बर्थडेला केक का कापतात ? मेणबत्ती का फुंकतात ? वाचा हैप्पी बर्थडेचं लॉजिक !!!
फेसबुकमुळे एक फायदा तर झालंय राव, सगळ्यांचे बर्थडे बरोब्बर आठवणीत राहतात. आता आलेल्या व्हॉट्सअॅपमुळे तर आणखी सोप्प झालंय. ग्रुपचं नाव बदलण्यापासून ते, विश करणं असेल, बर्थडे बॉयचा फोटो अपलोड करून ‘हॅपी बर्थडे भावा’ बोलणं असेल. सोशल मिडिया मुळे बर्थडेच्या किती नवीन प्रथा तयार झाल्या आहेत.
या सगळ्यात एक प्रथा मात्र कधीच बंद झाली नाही. ती म्हणजे बर्थडेला केक कापणे, मेणबत्त्या फुंकणे. केकसाठी तर ‘मॉन्जीनीज’ प्रसिद्धच आहे. पण कधी विचार केला आहे का, वाढदिवशी केकचं का कापतात, मेणबत्त्यांना फुंकर का घालतात ? कधी तरी तुमच्या डोक्यात असला सेंटीमेंटल विचार आलाच असेल ना. याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर वळूया आपल्या विषयाकडे !
केकची भानगड कधी सुरु झाली ?
असं म्हणतात की वाढदिवशी केक कापण्याची पद्धत खऱ्या अर्थाने जर्मनीत सुरु झाली. इसवी सन १४०० च्या आसपासचा तो काळ होता. सुरुवातीला फक्त लग्न समारंभी केक कटिंग करण्यात येत असे पण धंद्याच्या हिशोबाने बेकरी वाल्यांनी जन्मदिवसासाठी खास केकची मार्केटिंग सुरु केली. यानंतर केक कापणे ही एक पद्धतच झाली मंडळी.
औद्योगिक क्रांती पर्यंत वाढदिवशी कापला जाणारा केक हा उच्चभ्रूंपर्यंत मर्यादित होता पण क्रांती नंतर तो खऱ्या अर्थाने सामान्य माणसात जाऊन पोहोचला आणि तिथून मग जगभरात गेला.
मेणबत्त्त्यांचा आणि केकचा संबंध काय ?
एका अभ्यासानुसार ग्रीक लोक केकवर मेणबत्ती लावायचे. ग्रीक लोक देवी ‘आर्टेमिस’ चा जन्मदिवस साजरा करण्यासाठी केक नैवेद्याच्या रुपात वाहत असतं. आर्टेमिसला ‘गोड ऑफ मून’ (चंद्राची देवी) म्हटले जाते त्यामुळे तिच्यासाठी आणलेल्या केकला चंद्रासारखी चमक यावी म्हणून त्यावर मेणबत्ती लावली जात असे.
मेणबत्तीला फुंकर घालण्याची पद्धत आपल्यातील अनेकांना पटत नाही पण यापाठी ग्रीकांच लॉजिक काही वेगळं होतं. त्यांच्या मताप्रमाणे वाढदिवशी मनात एखादी इच्छा धरून मेणबत्तीला फुंकर घालायची असते. यावेळी मेणबत्तीतून निघणारा धूर आपली इच्छा देवा पर्यंत पोहोचवतो असं म्हटलं जातं.
दुसऱ्या एका अभ्यासानुसार जर्मनीत १७ व्या शतकात जेव्हा लहान मुलांचा वाढदिवस साजरा केला जायचा तेव्हा केक वर मेणबत्ती लावली जायची असं म्हटलं जातं. इथेही अशीच मान्यता होती की मेंबात्तीला फुंकर घातल्याने आपली इच्छा पूर्ण होते.
आता तुम्ही म्हणाल हे फुगे लावणे, पताका लावणे हे कुठून आलं ब्वा ? तर या सगळ्या गोष्टींची पुढे काळानुसार भर पडत गेली. पुढे जाऊन व्हॉट्सअॅप डीपीला बर्थडे बॉयचा फोटो ठेवणे ही देखील एक आघाडीची प्रथा बनू शकते. तशी ती झालीच आहे म्हणाना !!!