उद्या संध्याकाळी शेअरबाजारात मुहूर्ताचा सौदा करायला येताय ना ?
जेव्हा दिवाळीच्या दिवसात इतर बाजार दिवसरात्र चालू असतात त्या दिवाळीच्या दिवसात शेअर बाजार बंद असतो.याला अपवाद असतो तो फक्त दिवाळीच्या मुहूर्ताचा. दिवाळी मुहूर्तावर एका तासासाठी मार्केट सुरू असते. यंदाचा तो एक तासाचा मुहूर्त हा ४ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ असा असेल.
आता दिवाळीच्याच दिवशी मुहूर्ताचे ट्रेडींग का, तर तो नव्या वर्षाचा दिवस असतो म्हणून ! आता हे नवं वर्ष कसं काय हा प्रश्न तुम्ही विचारायलाच हवा कारण आपले नवे वर्ष तर गुढीपाडव्याला सुरु होते.चला आता या प्रश्नाचाही उलगडा करून घ्या. आपण महाराष्ट्रात वापरतो ते पंचांग शालीवाहनाच्या शकाप्रमाणे चालते आणि शेअरबाजारात जे पंचांग वापरले जाते ते विक्रम संवताप्रमाणे ! तर मंडळी दिवाळीचा दिवस म्हणजे विक्रम संवताचा पहिला दिवस असतो. म्हणून शेअर बाजारात त्या दिवशी मुहूर्ताचे सौदे लिहिले जातात. नव्या वर्षाची सुरुवात होते.त्या दिवशी शेअर बाजारात सौद्यापेक्षा उत्सवाचेच वातावरण असते.हा एकच दिवस असा असतो ज्या दिवशी दलाल आपापल्या कुटुंबासह हजर असतात.
एकेकाळी शेअरबाजारात नोकरी करणार्यांना पगार फारच कमी असायचे पण तरीही लोकं नोकर्या करायचे याचे कारण आज तुम्ही वाचायलाच हवे.दिवाळीच्या मुहूर्ताच्या दिवशी बोनस दिला जायचा.दलालाच्या फर्मने वर्षभरात जो नफा कमावला असेल त्या प्रमाणात बोनस दिला जायचा. हा बोनस पाच पगार -सहा पगार म्हणजे मासिक पगाराच्या पाच सहापट असायचा. तेजीच्या वर्षात तर १०/१२ पगार बोनस दिल्याच्या नोंदी पण आहेत. अर्थात हा पायंडा आता नाही कारण दलालीचे दर फारच कमी झाले आहेत.
या दिवसाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे बाँबे स्टॉक एक्स्चेंजमध्ये वाटली जाणारी भरघोस मिठाई ! या मिठाईत 'इस्टर्न'चा पेढा असायचाच ! बाजारात हा पेढा 'इस्टर्न्ना पेंडा' म्हणून ओळखला जायचा. हे सणसणीत ५० ग्रॅमचे चार पेढे खाल्ले की पोट भरून जायचं ! (या मलाई केसर इस्टर्न पेढ्याच्या फॅन लिस्टमध्ये लता मंगेशकर -धिरुभाई अंबानी यांची पण नावं आहेत.)
तर मंडळी ५ नोव्हेंबरला विक्रम संवताचा पहिला दिवस आहे म्हणून आदल्या दिवशी संध्याकाळी'मुहूरत नु ट्रेडींग' असते. या एका तासात इक्विटीज, इक्विटी आणि एफओ, करन्सी एफओ आणि कमोडिटी सुरू असेल. या एका तासाचा व्यवहार सुरू होण्यापूर्वी संध्याकाळी ५.४५ ते ६ पर्यंत ब्लॉक डिल सेशनसाठी विंडो सुरू असेल आणि ६.०० पर्यंत प्री-ओपन सेशन असेल.
ही परंपरा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांकडून १९५७ साली सुरु करण्यात आली होती.या साली दिवाळीच्या दिवशी तासाभरासाठी मार्केट सुरू होते.गेल्या वर्षी हा मुहूर्त १४ नोव्हेंबरला आला होता.१९९२ साली नॅशनल स्टॉक एक्सचेंजने पण याला मान्यता दिली होती.
आपल्या संस्कृतीत मुहूर्ताचे मोठे महत्व आहे. मुहूर्ताला केलेली कामे यशस्वी होतात अशी लोकांची भावना असते. दिवाळीच्या दिवशी एका तासासाठी केलेले जाणारे ट्रेडिंग हे एका प्रकारे लक्ष्मीमातेची पूजा म्हणून केले जाते. तसेच नव्या वर्षीची सुरुवात म्हणून पण हे एका तासाचे मार्केट सुरू असते.
याआधीच्या अनुभवांवरून आजवर या दिवशी केली जाणारी ट्रेडिंग ही सकारात्मक ठरत असते. २०२० साली बीएसई सेन्सेक्स ४३,६३८ ला बंद झाला होता. यात १९५ गुणांची वाढ होती. तर एनएसइ हे १२,७७१ ला बंद झाले होते. यातही ५१ पॉईंट्स अधिक होते. दिवाळीच्या दिवशी सर्वात चांगली प्रगती २००८ साली दिसली होती. सेन्सेक्स ५.८६% नी वाढलेले लोकानी पाहिले होते. यावर्षी सुद्धा सकारात्मक पद्धतीने मार्केट चालावे अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया.