उद्या अंकिताला न्याय मिळेल का ? ९ फेब्रुवारी रोजी निकाल अपेक्षित आहे.
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/Untitled%20design%20%2865%29_3.jpg?itok=n-fSImT3)
१० फेब्रुवारी २०२०. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटसाठी हा दिवस काळाकुट्ट ठरला. सकाळीच आलेल्या त्या बातमीने गावावर दु:खाचे, संतापाचे सावट पसरले. बातमी होती अंकिता पिसुड्डे हिच्या मृत्यूची. आठवड्यापूर्वीच तिला विकेश नगराळे नावाच्या नरपशूने पेट्रोल ओतून जिवंत जाळले होते. त्यात ती सुमारे ३५ ते ४० टक्के भाजली होती.
अंकिता हिंगणघाटच्या स्व.आशाताई कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र शिकवायची. ती तेथे अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. ३ फेब्रुवारी २०२० रोजी ती नेहमीप्रमाणे सकाळी कॉलेजला जायला निघाली होती. बसमधून उतरताना पुढे काय वाढून ठेवले आहे याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. पण काळ विकेश नगराळे नामक माथेफिरूच्या रूपाने दबा धरून बसला होता. तिने आपल्याला नाकारल्याचा राग त्याच्या मनात अजूनही धुमसत होता. त्याचे स्वतःचे लग्न होऊनही, घरी लहान मुलगी असूनही तो अंकिताला विसरू शकत नव्हता.
तिच्या कॉलेजचा रस्ता त्याला माहीत होता. ती त्या रस्त्याने जाताना दुचाकीतील पेट्रोल अंगावर टाकून तिला पेटवण्याचा त्याचा बेत होता. त्याप्रमाणे ती जाताना दिसली, आणि त्याबरोबर विकेशने तिच्या मागून जात तिच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि तिला पेटवून दिले. तिला होरपळलेल्या अवस्थेत प्राथमिक उपचार करून नंतर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. पण सेप्टीसेमियाची लक्षणे दिसू लागली आणि धोक्याची घंटा वाजली. सेप्टीसेमिया म्हणजे भाजल्याने त्वचेवर होणाऱ्या जखमांमधून रक्तात जंतुसंसर्ग पसरणे आणि एकेक अवयव निकामी होऊ लागणे.
शेवटी डॉक्टरांची भीती खरी ठरली. १० फेब्रुवारीला तिने सकाळी जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी आरोपी विकेश नगराळेला फाशी देण्याची मागणी केली. काही संतप्त नातेवाईकांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला असेच हाल हाल करून जिवंत जाळतो म्हणत दंड थोपटले. रास्ता रोको, मृतदेह असलेल्या रुग्णवाहिकेवर आणि पोलिसांवर दगडफेक यांमधून लोक किती संतप्त झाले आहेत हे दिसले.
प्रकरणाची संवेदनशीलता पाहता या प्रकरणाचा तपास अत्यंत जलदगतीने पूर्ण करण्यात आला. घटनेनंतर आरोपीला चार तासांच्या आत पोलिसांनी बुटीबोरीजवळील टाकळघाट एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. विकेश नगराळेने अटकेत असताना नागपूर कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. त्याला पांघरायला दिलेल्या ब्लँकेटची चिंधी फाडून तिच्या साहाय्याने त्याने गळफास घ्यायचा प्रयत्न केला होता. कारागृह प्रशासनाने मात्र ही गोष्ट नाकारत त्याच्या आत्महत्येचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले. केवळ २६ दिवसांमध्ये (कार्यालयीन कामकाजाचे १९ दिवस) सबळ पुराव्यानिशी ४२६ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. मधील काळात कोव्हिड तसेच लॉकडाऊन यांमुळे प्रकरणाची सुनावणी लांबली, पण आता ती पूर्ण झाली आहे. ९ फेब्रुवारी रोजी निकाल अपेक्षित आहे. आता तरी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होऊन अंकिताला न्याय मिळावा अशी सगळ्यांची इच्छा आहे.
या प्रकरणानंतर झालेली एक सकारात्मक गोष्ट म्हणजे राज्यात शक्ती कायदा अमलात आणण्याची घोषणा. राज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचारांना आळा बसावा, यासाठीचा हा फौजदारी कायदा विधिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. बलात्कार, अॅसिड हल्ला, तसेच सोशल मीडियाद्वारे महिला व बालकांची बदनामी करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.
सध्या सगळ्यांना ९ फेब्रुवारीच्या निकालाची प्रतीक्षा आहे.