computer

कपूरथळ्याचा कामदेव : महाराजा जगतजीतसिंग...वाचा त्यांच्या अय्याशीच्या कथा !!

१८५७ ते १९४७ या कालखंडात भारताचा ६० टक्के भाग ब्रिटिश इंडिया म्हणून ओळखला जायचा. उरलेला ४० टक्का भूभाग अनेक संस्थानांमध्ये विभागाला गेला होता. हे सर्व राजे महाराजे ब्रिटिशांचे मांडलिक होते. नावाला सत्ता महाराजांची पण प्रत्यक्ष अंमल इंग्रज सरकारचा असल्याने   डोक्यावर शून्य जबाबदारी ,राज्याच्या अपरंपार खजिन्यावर हक्क आणि खाजगी आयुष्यात हवे तसे वागायची मुभा !!! पुरेपूर नैतिक स्खलन  व्हावे अशी परिस्थिती असल्यावर या महाराजांचे  आयुष्य रंगेल ते विकृत अशा कथांनी बरबटलेले होते . अशा बऱ्याच रंगीत कथा आपण वाचणार आहोत पण सुरुवात करूया कपूरथळ्याच्या महाराज जगतजीतसिंग यांच्यापासून !

मूळचा समृद्ध पंजाब प्रांत  लाहोर, पतियाळा,जिंद आणि कपूरथळा चार संस्थानात विभागला होता.सातशे वर्षांचा इतिहास असलेल्या कपूरथळा संस्थानाचा राजा म्हणून जगतजीतसिंग लहान असतानाच गादीवर बसले. कपूरथळा तसे छोटे संस्थान होते पण १८५७ साली इंग्रजांच्या बाजूने उभे राहिले म्हणून संस्थानाला अवध प्रांताचा सारा मिळायचा. अर्थातच खजिना भरभरून वाहत होता. जगतसिंगाला मोठेपणा मिरवण्याची फार हौस होती त्यामुळे ब्रिटिशांना युद्धात पैशाची मदत मिळायची. सुरुवातीला अकरा तोफांची सलामी असलेल्या महाराजांना नंतर १३ तोफांची सलामी मिळायला लागली. सोबत लीग ऑफ नेशन्स च्या बैठक, गोलमेज परिषद या सर्वात भाग घ्यायला देऊन इंग्रजानी त्याचे लाड केले होते. परदेशी दौरे करणे, तिथले सगळे विलासी शौक करणे यामध्ये महाराज नेहेमीच व्यग्र असायचे.  

कपुरथळ्याच्या या महाराजा जगतसिंग यांना युरोपात फ्रँकोफाइल म्हणून ओळखले जायचे. फ्रँकोफाइल  म्हणजे फ्रेंच संस्कृतीची आसक्ती पण जगतजीतसिंग म्हणजे फ्रेंचच नव्हे तरुण गोऱ्या फिरंगी तरुणींची आसक्ती असलेला महाराजा !! या महाराजांच्या मते भारतीय बायकांमध्ये ‘ती मजा’ नव्हती, पण फ्रान्समधल्या बायांमध्ये 'ती मजा' त्यांना वाटत होती. 

"जर फ्रेंच रखेलीसोबत येऊ दिले तरच मी भारतात येईन, नाहीतर मी युरोपमध्येच राहीन" असे म्हणणारा हा महाराजा जगतसिंग होता. १९२४ साली मॅडम सेरेट या फ्रेंच मुलीबरोबर या महाराजांचे  भारतात आगमन झाले. थोड्याच दिवसांत कपूरथळ्याला एका आलिशान महाल तिला दिला गेला.  पण इथे येणारी ही अशी एकमेव  बाई नव्हती. काही दिवसांनी सेरेट गेली आणि हेन्रीएट सेरुरीयर ही दुसरी मड्डम भारतात आली.  तिच्या स्वागतासाठी कपुरथळ्याहून मिस्टर अँड मिसेस बॅरन यांना मुंबईत पाठवण्यात आले. ब्रिटिश इमिग्रेशन खात्याने सुरुवातीला तिला भारतात येण्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला.  पण बॅरनसमोर त्यांचा नाईलाज झाला. बॅरनने सेरुरीयरला मुंबईच्या ताजमहाल हॉटेलमध्ये ठेवले. ही बाई भारतात येऊन ६ आठवडे होत आहेत नाहीत तोवर मॅडम लेमा पाशा नावाची एक  फ्रेंच बाई भारतात आली आणि तिची रवानगी पण ताजमहाल हॉटेलमध्ये करण्यात आली. यावेळी बॅरनच्या ऐवजी जरमणी दास हा माणूस नव्या बाईच्या दिमतीला दिला गेला होता.   थोडक्यात, फ्रेंच स्त्रिया सतत कपुरथळ्याला येत-जात राहिल्या. 

