computer

या १० प्रकारच्या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात

साडी म्हणजे भारतीय स्त्रियांच्या मनाचा हळवा कोपरा. कपाटात कितीही साड्या असल्या तरी प्रत्येक नवी साडी खुणावतेच. आता भारतभर इतक्या वेगवेगळ्या पोताच्या प्रांतांतल्या, शैलीतल्या आणि चित्रकारितेने सजलेल्या साड्या असतात की यात त्या बिचार्‍या स्त्रियांचा दोष तो काय? आणि नावीन्याची हौस कुणाला नसते? गेल्या एक-दोन वर्षांत ’१०० पॅक्ट साडी’ म्हणून वर्षात किमान शंभरवेळा साडी नेसण्याचीही टूम निघाली आणि ज्यांनी यात भाग घेतला त्यांनी मनापासून ती एंजॉयही केली. 

वरच्या चित्रात दिसतेय ती आहे जगातली सर्वात महाग साडी. ’चेन्नई सिल्क ’ या दुकानाद्वारे बनवण्यात आलेल्या या हातमागावरच्या साडीच्या पदरावर राजा रविवर्म्याचं चित्र आहे. नुसतं चित्रच आहे असं नाही तर ते हिर्‍यामाणकांनी जडवलेलं आहे. या साडीची किंमतच चाळीस हजार आहे. आता इतकी महागाची नाही तरी संग्रहात नसलेली एखादी साडी घ्यायला काय हरकत आहे?

साड्यांचे सगळे प्रकार एकाच लेखात आणणं कठीण आहे.  म्हणून सादर आहेत देशातल्या विविध प्रांतातल्या काही रेशमी साड्या. आम्ही या प्रकारातले जाणकार आहोत असं आमचं मुळीच म्हणणं नाही. इथे नसलेला प्रकार आवर्जून सांगा आणि त्या साडीचा जमल्यास फोटोही इथे शेअर करा. 

कांजीवरम साडी

तामिळनाडूमधल्या कांचिपुरम गाव म्हणजे आपल्याकडचं पैठण किंवा येवला. घराघरांतून तिथे सिल्क साड्या विणल्या जातात. गर्भरेशमी काठ व मऊ मुलायम पोत हे या साड्यांचं वैशिष्ट्य. कांजीवरम साड्यांमध्ये व्हरायटी खूप असते. अरूंद काठाची , टेंपल बॉर्डर किंवा रेखा नेसते तशी मोठ्ठ्या काठाची टेंपल बॉर्डर, एक ना दोन. 

पोचमपल्ली

पोचमपल्ली म्हणजेच पोचमपल्ली इकत या साड्या सध्याच्या तेलंगणा राज्यातल्या भूदान पोचमपल्ली या गावात बनवल्या जातात. इकत म्हणजे थोडक्यात भौमितिक आकार-झिगझॅग रेषा, त्रिकोण, चौकोन , सरळ रेषा साडीवरती अशा प्रकारे गुंफलेले असतात की शेवट अगदी गोड होतो. पोचमपल्ली साड्या रेशीम आणि सुती अशा दोन्ही प्रकारात मिळतात. 

पैठणी

पैठणी हा महाराष्ट्राचा मानबिंदू. पूर्वी पदरावर पोपट आणि मोर इतकेच डिझाइन्स असत. आता पदरावरच नाहीतर काठावरही पानाफुलांची नक्षी , वाद्ये असं काहीकाही दिसून येतं. आंतरजालावर थोडं गुगगलंत तर पुन्हा एकदा पैठणी घ्यायचा मोह व्हायचा राहणार नाही.

