computer

गेम्सच्या व्यसनात बुडालेल्या लोकांनी काय काय केलंय ? वाचून वेड लागेल...

हल्ली लहान लहान मुलं आपल्या आईवडिलांच्या फोनशी तासंतास चिकटलेली असतात आणि आईवडीलसुद्धा कटकट नको म्हणून त्यांना गेममध्ये बिझी ठेवतात. खेळणाऱ्यांची संख्या वाढत आहे तसे गेम्सदेखील दिवसेंदिवस अॅडव्हांस होत चालले आहेत. खेळणाऱ्याला सरळ त्या गेमच्या आत खेचून नेणारं 3D, 4D, HD, व्हर्च्युअल रिऍलिटी इत्त्यादी तंत्रज्ञान विकसित झालं आहे. परिणामी आपण त्यात एवढे अडकून पडतो की भूक लागत नाही, तहान लागत नाही, झोप विसरून जातो. अशात जर कोणी आपल्याला येऊन डिस्टर्ब केलं तर मात्र आपली सटकते. साधारणपणे रागाच्या भरात आपण आरडाओरडा करू.  पण काही माणसे याही पलीकडे जातात.

 

गेमिंग आता फक्त खेळ न राहता जीवाचा प्रश्न होऊ लागला आहे. हे प्रमाण टीनएजर्समध्ये जास्त आढळून येतं. नुकतंच आलेलं ब्ल्यू व्हेल गेम हे आताचं ताजं उदाहरण आहे.  पण याही आधी गेम्सच्या नादातून या ना त्या कारणाने अनेकांच्या जीवावर बेतलं आहे

आज आपण अशीच काही उदाहरणं पाहूया..

१. डोटा गेम

फेब्रुवारी, २०१४ साली फिलिपाइन्समध्ये एका १६ वर्षाच्या मुलाने  ११ वर्षाच्या मुलाला आपलं गेमिंग अकाउंट हॅक केल्याच्या रागावरून मारून टाकले. क्रूरपणा म्हणजे यावेळी मारणाऱ्या मुलाने रागात त्याला ४० वेळा भोसकले होते.

२. बेर्झेर्क गेम

पीटर बुर्कोवस्की नामक मुलाला बेर्झेर्क गेम खेळण्याचा इतका नाद लागला की तो तासंतास त्यातच गुंतून राहत होता, शेवटी कार्डियाक अरेस्ट (हृदय बंद पडणे) मुळे त्याचा मृत्यू झाला. बेर्झेर्क गेम काही काळापूर्वीच आला असून हा त्याचा पहिलाच बळी मानला जातो.

३. मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स घोस्ट रिकॉन

२००८ साली टायरॉन स्पेलमन नावाच्या एका माणसाने क्रूरपणे आपल्या १७ महिन्यांच्या मुलीची हत्या केली. याचं कारण म्हणजे त्या चिमुकलीने गेमची वायर ओढली आणि गेम खराब केला. मुलीचं डोकं  ठेचून त्यानं तिचा जीव घेतला.

हा माणूस या गेमच्या खूपच आहारी गेल्याचं समोर आलं आहे. सलग ६ ते ७ तास तो गेम खेळत बसून राहायचा.

४. एवरक्विस्ट

२००१ साली श्वोन वूली या २१ वर्षाच्या तरुणाने स्वतःला गोळ्या घालून आपलं जीवन संपवलं. त्याच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे तो जेव्हा मेला तेव्हा त्याच्या कम्प्युटरवर एवरक्विस्ट गेम चालू होता आणि हा मुलगा या गेमच्या प्रचंड आहारी होता.

५. हालो ३

तब्बल १२ तास गेम खेळण्याच्या सवय लागलेल्या ख्रिस स्टॅनफोर्थ चा मृत्यू रक्ताच्या गाठीमुळे झाला. रात्रभर गेम खेळण्याची सवय आणि तासंतास एकाच जागी बसल्यामुळे त्याच्या पायाला रक्ताची गाठ आली. काहीवेळा तो १२ तास गेममध्ये व्यग्र असल्याचं त्याच्या घरच्यांनी सांगितलं.

