तुमचा गॅस सिलिंडर चांगला आहे की कामातून गेलाय? आताच चेक करा बरं..
गॅस सिलिंडर या अत्यंत धोकादायक असलेल्या वस्तूशिवाय आपलं पानसुद्धा हलत नाही. तेव्हा आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणं आपल्याच हाती आहे. आज बोभाटा.कॉम घेऊन आले आहे "सिलिंडरची व्हॅलिडिटी कशी तपासून पाहावी" याची माहिती..
सिलिंडर उचलण्यासाठी जी गोल लोखंडी रिंग असते, तिला आधार म्हणून तीन पट्ट्या असतात. त्यातल्याच एका पट्टीवर असते आपल्या गॅस सिलिंडरची एक्सपायरी डेट. पण ती सुद्धा सरळ सरळ न लिहिता थोडी कोड्यात लिहिलेली असते. म्हणजेच, तिथे A, B, C, किंवा D यापैकी एक अक्षर असतं आणि त्यानंतर लिहिलेले असतात दोन आकडे. या गोष्टींवरूनच आपल्याला गॅस सिलिंडरची एक्सपायरी डेट कळते.
कशी ओळखाल एक्सपायरी डेट?
A म्हणजे - जानेवारी ते मार्च
B म्हणजे - एप्रिल ते जून
C म्हणजे - जुलै ते सप्टेंबर
D म्हणजे - आॅक्टेबर ते डिसेंबर
आता या A, B, C, किंवा D यानंतर येतात दोन आकडे. आता त्यांचं काय गुपित आहे? तर ते दोन आकडे साल दर्शवतात. अक्षराचा शेवटचा महिना आणि त्या दोन अंकांनी दाखवलेल्या सालानंतर असा सिलिंडर घरात ठेवणं म्हणजे जणू घरात जिवंत बॉंब ठेवणं. आता वरच्या फोटोत लिहिलं आहे- B13. म्हणजेच हा सिलिंडर २०१३ या सालाच्या B म्हणजे जास्तीत जास्त जून महिन्यापर्यंतच व्हॅलिड आहे. त्यानंतर तो वापरू नये.
आपल्याला कित्येकदा बाबा आदमच्या युगातून आल्यासारखे जुनेपुराणे सिलिंडर्स मिळतात. अशा सिलिंडरच्या विरोधात तक्रार नोंदवून आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे.