ब्रिटिश जनतेला १५० वर्ष वेड लावणाऱ्या अर्ल ग्रे चहाच्या जन्माची कथा !!
आज आम्ही एका खास चहा प्रकाराबद्दल बोलणार आहोत. ब्रिटिश हे त्यांच्या शिष्टाचारासाठी आणि चहा प्रेमासाठी ओळखले जातात. त्यासाठी त्यांची जगभर आणि खास करून अमेरिकन्स तर्फे खिल्लीही उडवली जाते. पण ब्रिटिश लोकांसाठी चहाचं महत्त्व फक्त एक पेय म्हणून नाही, तर त्यांच्यासाठी ती एक जीवनपद्धती आहे. आज आम्ही ज्या चहाबद्दल बोलणार आहोत त्याने फक्त ब्रिटिश नाही तर युरोपियन लोकांचं आयुष्य व्यापलं आहे. हा चहा प्रकार म्हणजे अर्ल ग्रे टी.
या चहा प्रकाराबद्दल तुम्ही कधी ना कधी तरी नक्कीच वाचलं किंवा ऐकलं असणार. मागच्या जवळजवळ १५० वर्षांपासून हा चहा पाश्चात्य जगावर राज्य करतोय. आज आपण अर्ल ग्रे टीला त्याचं नाव कुठून मिळालं आणि त्याच्या खास चवीचा जन्म कधी, कसा झाला या गोष्टी जाणून घेणार आहोत.
अर्ल ग्रेला त्याचं नाव ब्रिटनचा पंतप्रधान चार्ल्स,अर्ल ग्रे दुसरा याच्या नावावरून मिळालं. चार्ल्स १८३० ते १८३४ सालापर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान होते. आता चार्ल्स यांच्या नावानेच का? तर त्याला काही एक उत्तर देता येत नाही. त्याबद्दल काही दंतकथा प्रसिद्ध आहेत.
असं म्हणतात की एका चीनी सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाला चार्ल्सच्या सैनिकांनी बुडतांना वाचवलं होतं. काही कथा तर असंही सांगतात की स्वतः चार्ल्सनेच मुलाला वाचवलं होतं. दोन्ही कथा एकाच गोष्टीवर येऊन ठेपतात. त्या चीनी अधिकाऱ्याने खुश होऊन चार्ल्सला चहाचं एक नवीन मिश्रण भेट म्हणून दिलं. हेच मिश्रण पुढे अर्ल ग्रे नावाने प्रसिद्ध झालं.
ही कथा प्रसिद्ध असली तरी तिच्या खरेपणाबद्दल वाद आहेत. असं म्हणतात की चार्ल्स कधीही चीनला गेला नव्हता. एका कथेनुसार एका चीनी अधिकाऱ्याने विशेषतः अर्ल ग्रेसाठी चहाचं एक खास मिश्रण तयार केलं होतं. असं करण्यामागे नेमकं कारण सापडत नाही. असं सांगितलं जातं की हे मिश्रण तयार करताना चार्ल्स यांचं घर असलेल्या इंग्लंडच्या नॉर्थम्बरलॅड येथील पाण्याला अनुरूप असं मिश्रण तयार व्हावं याची काळजी घेण्यात आली होती.
अर्ल ग्रेच्या या कथा वाचल्या तरी त्यातून अर्ल ग्रेच्या जन्माचा नेमका पत्ता लागत नाही. याचं मुख्य कारण हा चहा तयार करण्यासाठी जे साहित्य वापरतात त्यात शोधता येईल.
अर्ल ग्रेची निर्मिती चीनी लोकांनी केली असं म्हणतात, पण अर्ल ग्रेला त्याची खास चव देणाऱ्या लिंबासारख्याच आंबट बर्गमॉट फळाची लागवड त्याकाळी चीनमध्ये होत नव्हती. असं म्हणतात की चहामध्ये बर्गमॉट मिसळण्याची कल्पना ब्रिटनमधली होती. अर्ल ग्रे तयार करण्यासाठी जी मूळ चीनी कृती होती त्यातील अत्यंत आंबट फळांच्या चव कमी करण्यासाठी आणि त्यांना पर्याय म्हणून बर्गमॉट वापरणात आलं होतं.
तर, या ना त्या प्रकारे चार्ल्सच्या कुटुंबात हा चहा आला. तो घरी येणाऱ्या पाहुण्यांना देऊन प्रसिद्ध पावला. एवढा की लोकांनी रेसिपी विकत मागितली. याचवेळी त्याचा फायदा उचलला इंग्लंडच्या ट्विनिंग या चहा कंपनीने. ट्विनिंग कुटुंबातील स्टीफन ट्विनिंग म्हणतात की अर्ल ग्रेमध्ये बर्गमॉट मिसळण्याची कल्पना त्यांच्या पूर्वजांची. चहाची चव वाढवण्यासाठी त्यांनी चार्ल्स यांच्या विनंतीवरून बर्गमॉट फळाची निवड केली होती. मुळातच काहीशा खारट असणाऱ्या इंग्लंडच्या पाण्यात अत्यंत आंबट चीनी फळे मिसळून चहा केलेला चार्ल्स यांना रुचला नव्हता.
अर्ल ग्रेची कथा इथेच संपत नाही. ट्विनिंग कंपनी जसं अर्ल ग्रेवर दावा सांगते तसं लंडनच्या जॅक्सन ऑफ पिकॅडिली कंपनीनेही अर्ल ग्रेवर हक्क सांगितला होता. १९२८ साली छापलेल्या अर्ल ग्रेच्या जाहिरातीत पिक्काडिलीने दावा केला होता की १८३६ साली खुद्द चार्ल्स यांच्या विनंतीवरून आम्ही हा खास चहा तयार केला.
कथा अनेक सांगितल्या जातात, पण त्यातून अर्ल ग्रेचं मूळ समजत नाही. काही का असेना, पण या चहाने १५० वर्ष युरोपियन आणि मुखत्वे ब्रिटिश जनतेवर राज्य केलं हे नाकारता येणार नाही.