आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारे १० बॉलर्स !!
आयपीएलमध्ये बॅट्समनचे वर्चस्व बघायला मिळते. मोठमोठी धावसंख्या करून चौकार, षटकार मारून आयपीएलची रंगत हे बॅट्समन वाढवत असतात. पण बॉलर्सदेखील काही कमी नाहीत. दणादण विकेट काढणारे बॉलर एका रात्रीत हिट झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. या बॉलर्सला विकत घेण्यासाठी अनेक संघ तगडी किंमत मोजत असतात. आज याच सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलर्सची आपण ओळख करून घेणार आहोत.
१. सुनील नरीन
सुनील नरीन हे नाव भारतीय वाटत असले तरी तो वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे. सुनील नरीनच्या बॉलिंगवर अनेकांची फजिती झालेली बघायला मिळते. साक्षात धोनीला देखील त्याच्या बॉलिंगवर फटके मारणे जमत नाही. २०१२ पासून तो आयपीएल खेळतोय एवढ्या वर्षात तो कोलकाता सोडून दुसऱ्या कुठल्याही टीमकडून खेळला नाही. कोलकाता कडून खेळत असताना त्याने सर्वाधिक ९५,२४,७८,००० रुपयांची कमाई केली आहे.
२. हरभजन सिंग
सर्वांच्या लाडक्या भज्जीने या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. हरभजन सिंगच्या बॉलिंगबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही. आपल्या फिरकीवर त्याने अनेक महान खेळाडूंना नाचवले आहे. याच कारणामुळे त्याने आयपीएलमध्ये देखील चांगली कमाई केली आहे. विविध संघांकडून खेळत त्याने या वर्षांमध्ये ५८,१४,००,००० रुपये एवढी कमाई केली आहे.
३. भुवनेश्वर कुमार
2009 साली रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कडून पदार्पण करणारा भुवनेश्वर कुमार लवकरच भारतीय संघात देखील महत्वाचा खेळाडू झाला होता. आयपीएलच्या दर बोलीत त्याची किंमत वधारलेली पाहायला मिळाली आहे. एवढ्या वर्षात त्याने 51,72,62,778 एवढे पैसे कमावले आहेत.
४. लसीथ मलिंगा
श्रीलंकेचा हा खेळाडू जगभर आकर्षणाचे केंद्र आहे. भेदक यॉर्कर टाकण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे यॉर्कर म्हणजे मलिंगा अशी त्याची ओळख तयार झाली आहे. मलिंगा देखील पहिल्या सिझनपासून मुंबईसोबत खेळत होता. २०२० सालचा गेला सिझन हा त्याच्या शेवटचा सिझन होता. या काळात त्याच्यावर मुंबईने खर्च केलेले ४८,२२,१९,५०० रुपये त्याने पुरेपूर वसूल करून दिले आहेत.
५. डेल स्टेन
दक्षिण आफ्रिकेच्या या बॉलरची दहशत आजही अनेकांना आठवत असेल. आपल्या भेदक बॉलिंगने त्याने अनेक सामने एकहाती फिरवले आहेत. हाच करिष्मा त्याने आयपीएल मध्ये देखील बराच वेळ दाखवला होता. पुढे तो विशेष कामगिरी करू शकत नाही. तरी देखील त्याने आजवर ४७,१५,०८,२५० एवढी कमाई केली आहे.
६. राशिद खान
अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मागास असला तरी त्यांचा एक खेळाडू मात्र जगभर प्रसिद्ध आहे. राशिद खानने आपला पहिला आयपीएल सामना २०२० साली खेळला. एवढ्या कमी वर्षात देखील त्याने कमाईच्या बाबतीत ६वा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या सिझनमध्ये त्याने ४ कोटी कमवले पण पुढच्या सिझनपासून त्याचे प्रमोशन होऊन तो ९ कोटी कमवायला लागला.
७. पॅट कमिन्स
नुकताच कोरोना मदतीसाठी धावून आलेला पॅट कमिन्स देखील कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे. २०१४ साली कोलकाताकडून पदार्पण करणारा हा खेळाडू पुढे दिल्लीकडे गेला, पण त्याच्या कामगिरीत मात्र सातत्यराहिले. २०२० साली त्याला कोलकाताने तब्बल १५ कोटी देऊन पुन्हा विकत घेतले. आजवर त्याने एकूण ३७,५०,००,००० एवढे रुपये कमावले आहेत.
८. जयदेव उनाडकट
२०११ साली त्याला कोलकाताने पहिल्यांदा विकत घेतले होते. पुढे त्याच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याला राजस्थान रॉयल्समध्ये स्थान मिळाले. यावेळी त्याला तब्बल ११ कोटी या विक्रमी किमतीत घेतले गेले होते. पुढे त्याची कामगिरी घसरली तरी एकूण त्याने ३६,४१,५०,००० एवढी कमाई करत या यादीत स्थान मिळवले आहे.
९. अमित मिश्रा
दिल्लीचा हा स्वभावाने शांत पण आपल्या बॉलिंगने भल्याभल्यांना तारे दाखवणारा हा खेळाडू कमाईच्या बाबतीत देखील आघाडीवर आहे. आधी दिल्ली डेयरडेव्हील्स आणि नंतर दिल्ली कॅपिटल्स कडून खेळताना त्याने ३५,७५,००,००० एवढे पैसे कमावले आहेत.
१०. मोहम्मद शमी
सध्याच्या भारतीय संघातील महत्वाचा बॉलर असलेला मोहम्मद शमी आयपीएल मध्ये देखील चांगली कामगिरी करत आहे. पहिल्यांदा त्याला फक्त १० लाखात कोलकाताने खरेदी केले होते. पण त्याने आपला करिष्मा दाखवत सगळ्यांनाप्रा आपली दखल घ्यायला भाग पाडले. याच कारणामुळे त्याची एकूण कमाई ही ३४,७०,००,००० एवढी झाली आहे.