computer

दोन्ही हात गमावूनही तिने पीएचडीचा प्रबंध कसा लिहिला? तिची कथा तुम्हाला खूप काही शिकवून जाईल!!

मालविका अय्यर १३ वर्षांची असताना  ग्रेनेडच्या स्फोटात तिने आपले दोन्ही हात गमावले. एवढा मोठा अपघात होऊनही तिने आपली जिद्द मात्र सोडली नाही. तिने आजवर जे काही सध्या केलं आहे ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

आज मालविका अय्यरची कथा सांगण्या मागचं कारण म्हणजे १८ फेब्रुवारी या दिवशी तिचा वाढदिवस असतो. आपल्या वाढदिवशी तिने संयुक्त राष्ट्रासमोर दिलेल्या भाषणातील काही उतारे शेअर केले होते. त्यात तिने स्वतःची जी गोष्ट सांगितली ती तुम्हाला हादरवून तर सोडतेच पण प्रेरणाही देते.

ती म्हणते, की ‘जेव्हा ब्लास्टमध्ये माझे हात निकामी झाले तेव्हा ऑपरेशनच्यावेळी डॉक्टर अत्यंत दबावाखाली काम करत होते. म्हणूनच की काय त्यांच्याकडून एक मोठी चूक घडली.’

ती चूक अशी की मालविकाचे हात जिथून कापले गेले आहेत तिथे असलेलं हाड डॉक्टरांनी उघडंच ठेवलं आहे. खरं तर हे हाड चामडीने झाकायला हवं होतं. या चुकीमुळे तिच्या हाडे आजही बाहेर दिसतात. मालविका म्हणते की जर माझे हात कोणालाही धडकले तर वेदनेने माझा जीव जाऊ शकतो.

पुढे ती म्हणते, की ‘डॉक्टरांची ही चूक माझ्यासाठी वरदान ठरली आहे.’ ही हाडे तिच्यासाठी बोटांच काम करतात. याच हाडांच्या मदतीने ती लिहिते. तिने जे ट्विट केलं होतं तेही तिने याच हातांनी टाईप केलं होतं. हे तर काहीच नाही. तिने पीएचडीचा संपूर्ण प्रबंध स्वतः लिहिला आहे. एवढंच नाही तर तिने स्वतःची वेबसाईटही तयार केली आहे.

ती म्हणते. की ‘मी आजवर जे जे मिळवलं ते ते माझ्यासाठी मौल्यवान आहे. अनेकदा मी जीवन मरणाच्या उंबरठ्यावर उभी होते पण दरवेळी मी योग्य निर्णय घेतला. त्याबद्दल मला स्वतःचा अभिमान वाटतो’  

मंडळी, मालविका अय्यर ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती आहे आणि ती अपंगांच्या हक्कांसाठी लढत आहे. याखेरीज ती आपल्या स्वतःच्या अनुभवांवरून इतरांना प्रेरणा द्यायचं कामही करत आहे. तिच्या जिद्दीला सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required