computer

एका दिवसात पायी फिरता येण्याजोगा देश, पर्यटन प्रेमींना तर माहीत हवाच!!

लहान पण महान देशांच्या मालिकेत आपलं स्वागत ! आपल्यापैकी बऱ्याच लोकांना भ्रमंती म्हटले की एका पायावर तयार, त्यातून आजकालच्या ह्या इंटरनेट च्या दुनियेत आपण सर्वात आधी, ज्या ठिकाणी भेट देणार तेथील सर्व माहिती काढून घेतो, एक आराखडा तयार करतो आणि मग सुरुवात होते भ्रमणाला.हे तितकेच सत्य असले तरी आपण ठरवलेला त्या देशातील सर्वच परीसर आपण भेट देतो असं होत नाही, खरं तर आपल्याला एकही जागा सोडायची नसते, म्हणतात ना "  No stone unturned" म्हणजे काहीच कसर नाही ठेवायची, पण काही ना काही राहतंच राव, काही ना काही सुटूनच जात. पैशांच्या अभावी असो किंवा मग वेळेच्या अभावी आणि मग परतताना येते ती निराशा !!
आज बोभाटा तुम्हाला अश्या देशाची सफर करायला नेत आहे जो संपूर्ण देश तुम्हाला फिरायला एक तास सुद्धा पुरेसा आहे. जगात खरंचं एक असा देश आहे जो तुम्ही केवळ एका तासात पूर्ण फिरू शकता!! चला तर मग तुम्हाला आज ह्याच देशाची जरा ओळख करून देऊ! तो देश म्हणजे मोनॅको!!!

शून्य आयकर, डायरेक्ट पेन्शन, फॉर्म्युला कार रेसिंग, जग प्रसिध्द कॅसिनो, आकर्षक पर्यटन स्थळ,  त्यांची भाषा एकंदरीत मोनॅको बद्दल तुम्हाला माहीत असणं अपेक्षित असलेल सर्व काही…. जाणून घेऊया!   
हा युरोपातील एका शहराचा देश आहे,व्हॅटिकन सिटी नंतरचा हा जगातला दुसरा सर्वात छोटा देश आहे.मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे. मोनॅको पासून इटली देशाची सीमा केवळ १६ किलोमीटर अंतरावर आहे. मोनॅको मध्ये राजेशाही सरकार आहे. अल्बर्ट (दुसरा) हा मोनॅको चा राजकुमार व सत्ता प्रमुख आहे. १९२७ पासून येथे ही राजेशाही सुरू आहे. 
 

मोनॅको ची लोकसंख्या अंदाजे ३९५०० आहे त्यामुळे हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला देश आहे. विशेष म्हणजे या छोट्याशा देशात प्रचंड संख्येने पर्यटक येतात व जगातील श्रीमंत देशात त्याची गणना देखील होते. या देशाचे क्षेत्रफळ अवघे २.२ चौरस किलोमीटर आहे.या देशात फ्रेंच भाषा बोलली जाते.

या देशातल्या नागरिकांना आयकर भरावा लागत नाही तरीही नागरिकांना अव्वल दर्जाची सुरक्षा आणि सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे युरोपियन देशांमध्ये अनेक धनाढ्य मोनॅकोचे नागरिक बनले आहेत. बाहेर पैसा कमवायचा आणि इथे आणून गुंतवायचा म्हणजे कर नको! त्यामुळे विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींची मोनॅको मध्ये जंगम मालमत्ता आहे.

 एवढेच काय तर सरकार नागरिकांना डायरेक्ट पेन्शन देते यावरून सरकार जरा जास्तच दानशूर आहे असं म्हटल्यास वावगं वाटायला नको. तसेच तिथे हवी तेवढी प्रसूती रजा मिळते. तर सरकारी व्यवस्थेतून प्रत्येकाला आरोग्य सुविधाही मिळते.