आता हे असले सगळे चाळे सॉलीड महाग होते. म्हणजे एक उदाहरण पाहा,  जर्मन पेलीग्रेनो ही फ्रेंच तरुणी महाराजांची ‘सेवा’ करण्यास तयार झाली तेव्हा महाराजांनी तिला आणण्यासाठी पि अँड ओ कंपनीचे संपूर्ण जहाजच बुक करून टाकले. मुंबईला पोहोचल्यानंतर पतियाळापर्यंत त्या एकट्या बाईंसाठी एक खास रेल्वेगाडी सोडण्यात आली आणि कपुरथळ्याच्या खास महालात तिला ठेवण्यात आलं. 

या सगळ्या बायका नशीब कमवायलाच भारतात आल्यामुळे जाताना खजिन्यावर डल्ला मारून जायच्या.  पण या राजा-महाराजांना त्याची काही पडली नव्हती. याचेही एक गंमतीदार उदाहरण आहे. कपुरथळ्याच्या या महाराज जगतसिंग यांना आपला स्टॅमिना दाखवण्याची खूप  हौस होती. इतकी  की त्यासाठी बाईकडे जाण्यापूर्वी ते गुरु ग्रंथसाहेबाची विशेष प्रार्थना करायचे. अशाच एका संध्याकाळी मॅडम सेरेटबरोबर यथासांग 'इच्छापूर्ती' झाल्यावर महाराजांनी तिला त्याकाळच्या दहा लाखांचा हिऱ्यांचा एक अमूल्य हार नजर केला होता. हे कमी की काय म्हणून त्यानंतर ते बाहेर पडण्याची वाट बघणाऱ्या नोकर-हुजऱ्यांवर चांदीच्या नाण्यांचा वर्षाव केला. 

कपूरथळ्याच्या महाराजांची अशी  ख्याती होती खरी पण सुरुवातीला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठी समस्या अशी होती की त्यांचा विवाह consumate होऊ शकत नव्हता. Marriage Consumation म्हणजे पती पत्नीचा शरीर संबंध घडून येत नव्हता.त्यामुळे गादीला वारस मिळत नव्हता. डॉक्टरांच्या मते महाराजांचे सुटलेले पोट शरीर संबंधाच्या आड येत होते. बरेच प्रयत्न करूनही ते जमेना तेव्हा एका इंजिनीअरला पाचारण करण्यात आले. त्याने आपले कौशल्य वापरून असा पलंग बनवला की ज्यामुळे महाराजांना पत्नीसोबत संभोग करणे सहज शक्य झाले आणि काही दिवसातच राणीसाहेबांना दिवस गेले. पुत्रजन्म झाला.गादीला वारस मिळाला.  सोबत त्या इंजिनीअरला विशेष बक्षीस म्हणून कायम स्वरूपी पेन्शन देण्यात आले.

थोडक्यात जगतजीत सिंग त्यांच्या नावाला जागले ते अगदी वेगळ्या पद्धतीने ! जगातल्या अनेक देशातील बायका त्यांनी ' ठेवल्या' होत्या. आजच्या भाषेत सांगायचे तर त्यांचे दहा बारा ' आयटम' होते आणि प्रत्येक आयटमचा  वेगवेगळा महाल बनवला होता. त्यापैकी एक मोरोक्को मुस्लीम होती म्हणून खास तिच्यासाठी एक मशीद पण बांधून घेतली होती. या खेरीज त्यांचा अधिकृत जनानखाना होताच.