६. ग्रॅन्ड थेफ्ट औटो वाईस सिटी

अल्बामा मध्ये २००३ साली डेवीन मूर नावाच्या माणसाने चक्क खऱ्या आयुष्यात ग्रॅन्ड थेफ्ट गेममधलं पात्र डोळ्यासमोर ठेवून २ पोलिसांना ठार केलं होतं. त्याच्यावर या पात्राचा परिणाम साफ दिसतो. शेवटी  एका कर चोरी करण्याच्या प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आलं.

७. फार्मविले

फार्मविले गेम खेळत असताना आपलं मुल रडतंय या कारणाने एका बाईने त्या नवजात मुलाला इतक्या जोरात थोपटलं की त्याच्या डोक्याला इजा झाली आणि ते मूल मेलं. यावरून हिंसक वृत्ती किती फोफावत आहे हे कळून येईल.

८. मॅनहंट मर्डर

या गेमपासून प्रेरणा घेऊन १७ वर्षाच्या मुलाने आपल्या मित्राला ठार केलं आणि तेही अगदी त्याच  गेमिंग स्टाईल मध्ये. त्याने स्वतः या बद्दल कबुली दिली होती.

९. वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट

ही केस थोडी विचित्र आहे. रेबेका कॉलेन ख्रिस्टी ही महिला गेम खेळण्यात इतकी बिझी झाली की ती आपल्या लहान मुलीला जेवू घालायला विसरली. ती मुलगी शेवटी कुपोषणाने मेली आणि आश्चर्य म्हणजे ही महिला गेममधल्या एका खोट्या मुलाला सांभाळण्यात व्यग्र होती.

१०. ग्रॅन्ड थेफ्ट औटो सिटी ४

या गेमचा जास्त परिणाम हल्लीच्या पिढीवर झालेला दिसून येत आहे. यातून अनेक जणांचा जीव गेला. अमेरिकेतील एका ८ वर्षाच्या मुलाने आपल्याच आजीचा जीव अगदी गेममधल्या पद्धतीप्रमाणे घेतला.

११. ब्ल्यू व्हेल.

सर्व गेम्सचं विकृत रूप म्हणजे ब्ल्यू व्हेल.  

हा गेम खरंतर वरच्या सगळ्या खेळांपेक्षा वेगळा आहे. हा डाउनलोड करून खेळता येणारा गेम नाही. या गेमचे सर्व्हर्स कुठेही अस्तित्वात नाहीत्.  हा कुठल्याही वेबसाईटवर, फेसबुकवर किंवा अगदी व्हॉटसॅपवर म्हणजे जिथं लोक एकमेकांशी संवाद साधू शकतील तिथं सुरू होऊ शकतो.  हा खेळ खेळवणारे लोक मानसिकदृष्ट्या कमकुवत किंवा मित्र-कुटुंबापासून दूर गेलेल्या आणि खऱ्या जगाशी संवाद कमी असलेल्या लोकांना हेरतात आणि त्यांना या खेळात सामील करून घेतात. 
घरातल्या लोकांशी आणि मित्रमंडळींशी खुला संवाद तसंच  ऑनलाईन फोरम्सवर अनोळखी लोकांपासून सावध राहाणं या दोन गोष्टी केल्यास मुलं या गेमपासून दूर राहतील.

याबद्दल आणखी तुम्ही आमच्या “काय आहे हा ब्लू व्हेल गेम? आणि मुलं हा गेम खेळून आत्महत्या का करत आहेत ?” या लेखात वाचू शकता.

 

मित्रांनो विरंगुळ्यासाठी किंवा एक ब्रेक म्हणून गेम ठीक आहे पण त्यात इतकं अडकून राहणे हे आपल्यासाठी आणि आपल्या घरच्यांसाठी धोकादायक ठरू शकतं.

सबस्क्राईब करा

* indicates required