गोष्ट ६८ कोटींना विकल्या गेलेल्या भारतीय सोन्याच्या मोहोरेची.. कुणाची होती ती मोहोर?

१९८० सालची ही गोष्ट आहे . स्वित्झर्लंडमधल्या एका लिलावात  बारा किलो वजनाची म्हणजे तब्बल १००० तोळ्याची सोन्याची मोहोर १९८० साली आंतराष्ट्रीय बाजारात विक्रीस आली होती आणि ती १ कोटी अमेरिकन डॉलरला विकली  गेली. एक कोटी डॉलर म्हणजे आजच्या काळातले ६८ कोटी रुपये हो !! 

भारतातली ही सोन्याची मोहर परदेशात गेली कशी ? 

ब्रिटिशांच्या भारतातल्या साम्राज्याच्या शेवटच्या काही वर्षात अनेक संस्थानिकांनी आपली संपत्ती देशाबाहेर हलवली. ही १००० तोळ्याची मोहोर निजामाच्या वंशजाने म्हणजे आठव्या निजामाच्या आईने- बेगम दुरुशेवारने-  स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी देशाबाहेर नेली होती. आईकडून ती मोहोर आठवा निजाम -मुकर्रमजहाँकडे आली आणि त्याने ती या लिलावात विक्रीस ठेवली. 
निजामाच्या खजिन्यात ही मोहोर आली कशी ? 

मुकर्रमजहाँ (स्रोत)

इतिहासात शहाजहान -जहांगीर यांचा काळ मुघल साम्राज्याचा सुवर्णकाळ समजला जातो. या काळात १००, २००, ५०० तोळ्यांच्या अनेक मोहोरा जहाँगिरने बनवल्या. एक तोळ्याच्या सोन्याच्या मोहोरा त्याकाळी सर्रास रोजच्या व्यवहारात वापरल्या जायच्या आणि मोठ्या मोहोरा युध्दात खास कामगिरी करणार्‍या सरदारांना इनाम म्हणून दिल्या जायच्या. ही १००० तोळ्याची मोहोर जहांगीराने पर्शियन राजदूत जमिलबेग याला भेट म्हणून देण्यात  दिली होती. 

काय खासियत होती या मोहोरेची ?

जहांगीर बादशहा (स्रोत)

१००० तोळ्याची मोहोर त्याकाळीसुध्दा दुर्मिळच होती. २१ सेंटीमीटर व्यासाच्या या मोहोरेवर कलाकुसर तर अत्युत्तम आहेच, पण ऐतिहासिक महत्वाची गोष्ट म्हणजे या मोहोरेच्या मधोमध असलेला मजकूर!!  
"बा हुकुम शहा जहांगिर याफ्त सद जेवर, बनाम नूर बादशाह बेगम जर" 

याचा अर्थ असा की " बादशहा जहाँगिरच्या बेगम नूरजहांचे नाव या नाण्यावर आल्याने सोन्याची किंमत १०० पट वाढली आहे "

 

निजामापर्यंत ही मोहोर आली कशी ?

 निजाम-उल-मुल्क म्हणजे पहिल्या निजाम (स्रोत)

ही मोहोर औरंगजेबाने गाजीउद्दीन खान सिद्दीकी बहादूरला दिली. त्याच्याकडून ती निजाम-उल-मुल्क म्हणजे पहिल्या निजामाकडे आली. त्याच्या खाजगी खजिन्यातून ती मुकर्रमजहाँ -आठवा निजाम याच्याकडे आली. 

भारत सरकारने हा ऐतिहासिक ठेवा मिळवण्यासाठी काय केले ?

भारताच्या वकीलातीने हा लिलाव थांबवण्याचा प्रयत्न  केला. पण  ही मोहोर १९४७ सालच्या आधीच परदेशात आली असल्याने लिलावाची परवानगी देण्यात आली. 

निजामाचा सगळाच खजिना परदेशात आहे का ?

खजिन्याचे दोन प्रकार असतात. एक खाजगी खजिना आणि दुसरा सरकारी खजिना. खाजगी खजिन्यातून किती आणि काय बाहेर गेले याची मोजदाद शक्यच नाही.  पण बराचसा खजिना भारत सरकारने ताब्यात घेऊन रिझर्व्ह बँकेत जमा करून ठेवला आहे.

ही गोष्ट झाली निजामाच्या खजिन्याची. पुढच्या भागात आपण वाचणार आहोत सिंधियांच्या सोन्याबद्दल. या सोन्यामुळेच  टाटांचे औद्योगिक साम्राज्य उभे राहू शकले.

 

आणखी वाचा :

'२३० अब्ज डॉलर' संपत्ती असलेला हा होता भारतातील सर्वात श्रीमंत माणूस !!!

सबस्क्राईब करा

* indicates required