जगतसिंग महाराजांची ही थेरं ब्रिटिश का सहन करत होते याची कारणं थोडी वेगळीच आहेत. १८५७ च्या अनुभवानंतर संस्थानिकांच्या खाजगी प्रकरणांचा थेट संबंध जोपर्यंत राजकारणाशी जोडला नाही तोपर्यंत दुर्लक्ष करायचे ही नीतीते पाळत होते. दुसरी गोष्ट अशी की या दरम्यान अकाली दलाचा उदय पंजाब प्रांतात झाला होता. जगतसिंग महाराजांचे चाळे त्यांना मान्य नव्हते . त्यामुळे राजकीय परिस्थितीला वेगळा रंग  मिळण्याची शक्यता होतीच. त्यामुळे महाराज जास्तीत जास्त देशाबाहेर असणे सोयीचे होते. ब्रिटिश सरकार एक वेगळ्याच रीतीने महाराजांच्या वागण्याला मुरड घालत होते ते कसे याचा संदर्भ पुढे येईलच पण तोपर्यंत आपण स्पॅनिश महाराणीचे प्रकरण वाचू या.

स्पेनच्या  दौऱ्यावर असताना त्यांची नजर  अनिता डेलगॅडो स्पॅनिश नर्तकीवर पडली. तिच्या सौंदर्याने घायाळ महाराजांनी ताबडतोब तिला पॅरिसला येण्याची ऑफर दिली. अनिता अशिक्षित होती, गरिबीमुळे नर्तकी म्हणून काम करत होती. महाराजांनी तिला 'सोबत' म्हणून पॅरिस ला येण्याची ऑफर दिली. अनिता अडाणी असली तरी स्वाभिमानी होती . तिने चार वेळा नकार दिल्यावर जगतजितसिगांनी तिच्या पालकांना तब्बल एक लाख पौंड देऊ केले. गरिबीमुळे हैराण झालेल्या पालकांनी अनिताला जगतजीतसिंग यांच्या हवाली केले. पॅरिसला आल्यावर दोन वर्षं तिला योग्य शिक्षण देऊन तिची राणी बनण्याची तयारी करून घेण्यात आली. १९०८ साली जगतजीतसिंगांनी शीख धर्माच्या चालीरीतीप्रमाणे अनिता सोबत विवाह केला . अनिता डॉलगॅडो 'प्रेम कौर' झाली. लग्नानंतर काहीच महिन्यात मुलगा पण झाला. महाराज तिला घेऊन कपूरथळ्याला आले.फ्रान्स मधल्या व्हर्साय च्या महालाची प्रतिकृती ' पिंक पॅलेस' मध्ये अनिताच्या वास्तव्याची सोय करण्यात आली.

जनानखान्यातील इतर राण्यांचा उपद्रव तिला होत नव्हता पण एक रखेली या पलीकडे दखलही कोणी घेतली नाही. ब्रिटिशांना हे लग्न मंजूर नव्हतेच त्यामुळे नव्या स्पॅनिश राणीला राजकीय मान्यता देण्याचंही त्यांनी नाकारलं. किंबहुना तिची नोंद घेण्यास इतका विरोध होता की एका ब्रिटिश अधिकाऱ्याने रेसकोर्सवर आपल्या पत्नीची ओळख स्पॅनिश राणीशी करून दिल्यावर त्याची सरकारी खलीत्यातून कानउघाडणी करण्यात आली. इतका विरोध पत्करूनही अनिता सोबत विवाह करण्याचं धाडस जगतजीतसिंगने का केलं या प्रश्नाचे उत्तर तिच्या सौंदर्यात होतं. तिची सावत्र मुलं पण तिच्या सौंदर्याने दिपून गेली होती.

याच दरम्यान हैदराबादचा निजाम पण तिच्यासाठी पागल झाला होता.

त्याचं झालं असं की निजामाने जगतजीतसिंग यांना जेवायचं निमंत्रण दिलं. जेवणाच्या टेबलवर निजामाने एक चिठ्ठी अनिताला दिली ज्यात लिहिलं होतं की ' नॅपकिन हळूच उचला'.

नॅपकिनखाली भेट म्हणून निजामाने पाचूची डोक्यावर लावायची चंद्रकोर, अंगठी आणि कानातले झुमके ठेवले होते. जगतसिंगच्या नोकरांनी अंगठीतले पाचू फोडून केकवर त्याची पखरण करून निजामाला त्याची जागा दाखवली. अनिताने उरलेले दोन दागिने मात्र जपून ठेवले. चंद्रकोर तिला इतकी आवडली होती की  अंगावर 'फक्त' चंद्रकोर घालून तिने स्वत:चे एक पेंटींग बनवून घेतले होते. कानातल्या झुमक्यातले पाचू मात्र ड्युप्लिकेट होते.