पदराच्या लांबीवर पैठणीची किंमत ठरते. तसंच पारंपारिक पैठण्या या नवीन पानाफुलांच्या पैठणीपेक्षा तुलनेने स्वस्त असतात. फक्त नुसतीच हौस करायची असेल तर सेमीपैठणीचा पर्यायही आहेच. फक्त कृत्रिम रेशमातली पैठणी कुणी दुकानदार गळ्यात मारत नाही ना याकडे लक्ष द्यायला हवं

इल्कल/इरकल साडी

इल्कल जिला काही ठिकाणी इरकली साडीही म्हटलं जातं ती आहे मूळची ’इल्केकल्लू’ नावाच्य विजापूरजवळच्या गावातली. एकदम तलम-मऊ मुलायम, धूपछॉंव गहिर्‍या रंगाची, थोडीशी चमक असलेली ही गर्भरेशमी साडी कर्नाटकातली असली तरी महाराष्ट्रात तितकीच लोकप्रिय आहे. पूर्वी घराघरांतल्या आज्यांकडे अशा साड्या पुष्कळ असत. इल्कल सहावारी आणि नऊवारी अशा दोन्ही प्रकारात मिळते. पूर्ण हातमागावर विणलेल्या साडीची किंमत अधिक असते पण यंत्रमागावर विणलेल्या साड्याही बाजारात मिळतात. या साडीवरच जर कर्नाटकी कशिदा असेल तर क्या कहने!!

बनारसी साडी

बनारसी साडीला महाराष्ट्रात वेगळंच महत्व आहे.  आपल्याकडे लग्नामध्ये वापरला जाणारा शालू म्हणजे बनारसी सिल्कचा एक प्रकार. त्यात इतरही बरेच प्रकार येतात. मृदू मुलायम पोत आणि वेलबुट्टी ही याची खासियत.

टसर सिल्क

फक्त हीच साडी म्हणजे टसर सिल्क असं म्हणता येणं अवघड आहे. त्यातही खूपच प्रकार आहेत. भौमितिक काठ आणि पदराची पण अंग पूर्ण प्लेन असणारी ’घीचा सिल्क’ तर ऑल टाईम हिट!! प्रिंटेड टसर, कांथा वर्क केलेली टसर, नुसतीच पानाफुलांच्या वेलबुट्टीची टसर असे खूपच प्रकार सांगता येतील. 

मुग्गा सिल्क

मुग्गा नावाच्या रेशमी किड्याच्या कोशापासून बनवलेल्या या मुग्गा सिल्क साड्या ही आसामची खासियत आहे. नेहमीच्या पाचवारी गोल साडीसोबतच मुग्गा सिल्कमधले मेखेला चादोर फार प्रसिद्ध आहेत. मोतिया रंगाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या रंगाचं भरतकाम केलेल्या साड्या आसामच्या पारंपारिक नृत्यप्रसंगी नेसल्या जातात.

मेखला चादोर हा थोडाफार केरळच्या मुंडु साडीसारखा असणारा  प्रकार. ओढणीसारखा असणारा नेसूचा भाग कमरेशी खोचताना थोडं टोक वरती काढून खोचला जातो आणि जादाचा तो भाग पुन्हा खाली सोडून लाटेचा आभास निर्माण केला जातो

माहेश्वरी साडी

माहेश्वरी साडी हा कॉटन आणि रेशमी धागे एकत्र विणलेला एकदम तलम प्रकार. मध्यप्रदेशातल्या माहेश्वर गावच्या या साड्या वजनाला एकदम हलक्या आणि वापरायला एकदम सुटसुटीत. 

बालुचेरी साडी

पदरावरती पौराणिक कथांचं चित्रण असलेली ही साडी बंगाल आणि बांग्लादेशातही प्रामुख्याने नेसली जाते. ही साडी खरेदी करताना डिझाईन आणि साडीचा रंग हे थोडं तपासून पाहायला हवं. काही रंगसंगतीत दोन्हींचा रंग एकमेकांत मिसळला जातो आणि साडीची मजा तितकीशी येत नाही.

काश्मिरी साडी

हा काही सिल्क कापडावरच असावा असा काही संकेत नाही. बरेचदा ही कशिदाकारी प्युअर जॉर्जेटसारख्या मटेरिअलवर केलेली असते. भरतकाम केलेल्या साड्यांचेही पुष्कळ प्रकार आहेत. त्यातला हा प्रकार म्हणजे अगदी मस्ट!

सबस्क्राईब करा

* indicates required