांनी जग पालथं घातलं. पण त्यांच्यातल्या संशोधकाला खरा वाव मिळाला तो कोइंबतूर इथल्या इम्पीरियल शुगरकेन इन्स्टिट्यूटमध्ये. या ऊस संशोधन केंद्रात काम करताना त्यांनी भारतातल्या उसाच्या जातींचा सखोल अभ्यास केला. त्यावेळी ही संस्था इथल्या स्थानिक उसाच्या जातीला प्रमोट करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र उसाची जास्त गोडी असलेली जात आपल्याला जावा बेटावरून आयात करावी लागायची.
अम्मल यांच्या सहकार्यामुळे या संस्थेला उसाची अधिक गोड आणि भारतातील सर्व प्रकारच्या वातावरणात पिकवता येईल अशी सुधारित जात तयार करता आली. त्यासाठी संस्थेने अनेक स्थानिक, देशी जाती क्रॉस ब्रीड करण्यासाठी निश्चित केल्या. अम्मल यांनी कोणत्या संकरामध्ये सुक्रोजचं प्रमाण (साखरेची गोडी ठरवणारा घटक) सगळ्यात जास्त आहे हे शोधण्यासाठी डझनावारी क्रॉस ब्रीड करून पाहिले. या प्रक्रियेत त्यांना गवताच्या वेगवेगळ्या जातींच्या संकरातून बनणारे इतरही काही हायब्रिड मिळाले. त्यामुळे इंडोनेशिया, जावा या देशांवर अवलंबून राहण्याची गरज संपली. त्यामुळेच ‘उसाला गोडवा देणारी शास्त्रज्ञ’ अशी त्यांची ख्याती पसरली.
१९४० मध्ये जानकी अम्मल जॉन इन्स इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्यासाठी इंग्लंडला गेल्या. तिथे त्यांनी जेनेटिक्स विषयात संशोधन करणार्या डार्लिंगटन यांच्याबरोबर काम केलं. त्या दोघांनी मिळून लिहिलेल्या ‘क्रोमोसोम अॅटलास ऑफ कल्टिव्हेटेड प्लान्ट्स’ या पुस्तकात १ लाखाहून जास्त वनस्पतींच्या गुणसूत्रांची नोंद आहे आणि वनस्पतींचा संकर तसंच त्यांच्या उत्क्रांतीचं स्वरूप यांबद्दल माहिती देणारा हा महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो.
१९४६ मध्ये रॉयल हॉर्टिकल्चर सोसायटीने त्यांना सायटोलॉजिस्ट म्हणून नोकरी देऊ केली. त्यासाठी त्यांनी इन्स इन्स्टिट्यूट सोडली आणि रॉयल हॉर्टिकल्चर सोसायटीच्या त्या पहिल्या पगारदार स्त्री कर्मचारी ठरल्या. तिथे त्यांनी वनस्पतींमधील गुणसूत्रांची संख्या दुप्पट करून झटपट वाढणारी झाडं विकसित करणार्या कोल्चिसिन या रसायनावर संशोधन केलं. त्यांच्या संशोधनातून विकसित झालेलं पांढर्याशुभ्र पाकळ्या आणि जांभळे पुंकेसर असलेलं मॅग्नोलिया कोबुस जानकी अम्मल हे झाड आजही त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देत वाइस्ली इथल्या बागेत फुलत आहे.
१९५० मध्ये त्या पंतप्रधान नेहरूंच्या विनंतीवरून भारतात परतल्या. त्यावेळी लखनौच्या सेंट्रल बोटॅनिकल लॅबोरेटरीवर पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. मात्र या दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की पूर्वी पडलेल्या दुष्काळातून बाहेर येण्यासाठी ‘ग्रो मोअर फूड’ या मोहिमेअंतर्गत जवळपास २५ दशलक्ष हेक्टर जमिनीवर जंगलतोड झाली आहे आणि आता तिथे शेती केली जात आहे. हे चित्र इतकं विदारक होतं, की आसाम मेघालय पट्ट्यात आढळणारं मॅग्नोलिया ग्रिफिथी कुळातलं एकतरी झाड दिसावं म्हणून त्या शिलाँगपासून ४७ मैलांपर्यंत गेल्या आणि तिथेही त्यांना जे झाड दिसलं ते अर्धवट जळालेलं होतं. थोडक्यात पर्यावरणाविषयीची ही उदासीनता तेव्हापासूनच होती आपल्याकडे!
केरळमधल्या सदाहरित वनांमध्ये औषधी गुणधर्म असलेल्या आणि त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील अशा अनेक वनस्पती आहेत. या झाडाझुडपांच्या नमुन्यांचाही प्रा. अम्मल यांनी संग्रह केला.
जानकी अम्मल स्वत:बद्दल फार कमी बोलायच्या. मात्र त्यांचं काम कायम बोललं. त्यांची हीच अखेरची इच्छा असावी का? आज सगळीकडे आपल्या गुणांचं मार्केटिंग करण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत धावताना ही गोष्ट आपण मात्र विसरतोय कुठेतरी!
लेखिका : स्मिता जोगळेकर