५४ टक्के अपंगत्व असलेली प्रियांका बनणार न्यायाधीश! जाणून घ्या त्यांची प्रेरणादायी संघर्षगाथा!!
जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान मिळवलेल्या सना मरीन यांची चर्चा जगभर होत आहे. महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढतोय ही एक चांगली गोष्ट आहे. आज आम्ही अशीच एक भारतातली बातमी घेऊन आलो आहोत.
५४ टक्के अपंगत्व असलेल्या प्रियांका ठाकूर या हिमाचल कोर्टात न्यायाधीश बनणार आहेत. नुकतंच हिमाचल प्रदेशच्या न्यायदान प्राधिकरणामध्ये त्यांची निवड झाली होती.
प्रियांका ठाकूर यांचा जन्म इंदोरच्या वडाला नावाच्या छोट्या गावात झाला. त्यांचे वडील बीएसएफचे निवृत्त जवान आहेत. त्यांचं शारीरिक अपंगत्व त्यांच्या शिक्षणातील अडथळा कधीच ठरला नाही. हिमाचल प्रदेश विद्यापीठातून त्यांनी एलएलबी पूर्ण केलं. सिमला येथून त्यांनी एलएलएम पूर्ण केलं. सोबत त्यांनी युजीसी आणि नेट (UGC NET ) परीक्षा दिली. सध्या त्या पीएचडी पूर्ण करत आहेत.
न्यायिक सेवा परीक्षेतून त्यांची निवड हिमाचल प्रदेशच्या न्यायदान प्राधिकरणासाठी झाली होती.न्यायिक सेवा परीक्षेच्या तयारीबद्दल त्या म्हणतात की, ‘मी खाजगी कोचिंग क्लासेसची मदत घेतली नाही.’ त्यांनी स्वतःहून अभ्यास करून हे यश मिळवलंय.
आपल्या यशाबद्दल बोलताना प्रियांका ठाकूर म्हणाल्या की “लोक महिलांना आणि खास करून अपंग महिलांना दुर्लक्षित करतात, पण तुमच्याकडे स्वनिर्णय आणि आत्मविश्वास असल्यास तुम्ही कोणतंही शिखर गाठू शकता.”
तिचे हे शब्द इतरांना नक्कीच प्रेरणा देतील. प्रियांका ठाकूर यांच्या पुढच्या वाटचालीसाठी बोभाटाच्या शुभेच्छा!!