देसी ब्रेकिंग बॅड...भारतीय रसायनशास्त्रज्ञाने स्वतःच्या लॅबमध्ये तयार केला अंमली पदार्थ !!
एक केमिस्ट्रीचा प्रोफेसर असतो. त्याला कॅन्सर होतो. मग तो कॅन्सरचा सगळा खर्च काढण्यासाठी आपल्या एका जुन्या विद्यार्थ्याच्या सोबतीने मेथ तयार करू लागतो. हा विद्यार्थी तसा विद्यार्थी राहिलेला नसून ड्रग्सच्या आहारी गेलेला आणि अगदी वाया गेलेला तरुण आहे. या केमिस्ट्री प्रोफेसरकडे आपल्या रसायनशास्त्रातलं ज्ञान आहे. मग काय, दोघांची भट्टी जमते आणि दोघेही उच्चप्रतीचा मेथ तयार करू लागतात.
ही कथा आहे नेटफ्लिक्सच्या जगप्रसिद्ध ब्रेकिंग बॅड सिरीजची. अशा कथा नेटफ्लिक्सच्या सिरीजमध्येच चांगल्या वाटतात नाही का? पण काही लोक असतात जे हे प्रत्यक्षातही उतरवतात. आता तेलंगणाचंच उदाहरण घ्या ना.
तेलंगणाच्या हैदराबाद येथे DRI ला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे एका आरोपीला व त्याच्या गिऱ्हाईकाला रंगेहाथ अटक केली आहे. हा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून ४५ वर्षांचा रसायनशास्त्रात पीएचडी केलेला संशोधक आहे. तो यापूर्वी एका फार्मा कंपनीत काम देखील करत होता.
श्रीनिवास राव असं या संशोधकाचं नाव आहे. श्रीनिवास राव व त्याचे साथीदार एका छुप्या लॅबमध्ये मेफेड्रॉन ड्रग्स तयार करत होते. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) त्याच्या छुप्या लॅबचा भंडाफोड केला. DRI एजन्सीचा दावा आहे की श्रीनिवास राव मुंबईच्या अंमली औषधांच्या रॅकेटमध्ये काम करत होता. त्याने रॅकेटसाठी आजवर १०० किलो ड्रग्स पुरवले आहेत. एवढंच नाही तर त्याने एका वर्षात १०० किलोपेक्षा जास्त मेफेड्रॉनचे उत्पादन आणि विक्री केली आहे. या छाप्यादरम्यान ३.१५६ किलोग्राम मेफेड्रोन जप्त केले गेले आहे. याची किंमत जवळपास ६४ लाख रुपये होती.
3.15 kgs of Mephedrone, banned psychotropic substance, worth around 63.12 lakhs was seized and two persons were arrested in Hyderabad, Telangana on December 11: Directorate of Revenue Intelligence (DRI) pic.twitter.com/QanJdWarrm
— ANI (@ANI) December 12, 2020
याखेरीज या संशोधकाने घरात ११२ ग्राम मेफेड्रोन तसेच १२.४० लाख इतकी रोख रक्कमही दडवून ठेवली होती आणि मेफेड्रोनच्या उत्पादनासाठी लागणारा ५ किलो कच्चा मालही जमा करून ठेवला होता. पोलिसांनी हे सगळं आता आपल्या ताब्यात घेतलं आहे.
आहे ना धक्कादायक? हा रसायनशास्त्रज्ञ हैद्राबाद सारख्या शहरात स्वतःच्या लॅब मध्ये मेफेड्रॉन बनवून मुंबईच्या टोळीला विकत देखील होता.
मगासपासून आपण मेफेड्रॉन बद्दल बोलतोय पण हे मेफेड्रॉन किंवा MD काय आहे ते जाणून घ्यायला हवं.
भारतात मेफेड्रॉन या ड्रगला नारकोटिक ड्रग्स आणि साइकोट्रोपिक पदार्थ अधिनियम, १९८५ (एनडीपीएस ) च्या कायद्यानुसार बंदी आहे. या ड्रगला 'म्याऊं-म्याऊं' या नावानेही ओळखले जाते. कोकेन आणि हेरोइन ड्रग इतकाच हा पदार्थ अंमली आहे. पण याची किंमत कमी असते.
थोडक्यात हे एक कृत्रिम उत्तेजक औषध आहे. पण याचे दुष्परिणामही आहेत.ड्रग घेतल्यानंतर दोन-तीन दिवस झोप न येणे, अति उत्साह जाणवतो पण त्यानंतर टोकाचे नैराश्य येते.ड्रगचा अंमल असेपर्यंत भूकही लागत नाही. त्याने शरीरावर खूप वाईट परिणाम होतात. तसेच त्याचे दुष्परिणाम फारच घातक आहेत. कॉलेज तरुणांपासून शाळकरी विद्यार्थीही या एमडीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
तर, अभ्यासक्रमात मिळालेले ज्ञान, कष्ट करून मिळवलेली पदवी याचा उपयोग चांगले संशोधनासाठी करायचा की त्याचा दुरुपयोग करायचा याचा विचार करणे इतके अवघड आहे का? असाच कुविचार इतर शास्त्रज्ञांनी केला असता तर काय झाले असते याचा विचार करून पहा. झटपट श्रीमंत व्हायचा मार्ग शेवटी माणसाला गुन्हेगारीच्या मार्गावर नेतो हेच यातून सिद्ध होते..
लेखिका: शीतल अजय दरंदळे