computer

ब्रिटिश शाही विवाह सोहळ्याबद्दलच्या या १२ गोष्टी तुम्हांला माहित आहेत का?

१९ मे २०१८ रोजी प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल यांचा विवाह पार पडला. यापूर्वी केट मिडलटन आणि प्रिन्स विल्यम यांचं २०११मध्ये लग्न झालं तेव्हा भारतीय मिडियाला त्याचं पूर्ण चित्रण करता आलं होतं, इतकं की जणू जगात त्याशिवाय काही घडतच नव्हतं. पण यावेळी शिंची कर्नाटकाची निवडणूक मध्ये कडमडली न काय!! पण तरी सगळ्यांनी या विवाहसोहळ्याची दखल घेतली. अशावेळेस बोभाटानेही बोभाटा करायलाच हवा, नाही का?

चला तर मग, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ब्रिटिश विवाहसोहळ्यांबद्दलच्या काही रंजक गोष्टी... 

१.    प्रिन्स हॅरी आणि मेगनचं लग्न होतंय, ती तारीख काही फारशी शुभ नाही. ती आहे शाही शिरच्छेदाची तारीख..

(राजा हेन्री (आठवा) आणि त्याची दुसरी पत्नी ऍन बोलेन)

आता ब्रिटिश राजघराणं इतकं जुनं आहे आणि त्यात इतकी गुंतागुंत आहे की प्रत्येक तारखेला काही ना काही अशुभ घडलेलं असणारच. पण तुम्हांला माहित आहे का, या प्रिन्स हॅरीचा पूर्वज राजा हेन्री (आठवा) याने त्याच्या सहांपैकी दोन बायकांचा शिरच्छेद करवला होता. त्याची दुसरी पत्नी ऍन बोलेन हिचा शिरच्छेद १९ मे या दिवशीच झाला होता! आणि माहित आहे, या सध्याच्या प्रिन्स हॅरीचं खरं नांव हेन्रीच आहे बरं. 
आता ब्रिटिश लोक काही आपल्या भारतीयांसारखे नाहीत, नाहीतर शुभ-अशुभ दिवस, धार्जिणा दिवस असं करत बसले असते तर या दोघांना लग्नासाठी तारीखच मिळाली नसती!!

२.     पांढरे वेडिंग गाऊन घालण्याची फॅशन क्वीन व्हिक्टोरियाने चालू केली.

१८४०मध्ये या राणीसाहेबांचं लग्न झालं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण बाईसाहेबांनी त्यावेळच्या प्रथेनुसार असलेला रंगीत गाऊन न घालता लग्न चक्क पांढरा गाऊन घालून केलं. पण काय, मोठ्या लोकांनी केलं की त्याची लगेच फॅशन बनते या उक्तीनुसार या पांढऱ्या गाऊन्सची फॅशन अस्तित्वात आली आणि ती आजतागायत चालू आहे. 
बाकी, भारतावर राज्य करणाऱ्या राणी व्हिक्टोरियाबाई आणि ही फॅशन सुरु करणाऱ्या बाई एकच त्याच आहेत... 

३. सामान्य नागरिकाशी लग्न

(आठवा  एडवर्ड आणि वॉलीस सिम्पसन)

याआधी सामान्य नागरिक असलेल्या व्यक्तीशी लग्न झालंच नाही असं नाहीय. १९३६मध्ये तत्कालीन राजा आठव्या एडवर्डने एका राजघराण्याशी संबंधित नसलेल्या एका अमेरिकन स्त्रीशी- वॉलीस सिम्पसनशी-लग्न केलं होतं.  त्यासाठी त्यांनी अगदी आपल्या राजेपदाचा त्यागही केला होता. त्यामुळेच सध्याच्या एलिझाबेथ राणीच्या बाबांना गादी मिळाली होती. 
 आताची ही मेगन मार्कल राजघराण्याशी अगदीच संबंधित नाही असं नाही बरं.. ती आठव्या हेन्रीची तिसरी बायको जेन सेमूरची नातेवाईक आहेच. 

४. विवाहाच्या  शाही मेजवानीत शेलफिश नसतात

या ब्रिटिश राजघराण्यात काही नियम का आहेत हा प्रश्नच आहे. विवाहाच्या  शाही मेजवानीत शेलफिश ही डिश नसणं ही त्यापैंकीच एक!!

५. एलिझाबेथ राणी (द्वितीय)च्या लग्नातला केक चार थरांचा आणि नऊ फूट उंचीचा होता.

शेलफिश नसले म्हणून काय झालं? राणीसाहेबांनी केक तर भलामोठा मागवला होता. अवांतर माहिती म्हणून सांगतो- पहिली राणी एलिझाबेथ ही त्या बायकांना मारणाऱ्या आठव्या हेन्रीची मुलगी. ती आजन्म अविवाहित राहिली. सध्याची नव्वदी पार केलेली आहे ती राणी एलिझाबेथ दुसरी. हा भलामोठा केक अर्थातच सध्याच्या राणीच्या लग्नातला होता. 

६. प्रिन्सेस डायनाच्या लग्नातल्या गाऊनचा ट्रेन २५ फूट लांब होता. 

लग्नातले गाऊन्स किंवा आजकाल रेड कारपेटवरती घातल्या जाणाऱ्या गाऊन्सना पाठीमागे लांबलचक शेपूट असते. प्रिन्सेस डायनाच्या गाऊनचं ते शेपूट २५ फूट लांब होतं. आजवर झालेल्या सर्व शाही विवाहसोहळ्यांतलं ते सर्वात लांब शेपूट होतं. 

७. प्रिन्सेस डायनानं भावी नवऱ्याचं नांवच चुकीचं घेतलं.

या प्रिन्सेस डायनाचं लग्न इतरही बऱ्याच कारणांसाठी गाजलं. तिने भावी नवऱ्याचं नांवच घेताना चुकवलं. फिलिप चार्ल्स ऐवजी ती चक्क चार्ल्स फिलिप्स म्हणाली. 

८. प्रिन्सेस डायनानं "मी नवऱ्याची आज्ञा मानेन" हे कलम काढून टाकलं

तिनं लग्नातल्या आणाभाकांमध्ये आजवर असणारं "मी नवऱ्याची आज्ञा मानेन" हे कलम काढून टाकलं होतं. तसंही तिनं बऱ्याच शाही रिवाजांना एकदम आत्मविश्वासानं धुडकावलं होतं. हे कलम काढणं कदाचित त्यातलं पहिलं पाऊल असावं.

९. प्रिन्स चार्ल्स आणि  कॅमिलिया पार्करना त्यांच्या लग्नाच्या आणाभाकांमध्ये त्यांच्या आधीच्या चुकांचं स्मरण करावं लागलं होतं. 

प्रिन्सेस डायनासोबत घटस्फोट झाल्यावर प्रिन्स चार्ल्सने कॅमिलिया पार्करशी लग्न केलं. त्या दोघांनाही त्यांच्या लग्नाच्या आणाभाकांमध्ये त्यांच्या आधीच्या चुकांचं स्मरण करावं लागलं होतं. 

१०. केट मिडलटनने स्वत:च्या लग्नात स्वत:च मेकअप केला होता. 

आता शाही विवाह म्हणजे काही लाखो पौंडांचा खर्च. पण  तिची स्वत:ची इच्छा म्हणून  केट मिडलटनने आपल्या लग्नात स्वत:चा मेकअप स्वत:च केला होता. तीही बऱ्याच बाबतीत शाही रिवाज पाळण्याऐवजी प्रिन्सेस डायनाचा कित्ता गिरवताना दिसते. 

११. केट मिडलटनने लग्नात दोन ड्रेस घातले होते.

आता हळदीची पिवळी, लग्न लागतानाचा शालू, रिसेप्शनची साडी किंवा लेहंगा  असले काही प्रकार नसतात त्यांच्याकडे. त्यामुळं केटने  लग्नात दोन गाऊन्स घातले तर त्याचीही बातमी होते. आपल्याकडे दूरच्या नातेवाईक बायकापण लग्नात दोनतीन साड्या नेसतात. 

 

१२. मेगन मार्कलचा वेडिंग गाऊन जवळजवळ चार लाख पौंडांचा आहे.

आता नाहीतरी वेडिंग गाऊन्सबद्दल बोलत आहोतच, तर मेगनच्या गाऊनबद्दलही सांगूनच टाकू. तिचा ड्रेस, खासकरून वेडिंग वेल म्हणजे बुरखा आणि त्याचं शेपूट सुंदरच होते. मेगन दिसलीही सुरेख. पण, ३,८७,००० पौंडांच्या  मानानं ड्रेस खूपच साधा होता असं नेटकरांचं आणि नेटकरणींचं म्हणणं आहे. तुम्हांला काय वाटतं?

असो..  एकेकाळी ब्रिटिशांनी जवळजवळ सर्व जगावर राज्य केलंय. त्यामुळं कितीही नावं ठेवली तरी लोक त्यांच्या राजघराण्याबद्दल चर्चा करणं काही थांबवत नाहीत. 

सबस्क्राईब करा

* indicates required