 

इथली लोकसंख्या कमी आणि मध्यम वर्गीय उत्पन्नाचा स्तर आणि पुरेसे पोलिस बळ यामुळे तीव्र अशा सामाजिक समस्या होत नाहीत. हिंसा गुन्हे,गरीबी असंही काही इथे दिसत नाही, शिक्षण दहावीपर्यंत अनिवार्य आहे त्यामुळे या देशाची साक्षरता 99 टक्के आहे. सरासरी उत्पन्नाचे आकडे सरकार देत नसले तरी सरासरी खर्चाची रक्कम वर्षाला तीस हजार डॉलर्स म्हणजे दरमहा लाख सव्वा लाख रुपये आहे. देशात सर्वदूर सीसीटीव्हीचे जाळे पसरलेले आहेत, त्यामुळे  क्राईम रेट ही कमीच आहे.

रोमन कॅथलिक हा इथला राष्ट्रधर्म आहे. इथे ९५ टक्के लोकसंख्या या धर्माची आहे पण इतरांनाही त्यांच्या त्यांच्या धर्म पाळण्याचे पूजा पाठाचे स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहेत. परंपरा रीतीरिवाज सण उत्सव तसेच शिस्तप्रिय आहेत.
हे तर तुम्हाला माहीत आहेच की, सरसरी दीर्घकाळ आयुष्य हे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना जास्त आहे, पण हे माहीत नसेल की दिर्घकाळ आयुष्याच्या बाबतीत  जगातील प्रथम क्रमांकावर गणला जाणारा देश हा मोनॅको आहे. येथील लोकांचे आयुर्मान (Life Expectancy) ८९.५ वर्ष आहे. त्यातही स्त्रियांचे आयुर्मान ९३.५ वर्ष आहे, जे पृथ्वीवरील कोणत्याही देशातील सर्वात जास्त आयुर्मान असलेले देश आहे.

पर्यटकांसाठी स्वर्ग
येथे होत असलेले फॉर्मुला कार रेसिंग (Formula One Monaco Grand Prix), जगप्रसिद्ध कॅसिनो आणि इथल्या शाही परिवाराची शान शौकत ही इथे पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची मुख्य आकर्षणे आहेत. 
१.  ऐतिहासिक वास्तूशास्त्राचे नमुने
२. 7000 प्रकारचे कॅक्टस (cactus) असलेले उद्यान
३. जपानी गार्डन (Jardin Japonais)
४. तेराव्या शतकातील शाही प्रिन्स पॅलेस (Palais du Prince)
५.  चार हजार प्रकारचे गुलाब असलेले बगीचे (Princess Grace Rose Garden)
६. सरोवरातील हाऊस 
७.  मोनॅकोचा सर्वात श्रीमंत भाग - मॉन्टे-कार्लो 
प्लेस डू कॅसिनोच्या टेरेसवरून चित्तथरारक समुद्र दृश्ये येथून पहायला मिळतात, फोटोग्राफी कारणाऱ्यांसाठी तर 'मस्ट विजिट' असे स्थळ मॉन्टे-कार्लो स्टायलिश गॉरमे रेस्टॉरंट्स आणि मिशेलिन-तारांकित आस्थापनांनी भरलेले आहे.
८.  कॅथेड्रल द मोनॅको

 या देशातील कार्टर गोल्डन स्क्वेअर मध्ये फॅशनेबल हॉटेल्स, नाईट क्लब, रेस्टॉरंट, बुटेक्सची एकच गर्दी असते.कार रेसिंगसोबत येथे गोल्फ, फुटबॉल, वॉटर स्पोर्ट्स यांच्याही स्पर्धा सतत होत असतात.

मोनॅको बद्दल काही मनोरंजक माहिती
१. मोनॅकोचा राष्ट्रीय ध्वज जवळजवळ इंडोनेशियासारखाच आहे.
२. मोनॅको स्वतःच्या नागरिकांना देशातील कॅसिनोमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देत नाही.
३. हॉलीवूड तर मोनॅकोच्या प्रेमात आहे,जेम्स बॉन्ड सिनेमाचे चित्रीकरण इथेच झाले होते.
४. मोनॅको हे जगातील दुसरे सर्वात लहान राष्ट्र आहे.
 काय मग ? बसला ना आश्चर्याचा धक्का!!
बघा चार पैसे गाठीला लावा आणि  एकदा तरी या देशाला अवश्य भेट द्या! 
 

सबस्क्राईब करा

* indicates required