१.०८ कोटी रुपयांच्या या घरात चक्क तुरुंग का आहे?

"एक बंगला बने न्यारा" या गाण्याप्रमाणेच प्रत्येकाचं घराचं स्वप्नं असतंच ना! तुम्हाला काय वाटतं कसं असावं तुमचं घर? त्यात काय काय सुविधा असाव्यात? किंवा घराचं अंतर्गत रूप (इंटिरियर) कसं असावं याविषयी प्रत्येकजण आपल्या मनात आराखडे आखतोच. काहींना मॉडर्न तर काहींना भारतीय पद्धतीचं घर आवडतं. तयार घर असेल तर त्यातही काही अपेक्षा असते.
बाहेरच्या देशात घर घ्यायची पद्धत वेगळी असते. तिथे संपूर्ण घराची किंमत केली जाते. त्यात सर्व सोयीसुविधा तयारच असतात. ग्राहकाच्या बजेटनुसार जेव्हा कुठला ब्रोकर घर दाखवतो तेव्हा तो त्यामध्ये असलेली सगळी वैशिष्ट्येही सांगतो. ग्राहकांना पसंत असेल तर व्यवहार पूर्ण होतो.
असंच एक घर अमेरिकेतल्या गाईडहॉल, व्हरमाँट (Guidhall, Vermont) येथे उपलब्ध आहे. ४ बेडरूमच्या या घराची किंमत तब्बल १.०८ कोटी ( १,४९,००० डॉलर) इतकी आहे. या घराचं पूर्ण क्षेत्रफळ २१९० sq ft इतकं मोठं आहे. पण हे घर एका वेगळ्याच गोष्टीसाठी ओळखलं जातं. ही गोष्ट म्हणजे या घरात जेलचे चक्क ७ सेल्स आहेत. म्हणजे घरात ७ तुरुंग आणि तेही खिडकी आणि जेलरच्या ऑफिससहीत आहे. बसला ना धक्का? फोटो पाहून तुम्हाला अंदाज येईलच. हे फोटो सगळीकडे खूप व्हायरल झाले आहेत.
घरात तुरुंग का आहे?
तर सत्य हे आहे की हे घर १९६९ पर्यंत Essex County Jail म्हणून ओळखले जायचे. आणि यातली बरीचशी जागा ही तेव्हाच्या जेलरच्या मालकीची होती. १८८०मध्ये हे बांधकाम झाले होते.जेलर तेव्हा तिथेच राहायला होता. आता या तुरुंगात किती आणि कुठल्या प्रकारचे कैदी राहिलेत किंवा कैदी होते की नाही, याविषयी नक्की माहिती कोणाकडे नाही.
असं घर कोण घेईल, असा प्रश्न पडत असेल तर थांबा, कारण मागच्यावर्षी इंग्लडला असेच एक ५ बेडरुमचं घर तब्बल २.५ लाख डॉलर्स या विक्रमी किंमतीत विकलं गेलं होतं. बघा, कोणाला अशा हटके घरात रस असेल तर ही जेलची डिझाईन त्याला नक्कीच आवडेल. आणि त्यासाठी तो पडेल ती किंमत द्यायलाही तयार होईलच.
असो, सध्यातरी या घराची नेटकऱ्यांमध्ये भरपूर चर्चा आहे. हे घर नक्की कोण घेईल हे पाहणेही उत्सुकतेचे ठरेल.
लेखिका: शीतल अजय दरंदळे