computer

शेतकरी ते जागतिक स्तरावरचे व्यापारी, खिशात ५०० रुपये घेऊन आलेल्या आसामच्या अजमल अली आणि त्यांच्या ''अजमल परफ्यूम्स'ची गोष्ट!!

आज जगभर अजमल परफ्युम्सची ख्याती आहे. पण आज तुम्हाला माहीत असलेले आणि सगळीकडे गवगवा असलेले अजमल परफ्युम्स हे एका माणसाच्या मेहनतीचे फळ आहे. त्यांचीच गोष्ट आज आम्ही सांगणार आहोत.

हाजी अजमल अली असे या अवलियाचे नाव. त्यांच्या नावाआधी किंग लावले जाते. जगभर त्यांची ओळख परफ्युम किंग अशीच आहे. तर गोष्ट सुरू होते १९४० च्या दशकापासून. या सगळ्या उद्योगाची सुरुवात करणारे अजमल अली हे शेतकरी होते. ते मूळचे आसाममधल्या होजाई या गावचे. ते बरेचदा आपल्या गावाजवळच्या जंगलांमध्ये भटकत असत. या भटकंतीत अजमल अली दान अल औधच्या (अगरवूडच्या झाडापासून काढले जाणारे तेल) शोधासाठी फिरत असत. हळूहळू त्यांनी पुरेशी अगरवूडची झाडे शोधून काढली. पुढे जाऊन त्यापासून औध कसे काढायचे हे देखील ते शिकले.

आता हे औध काढण्याची भानगड ते का करत असत हे समजून घ्या. या औधचा उपयोग सुगंधासाठी करण्यात येत असे. पण तोवर या सुगंधावर फक्त राजेशाही कुटुंबांची मक्तेदारी असे. सामान्यांना याची माहिती देखील नव्हती.

अजमल अली यांनी हीच गोष्ट ओळखली आणि त्यांना औधचे महत्व कळले. हा सुगंध जगापुढे आणायला हवा या उद्देशाने १९५० साली ते खिशात ५०० रुपये घेऊन मुंबईत आले ते थेट औध विकण्यासाठी!!! ते औध आणि अगरवूडचे पुरवठादार बनले.

१९५१ साली त्यांनी वेगवेगळी सुगंधी तेले वापरून परफ्युम-अत्तर बनवायला सुरुवात केली. ते अत्तर उत्पादक बनले आणि हळूहळू त्यांच्या अत्तराची मागणी वाढायला लागली. मध्य आशियातील प्रमुख परफ्युम उत्पादक म्हणून त्यांचे नाव व्हायला सुरुवात झाली होती. १९६४ साली अजमल यांनी त्यांच्या कंपनीला अजमल हे नाव दिले आणि अजमल परफ्यूम्स एक ब्रँड म्हणून पुढे आले.

इथवर झालेली प्रगतीच डोळे दिपवणारी होती. पण इथून पुढे त्यांनी आपला पसारा वाढवण्याचे ठरवले होते. परफ्युम्सचे प्रमुख मार्केट भारतापेक्षा मध्य आशियात जास्त आहे ते हे त्यांना चांगले कळत होते. त्यांनी आपले लक्ष तिकडे वळवले आणि १९७६ साली दुबईला मुखालत नावाचे परफ्युम काढले. आता वेळ होती इतर देशांमध्ये सुद्धा पाय पसरण्याची. १९८७ साली त्यांनी दान अल औधचा करिष्मा जगाला दाखवण्यासाठी इउ दे परफ्यूम लॉंच केला.

यानंतर जागतिक स्तरावर त्यांचे नाव गाजायला सुरुवात झाली होती. आता दुबईतच परफ्युम्सचे उत्पादन व्हायला लागले होते. सोबत परफ्युम्समध्ये संशोधन करण्यासाठी भव्य हायटेक फॅसिलिटी सेंटर सुद्धा दुबईत उभारले गेले. कतार, ओमान, बहरीन, कुवैत अशा देशांमध्ये शाखा उघडण्यात आल्या. आता अजमल परफ्यूम्स हा इंटरनॅशनल ब्रँड झाला होता.

आजच्या तारखेला अजमल परफ्यूम्स ३०० वेगवेगळी प्रॉडक्टस विकते. देशातल्या ३६ शहरांमध्ये त्यांचे काम चालते. त्यांचे परफ्यूम्स ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहेत. १००० रुपयांपासून लाख रुपयांपर्यंत सगळ्या किमतींमध्ये हे परफ्यूम्स उपलब्ध आहेत. अजमल परफ्यूम्स असं नुसतं गूगल केलंत तरी जगभरातल्या प्रमुख ऑनलाईन विक्री करणाऱ्या वेबसाईट्सवरती त्यांच्या उत्पादनांची यादी दिसते.

अल्कोहोलरहित आणि मंद सुवासाने मन सुगंधित करणारं अत्तर हे भल्याभल्यांना वेड लावतं. अशा या अत्तराचा भारतीय ब्रँड जगभर पसरला आहे आणि अजून तो वाढतच आहे. आसामच्या एका शेतकऱ्याने सुरु केलेल्या या छोटेखानी उद्योगाचा पसारा इतका वाढलाय की आता त्यांचं दुबईत हेडक्वार्टर आहे. केल्याने होत आहे रे याची ग्वाही या उदाहरणातून जगाला मिळतेय!!

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required