त्याकाळी ब्रिटिश अधिकारी सिमल्याला उन्हाळा घालवायचे तर राजेराजवाडे मसूरीत मुक्काम ठोकून असायचे. अनेक संस्थानिक एकत्र आल्यावर मनोरंजनासाठी संध्याकाळी पार्ट्या व्हायच्या,  बॉल डान्स, घोड्याच्या शर्यती आणि एकमेकांचे ऐश्वर्य मिरवण्याच्या स्पर्धा व्हायच्या. परदेशी मद्याचे पाट वहायचे. त्यानंतर लैंगिक स्वैराचाराला बहार यायची. असे म्हणतात की पहाटेच्या वेळी आपापल्या शयनगृहात पोहचण्यासाठी मसूरीच्या या हॉटेलमध्ये सकाळी एक भोंगा वाजवला जायचा. 

प्रत्येक उन्हाळ्यात जगतजीतसिंग महाराज एक वेगळीच स्पर्धा आयोजित करायचे. ही स्पर्धा ' पुरुषार्थ' दाखवायची म्हणजे आपला स्टॅमिना (!) दाखवायची स्पर्धा असायची. विजेत्याला जगतजीतसिंग ट्रॉफी द्यायचे. दहा पैकी नऊ वेळा ही ट्रॉफी पतियालाचे महाराज जिंकायचे. (यापेक्षा अधिक माहिती आमच्याकडे नाही)

असे रंगीत संगीत दिवस अनिताच्या वाट्याला आले आणि  गेले. जगतसिंगचे लक्ष एका नव्या बाईकडे गेलं आणि अनिता अडगळीत पडली. पण ती राणी म्हणजे स्पॅनिश महाराणी असल्याने जगतजितसिंग कुठेही बहकले तरी तिने पावित्र्य राखायचे अशी महाराजांची अट होती. याच काळात तो प्रसंग घडला ज्यामुळे पुढे अनिताला घटस्फोट घ्यावा लागला.

नवीन संबंध जुळल्यावरही जगतजीतसिंग लंडनला जाताना अनिताला सोबत घेऊन जायचे.  अशाच एका लंडनवारीत अनिता रात्री दीड वाजता हॉटेल सोडून बाहेर गेली.जाताना उशीतक्के झाकून झोपल्याचा केलेला देखावा एका सेवकाच्या लक्षात आला. त्यानंतर पहाटे साडेतीन वाजता अनिता संशयास्पद अवतारात परतली तेव्हा महाराज जगतजीतसिंग तिची वाटच बघत होते. त्यानंतर जो तमाशा झाला त्याला संपूर्ण हॉटेल साक्षीदार होते.

योगायोग असा की या गर्दीत बॅरिस्टर महंमद अली जिना पण होते. वैयक्तिक परिचय असल्याने त्यांनी मध्यस्थी करून बघितली पण शेवटी सत्य जगापुढे आलेच. अनिताचे प्रेमपात्र दुसरं तिसरं कोणी नसून महाराज जगतजीतसिंग यांचा थोरले चिरंजीव महिजितसिंग होते. महिजितसिंगला हा तमाशा कळला तेव्हा त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली.

(बॅरिस्टर महंमद अली जिना)

यानंतर काही वेगळे घडण्याची काहीच शक्यता नव्हती.बॅरिस्टर जिनांनी स्पॅनिश राणीची केस हातात घेतली आणि प्रचंड मोठी नुकसान भरपाई आणि पेन्शन देण्याच्या करारावर घटस्फोट झाला. प्रेम कौर- स्पॅनिश वाईफ ऑफ हिज हायनेस महाराजा ऑफ कपूरथला कायमची पॅरिसला रवाना झाली. उर्वरित आयुष्य अत्यंत सुखासीन अवस्थेत घालवताना १९४९ साली महाराजा जगतजीतसिंग यांचा मृत्यू झाला तेव्हा तिने या बातमीची दखल घेण्याचे पण नाकारले.

अनिता डॉलगॅडो नशीबवानच म्हणायला हवी कारण जगतजीतसिंगच्या दुसऱ्या परदेशी पत्नीचा अंत कुतूबमिनार वरून उडी मारून आत्महत्या करण्यामुळे झाला पण ती कहाणी आपण वाचू पुढच्या भागात !!

सबस्क्राईब करा

* indicates required